ओमाहातील शेतकरी आणि माझी वैचारिक मशागत

Written August 17, 2019

आज हा लेख लिहिताना डोळ्यासमोर अनेक गोष्टी येत आहेत. मी भारतात असताना पडलेला पाऊस, पूर, शेतकऱ्यांचे नुकसान, शेती आणि एक शहरी म्हणून माझे जीवन, अशा अनेक गोष्टी समोर येत आहेत. आता नेब्रास्कात उन्हाळा संपत आला आहे. भारतात सर्वाधिक तापमान मे महिन्यात असते तर येथे तसेच तापमान जुलै महिन्यात असते. शाळा-कॉलेजाना साधारण मे ते जुलै यादरम्यान सुट्टी असते. माझ्या विद्यापीठात सुट्टी घेणं किंवा न घेणं हे बंधनकारक नाही. काही विद्यार्थी सुट्टी घेऊन फिरतात, काम करतात, आपापल्या कुटुंबाला भेटायला घरी जातात तर काही विद्यार्थी ओमाहात राहून निवडलेले विषय पूर्ण करतात. बाहेर फिरतांना देखील इंटरनेटच्या माध्यमातून आपला अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सुविधा येथील विद्यापीठं उपलब्ध करून देतात. माझ्या अभ्यासक्रमात अनेक विषय आहेत आणि हे सर्व विषय वेळेत पूर्ण करायचे असल्यामुळे मला या उन्हाळ्यात फार कमी वेळ भारतात यायला जमले. खरे तर येणे शक्यच नव्हते. कारण भारतातून सुट्टी संपवून इथे आल्यावर पुनः पुन्हा घडी बसवायला खूप त्रास होतो. त्यात अभ्यासक्रम, रोजची कामे आणि जबाबदाऱ्या आल्या की कठीण होऊन बसते. येण्याजाण्यात असलेला दीर्घ प्रवास, खर्च आणि त्यामागे इथे दवडलेला अभ्यास हे सगळं पाहता सुट्ट्या तशा महागच पडतात असे वाटते, शिवाय शारीरिक त्रास होतो तो वेगळाच!

आता मी ओमाहात आहे. माझ्या व्यस्त वेळापत्रकातून वेळात वेळ काढून ओमाहाच्या “Farmer’s Market” ला भेट देण्याचे योग अखेरीस माझ्या नशिबी आला.
उन्हाळ्यात भरणारे हे मार्केट फक्त ओमाहाच्या स्थानिक शेतकऱ्यांसाठीच तयार केलेलं आहे. ओमाहाच्या एका निवडून दिलेल्या क्षेत्रात हे मार्केट वसलेले आहे. सकाळी ७ वाजेच्या दरम्यान हे शेतकरी आपली गाडी/ट्रक घेऊन येथे पोहोचून आपले छोटेसे दुकान मांडतात. या बाजारात ताजा भाजीपाला,मांस, डेअरी पदार्थ, घरगुती बनवलेल्या अनेक स्थानिक वस्तू, टवटवीत फुलं, नैसर्गिक घटकांनी बनवलेले हस्तकलेचे साहित्य, बकरीच्या दुधापासून बनवलेला आंघोळीचा साबण, गावठी मध आणि यांसारख्या आणखी बऱ्याच वस्तू तेथे विकायला होत्या. या वस्तू विकायला कोणीही सेल्समन किंवा कामगार ठेवलेला नसतो. शेतकरी स्वतः ग्राहकांशी संवाद साधत होते. हस्तलिखित पाटीवर वस्तूचे मोल दर्शविलेले असते. सहसा अमेरिकेत मॉल प्रणाली असते म्हणून कुठेही कोणी भाव करत नाही, पण या बाजारात अनेक लोकं भाव करतांना दिसली. मुख्य म्हणजे, अतिशय शांत आणि सात्विक वातावरणात हा सर्व कारभार सुरु होता. तेथील शेतकरी आलेल्या गिऱ्हाईकांचे स्वागत करून सन्मानपूर्वक वागणूक देतांना आढळून आले.

माझ्यासोबत शिकणाऱ्या अनेक मित्र मैत्रिणींचे पालक व्यवसायाने शेतकरी आहेत. त्यापैकी काही जण तर असे आहेत की, विद्यापीठात शिकणारी त्यांच्या कुटुंबातील ही पहिलीच पिढी आहे. अशाच मित्र मैत्रिणींच्या आग्रहावरून मी Farmer’s Market मध्ये जायचं ठरवलं आणि पोहोचलोदेखील.

उत्तर अमेरिका क्षेत्रफळाच्या बाबतीत खूप मोठा आहे व येथील लोकसंख्या सुद्धा तुलनात्मकदृष्ट्या कमी असल्यामुळे येथील अधिकाधिक शेतजमीन शेतकऱ्यांना कमी भावात उपलब्ध होते. काही शेतकरी जमीन विकत न घेता ती लीजवर म्हणजे भाड्याने घेऊन ठराविक वर्षांसाठी त्यावर शेती करतात. नेब्रास्का आणि शेजारील आयोवा या राज्यांत प्रामुख्याने मका हे पीक घेतले जाते. येथील शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करतात. शेतीकामात अत्याधुनिक उपकरणे, चांगले आरोग्यदायी खत, योग्य पद्धतीचे सिंचन, गरजेनुसार किटनाशके या सारख्या गोष्टींचा वापर करतात. आजकाल इथेही ऑरगॅनिक शेतीचे प्रमाण वाढत आहे. अमेरिकेत शेती हा व्यवसाय इतर बहुतांश नोकऱ्यांपेक्षा अधिक नफा मिळवून देतो. यामुळे अमेरिकन शेतकऱ्यांचे सरासरी वार्षिक उत्पन्न हे इतर अमेरिकन नागरिकांच्या सरासरी उत्पन्नापेक्षा जास्त आहे. विद्यापीठात शिकणारे काही विद्यार्थी शिक्षण घेऊन प्रगतिशील शेती करायची, असं अभिमानाने सांगतात.

