आयुष्य = काम

Written November 17, 2018

अमेरिकेत शिकण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे शिक्षण घेता घेता वास्तव जगातील अनेक गोष्टींची विविध उपक्रमांद्वारे होणारी ओळख आणि जागतिक दृष्टीकोनातून दिले जाणारे शिक्षण. आमच्या एका इमारतीत खूप छान वाक्य कोरलेले आहे, ‘एक विचारशील प्राणी म्हणून शिक्षण महत्वाचे असते आणि जगण्यासाठी काम.’ मी ओमाहात येईपर्यन्त असेच ऐकत होतो की, शिक्षण हे पोटापाण्यासाठी घ्यायचे असते. इथे आल्यावर सगळ्यात पहिले हा समज दूर झाला. शिक्षणाला आणि कामाला इथे आयुष्याचा अविभाज्य घटक समजले जाते. उगाच शिकायचे म्हणून शिकायचे आणि पाट्या टाकत काम करायचे असे इथे अजिबात चालत नाही. दोन्ही गोष्टीत प्रामाणिकपणे काम करायचे आणि हा प्रामाणिकपणा काही कौतुकाची गोष्ट नसून अत्यावश्यक गोष्ट आहे हे या वातावरणात राहून रक्तात चांगलेच भिनून जाते. मी स्वयंसेवक म्हणून विविध उपक्रमांत भाग घेतला आहे. आपल्याकडे स्वयंसेवक म्हणजे फुकटात कामाला येणारा माणूस. इकडे स्वयंसेवक म्हणजे त्याच्या त्याच्या कामाचा व्यवस्थापक! या दोन्ही मध्ये दृष्टीकोनाचा मोठा फरक आहे. स्वयंसेवकाला पूर्ण जबाबदारी देणे मी इथे बघतो आणि आपल्याकडच्या स्वयंसेवकांची कीव येते. तुम्ही कुठल्याही कार्यात स्वयंसेवक म्हणून काम करू शकता. अगदी दारावर नोंदणी करण्यापासून ते शेवटची स्वच्छता करेपर्यंत. विशेष म्हणजे इथे कोणतंच काम हलके समजले जात नाही. प्रत्येकाला योग्य मानधन आणि आदर दिला जातो. कोणताही काम करताना प्रशिक्षण देणे फार महत्वाचे समजले जाते. शिक्षण आणि प्रशिक्षण यात फरक असतो. प्रशिक्षण घेणे इथल्या व्यवस्थेचा महत्वाचा भागच आहे. मला एका प्रशिक्षण सभेत सांगितलेले वाक्य चांगलेच आठवते आहे. ते वाक्य होते, ‘प्रशिक्षण घेणे म्हणजे परिष्कृत होणे आहे.’ परिष्कृत कशासाठी व्हायचे असे एकदा एका कार्यक्रमात मी विचारले तेव्हा तिथल्या प्रशिक्षकाने न रागावता सांगितलेले सुद्धा आठवते. त्या म्हणाल्या होत्या, ‘हे सिद्ध करायला की आपण माणसे आहोत.’ किती स्पष्टपणा आहे हा! तो येतोच नियमित प्रशिक्षणामुळे. प्रशिक्षण घेऊन काम करायला खूप मजा येते. आत्मपरिक्षण करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे असे मला वाटते. आपल्यातले गुण दोष आपल्याला कळतात. त्यावर काम करता येते. समाजात मिसळता येते. एकंदरीत छानच वाटते.   

माझ्या विद्यापीठात काम करताना ‘SWOT’ अनॅलिसिस करण्याचा एक प्रसंग आला होता. वैयक्तिक पातळीवर स्वतःची बलस्थाने, उणिवा, संधी आणि धोके जाणून घेण्याची खूप छान संधी मिळाली होती. तुम्हाला या गोष्टी तर कळल्या पण मग त्यावर काम कसे करायचे हे कोण सांगणार? त्याचीही सोय इथे असते. अनेक मानसशास्त्रज्ञ प्राध्यापक दिवसातला काही वेळ यासाठी ठेवतात. मुलांशी बोलतात, त्यांना मार्गदर्शन करतात, हवं नको ते बघतात आणि मार्ग काढून देतात. योग्य दिशा दाखवून वाटचाल करण्यासाठी उद्युक्त करतात. ते हे काम म्हणून करत नाहीत. मानधन घेत नाहीत. पूर्णतः सामाजिक जाणीव म्हणून फुकटात करतात. कामाला इथे प्रामाणिकपणे घेतले जाते. 

