एक पाऊल बदले जीवन

Written April 28, 2019

अतिशय थंडीचा हंगाम संपला आहे. ओमाहात आता सूर्य परतला आहे. त्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. लोकं टी-शर्ट, शॉर्ट्स आणि गॉगल घालून बाहेर सूर्यप्रकाशाचा आनंद घेताना दिसून येत आहेत. गोल्फ खेळणारी मंडळीसुद्धा त्यांच्या गॉल्फकार्ट मध्ये वावरतांना दिसत आहेत. बर्फ वितळला आहे. थंडीत गोठलेले झरे आता खळाळून वाहत आहेत. झाडे आणि गवतासारखीच मलाही नवीन पालवी फुटून आयुष्याचा सुगंध सगळीकडे दरवळलेला परत एकदा जाणवतोय. यंदा आम्ही पोलर व्हरटेक्सचा म्हणजे अति-प्रचंड थंडीचा अनुभव घेतला. हाडात थंडी जाते म्हणजे काय असते ते चांगलेच अनुभवले आहे. मात्र आता थंड आणि बोचरी हवा जाऊन प्रेमळ आणि उबदार हवा परतली आहे. काही महिने सूर्याशी संपर्क तुटला तर सर्वत्र रोगराई पसरते. ती कुंद हवा हैराण करते. मनोबल खचवून टाकते. सूर्याशी असलेले आपले नाते अगदी मूलभूत आहे. सूर्यप्रकाश आहे म्हणून जीवन आहे. पृथ्वीवर असलेली सर्व ऊर्जा सुर्यापासून येते. आपणही त्याआधारे जगत असतो. पण हे तेव्हाच कळते जेव्हा आपण अशा वातावरणात राहतो. नोव्हेंबर ते एप्रिल इकडे राहायचे म्हणजे मोठी परीक्षा आहे, हे नक्की.

आता आमच्या विद्यापीठाचा कॅम्पसही बहरला आहे. भरपूर कार्यक्रम, क्रियाकलाप परतून अनेक विद्यार्थी त्यात सहभागी होऊन सर्जनशीलतेला वाव देत आहेत. या कालावधीत येथे अवकाळी पावसाचे प्रमाण पुष्कळ असल्यामुळे लोक छत्रीचा पुरेपूर वापर करतात. जवळपास सगळीकडेच जमिनीवर कार्पेट असल्यामुळे पाणी साचून राहण्याचा धोका निर्माण होतो.

नुकत्याच एका कार्यक्रमात मी गेलो होतो. मी छत्री दप्तरात टाकणार तेवढ्यात एक स्टॅन्ड माझ्या नजरेसमोर आला. आमच्या ’विद्यार्थ्यांच्या सरकारने’ प्रवेशद्वाराजवळ छत्री मावेल अशा प्लास्टिकच्या बॅगा मोफत उपलब्ध करून ठेवल्या होत्या. या छोट्या पण प्रभावी प्रयत्नामुळे तिथे स्वच्छता टिकून होती. सफाई कामगारांच्या श्रमांची बचतही यामुळे झाली.

आणखी एक बाब म्हणजे येथे प्रत्येक इमारतीत किमान एक प्रवेशद्वार स्वयंचलित असते. आतून आणि बाहेरून एक बटण दाबले की दरवाजा आपोआप उघडतो. शारीरिकदृष्ट्या अक्षम आणि प्रौढ वर्गाला ही यंत्रणा सोईस्कर ठरते. मुख्य म्हणजे विजेची बचत व्हावी म्हणून इतर लोकं या स्वयंचलित प्रवेशद्वाराचा वापर करत नाहीत.

आणखी एक घटना. माझ्या वर्गात एक मूकबधिर (मुकी आणि बहिरी) मुलगी शिकते. अशा शारीरिक अडचणींमध्ये असूनही दैनंदिन आयुष्य आणि शिक्षण किती कठीण असू शकते हे ती मुलगीच जाणते. पण तरीही जिद्द न सोडता ती वर्गात हसत खेळत येते. प्रयोगशाळांमध्ये होत असलेल्या सर्व प्रयोगांत आवर्जून भाग घेते. तिच्याशी संवाद साधण्यासाठी “American Sign Language“ चा वापर आम्ही करतो. विद्यापीठाने नेमून दिलेली व्यक्ती रोज आमच्या वर्गात येऊन शिक्षक जे शिकवतात, त्याचा भावानुवाद करून तिला ’बोटांच्या भाषेने’ सांगते. तिला जे विचारायचे किंवा सांगायचे असते तेही अशाच मार्गाने येते. अमेरिकेत जगभरातील विविधता असल्यामुळे येथील समाज सर्वांना सामावून घेतो. आपले वैयक्तिक मत काही क्षणांसाठी बाजूला ठेवून इतरांनाही मदत करण्याची प्रेरणा येथील लोकांमध्ये आहे. पण हा भाव किती खोलवर रुजलेला आहे, हे केवळ परमेश्वरास ठाऊक!

यातून आपल्याला हे लक्षात आलेच असेल की, छोट्यात छोटे प्रयत्न सुद्धा मोठा बदल घडवून आणू शकतात. माणसाची शोध घेण्याची आणि तपास करण्याची वृत्ती त्याच्या विकासाला कारणीभूत ठरते. ही पाऊले उचलतांना जपून, विचार करून पण तरीही मोकळेपणाने उचलावीत. असाच एक आयुष्य बदलून टाकणारा निर्णय मी आणि माझ्या भोवतालच्या व्यक्तींनी घेतला, तो म्हणजे मला अमेरिकेत शिक्षणासाठी पाठवायचा. या साठी लागणारी मेहनत, योग्य निर्णय, वित्त आणि जिद्द मिळून आम्ही अनुकूल परिस्थिती निर्माण केली. “One Step Changes Your Life“ या वाक्याची आणि माझी भेट काही वर्षांपूर्वी झाली. पण, हे वाक्य माझ्या हृदयात कायमस्वरूपी घर करून राहिले आहे.

परदेशांत शिकण्यासाठी जायचंय? करियर घडवायचंय?

आपण एक पाऊल टाकायलाच घाबरतो किंवा आळस करतो. ते सुरुवातीचे एक आणि पहिले पाऊल आपल्याला आयुष्याची दिशा देते. सगळे काही असताना स्वतः चे कर्तृत्व दाखवण्याचे बळ ते पहिले पाऊल देते. दोन वर्षे झाली; त्या पहिल्या पावलाच्या बळावर इतके विचित्र हवामान, वेगळा देश, वेगळी भाषा, वेगळी लोकं अशात मी टिकलो आणि वाढलो आहे. आपण कुणाची फोटोकॉपी होता कामा नये. आपण प्रत्येक जण युनिक आहोत, वेगळे आहोत. हे वेगळेपण अनुभवायचे असेल तर एक एक पाऊल विचारपूर्वक आणि नेटाने टाकणे आवश्यक आहे. माझ्या भोवताली असलेल्या प्रियजनांनी मला भक्कम पाठिंबा दिला खरा, पण ते पाऊल टाकण्याचा निग्रह माझा होता, याचा अतिशय आनंद वाटतो आहे.

-शिवम् गायकवाड

Copyright © Shivam Gaikwad. All rights reserved.

Published by Shivam Gaikwad

An enthusiastic Marathi writer sharing experiences of studying abroad.

Leave a Reply