भारतात ही परिस्थिती अगदी उलट आहे. भारतात बहुतांश शेतकरी हे लहान लहान जमिनीच्या तुकड्यांचे मालक बनून राहिले आहेत. एकाच पद्धतीची पीकपद्धती आणि बेसुमार रासायनिक गोष्टींचा वापर शेतकऱ्यांच्या मुळावर आलेला दिसून येतोय. यावेळेस मी हैद्राबाद, कोलकाता, नाशिक आणि परिसर फिरून बारकाईने पाहिला आहे. त्यावरून माझा हा निष्कर्ष आहे. इतर नागरिकांच्या तुलनेत शेतकरी कमी उत्पन्न मिळवतात. यामुळे पैसे कमावण्यासाठी शेतकऱ्याची मुलं नोकरीच्या शोधात गावाबाहेर पडतात. हे स्थलांतर असेच चालू राहिले तर भारतात शेती हा व्यवसाय टिकेल का? हा प्रश्न मला पडत राहतो. भारताची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे भविष्यात यावर प्रभावी उपाय करावे लागणार हे नक्की आहे. माझ्या जीवशास्त्राच्या अभ्यासातून काय करता येईल हा विचार मी इथे बसून अनेकदा करत असतो. त्यात मुख्यतः हा विचार असतोच. एके ठिकाणी दुष्काळामुळे शेतजमिनी ओसाड पडतात, पिकं लावलीच जात नाहीत आणि दुसऱ्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे वाहून जातात. पिकं आलीच तर भाव मिळत नाही आणि कधीतरी सुधारित शेती केली तर पाऊस पडत नाही. कधी आलेल्या पिकाला भाव मिळत नाही तर कधी चांगला नफा झाला तर ते पैसे कर्ज फेडण्यात निघून जातात. हवामान बदल होत असतांना नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाणे आपल्याला भाग आहे. चालू घडामोडीची कारणं दुसऱ्यांवर ढकलून मोकळे होऊ नका. आपण सावकारीबद्दल बोलत राहतो आणि शेतकऱ्यांना शिकवायला जातो पण दुसऱ्या बाजूला कोथिंबीर रुपया दोन रुपयांनी वाढली तर घासाघीस करतो. शेतकरी समृद्ध व्हायचा असेल तर त्याला समाजाची साथ लागेल. तो एकटा कुठे कुठे पुरा पडेल? ओमाहामधील या मार्केट मध्ये सामाजिक जाणिवेचा अनुभव घेतो आहे. इथे लोक भाव करतात पण शेतकऱ्याचे नुकसान होत नाही ना, हे ही बघतात. शेतकरी सुद्धा उत्तम माल देतात. हे परस्परांशी संबंधित कार्य आहे. आपण कुठेतरी कमी पडतो असे मला वाटते.

परदेशांत शिकण्यासाठी जायचंय? करियर घडवायचंय?

दुसरा मुद्दा असा की, लोकसंख्या ही भारताची कमतरता किंवा डी-मेरिट नसून आपलं बळ आहे. प्रत्येक व्यक्तीने एक छोटे पाऊल उचलेले तरीही मोठ्यात मोठा बदल घडवता येऊ शकतो. मी अमेरिकेत गेलो आणि पुराच्या बातम्या वाचल्या. यंदाच्या महापुराला आपण व्यक्तिशः किती जबाबदार आहोत? विचार करून बघा. जर आहोत असे वाटत असेल तर आपण ही परिस्थिती सुधारण्यासाठी खरंच काय काय पावलं उचलू शकतो? जे कोल्हापूर-सांगली मध्ये घडले ते नाशिक-मुंबईला घडणार नाही, असे समजू नका. स्वतः वर वेळ येण्याची वाट पाहू नका. आपल्या सुशिक्षित समाजात एवढा विचार तर व्हायलाच हवा ना! सिंचन, शेती, रोजगार, औद्योगिकीकरण आणि माझा व्यवसाय किंवा नोकरी ह्या वेगवेगळ्या गोष्टी नाहीत. त्या एकमेकांना पूरक आणि निगडित आहेत. एक धागा तुटला तरी चालणार नाही. तुटलेल्या धाग्याला आपण प्रेमाची आणि विश्वासाची गाठ मारू शकलो तर भारत पुढे येईल आणि शेतकरी समृद्ध होईल.

– शिवम् गायकवाड

Copyright © Shivam Gaikwad. All rights reserved.

Published by Shivam Gaikwad

An enthusiastic Marathi writer sharing experiences of studying abroad.

3 thoughts on “ओमाहातील शेतकरी आणि माझी वैचारिक मशागत

  1. लेख वाचुन समाधान वाटले उत्तम आहे

Leave a Reply