एके दिवशी आमच्या एका बैठकीत प्रशिक्षक म्हणाले होते, ‘ एखाद्या ठिकाणी काम करणे आणि त्या ठिकाणचा भाग होणे यामध्ये फरक असतो.’ माझं विश्व त्या वाक्याजवळ घुटमळतय. मी गहन विचारात पडलो. अमेरिकेतील वावरण्यात मला एक गोष्ट नेहमी निदर्शनास आली आहे. ती म्हणजे, ही लोकं गंभीर राहून कष्ट न करता प्रामाणिकपणे वाटचाल करण्याला नेहमी प्राधान्य देतात. अनेक सामाजिक परिस्थितीतून अनेक भाषिक आणि धर्मांची लोकं एकत्र येऊन माझं विद्यापीठ चालवतात. यामध्ये कुलपतींपासून ते सफाई कामगारापर्यन्त सर्वांचा समावेश होतो. येथे पदानुक्रम निश्चित असतो. पण, तो उभा (vertical hierarchy) नसतो. कोणी कुणाच्या वर नाही की खाली नाही. इथे पदे सपाट असतात (horizontal hierarchy) जी बारकाईने सांभाळली जातात. म्हणजेच कोणतीही व्यक्ती कुणाही पेक्षा वरिष्ठ अथवा कनिष्ठ नसते. सफाई कामगारांना तेवढाच आदर दिला जातो जेवढा शिक्षकांना! आपआपली जबाबदारी पूर्ण करून एखादे काम त्याव्यतिरिक्त उद्भवले तर हे लोक न विचार करता पुढाकार घेतात आणि काम पूर्णच करतात. एक घटना सांगतो. मी मागील वर्षी जेव्हा विद्यापीठात दाखल झालो त्यानंतर महिनाभरात अमेरिकेत खग्रास सूर्यग्रहण होतं. विद्यापीठात फार जल्लोषाचं वातावरण होतं. मी तर आश्चर्यचकीतच झालो होतो. भारतात असताना वेगळेच वातावरण बघितले होते आणि इकडे तर त्यादिवशी आख्ख्या विद्यापीठाला सुट्टी! सगळे लोक झाडून मुख्य मैदानावर हजर होते. ग्रहण संपेपर्यंत सगळे तिथे थांबले आणि त्यानंतर पोटपूजा करून गेले. गेटमन ते कुलपती एकाच ठिकाणी उभे राहून खात होते. गप्पा मारत होते. मी असले दृश्य कधी पाहिले नव्हते. नंतरच्या सफाईत मुलांसोबत उपकुलपती आणि अनेक प्राध्यापक सामील झाले. मला कामाबद्दलचा मोठा धडा त्यादिवशी मिळाला. काम हे काम असते आणि तो आयुष्याचा सगळ्यात मोठा भाग आहे, हा तो धडा. 

परदेशांत शिकण्यासाठी जायचंय? करियर घडवायचंय?

अमेरिकेतील काही सरकारी कार्यालयांत जाण्याचं योग आला होता. तिथेही असेच वातावरण असते. इथे वेळेत येण्याला अजिबात महत्व दिले जात नाही. पण कामावर आल्यावर कार्यक्षमतेला खूप महत्व दिले जाते. जे खरे असतात ते नियम असो अथवा नसो, वेळेतच येतात. काम करतात. वेळ वाचवतात. त्यात काही उपयुक्त करता येते का आणि आपल्या संस्थेला काही उपयोग होऊ शकेल का, या विचाराने पुढील कामही आनंदाने करतात. अशा लोकांना विशेष प्रोत्साहन दिले जाते. पण मजा अशी आहे की, हे लोक त्या प्रोत्साहनासाठी नव्हे तर स्वतःला जोखून बघण्यासाठी पुढे पुढे जात राहतात. फक्त पैसा कमावणे हा त्यांचा उद्देश नसतोच. हे लोक स्थानिक काम करत असले तरी त्यांचा दृष्टीकोन वैश्विक असतो हे एकेकाळी तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणाले होते याचमुळे. प्रभावी व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर यामुळे मानव आणि तंत्र यांचा अद्वितीय मेळ येथे पाहायला मिळतो. नोकरीला नोकरी म्हणून न पाहता ते एक देश-कार्य आहे आणि माझ्या अगदी छोट्या कामामुळे सुद्धा देशाच्या वाटचालीत फरक पडू शकतो असा दृष्टीकोन ठेवून काम करणारी माणसे मी पाहतो आहे. आयुष्य म्हणजे नुसतेच जगणे नसून माझ्या वाट्याला आलेले काम योग्य रीतीने करून सफल होणे हेच ध्येय ठेवणारी माणसे आज या देशाला महासत्ता बनवू शकली आहेत. भारतात असे करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. लागायचं मग कामाला?

-शिवम् गायकवाड

Copyright © Shivam Gaikwad. All rights reserved.


Published by Shivam Gaikwad

An enthusiastic Marathi writer sharing experiences of studying abroad.

Leave a Reply