‘ओ’ माहा!

Written September 14, 2018

ओमाहा हे अमेरिकेच्या बरोबर मध्यभागी वसलेल्या नेब्रास्का राज्यातील महत्त्वाचे शहर आहे.
एकेकाळी दुर्लक्षित असलेले हे शहर वनसंपदेमुळे प्रकाशझोतात आलं. तेथील खाण उद्योग
एकेकाळी बहरात होता. या शहराची स्थापना १८५४ साली झाली. तेथील नगरपालिका २ फेब्रुवारी
१८५७ रोजी जन्माला आली. ओमाहा हे शहर आयोवा आणि नेब्रास्का या दोन राज्यांच्या सीमेवर
वसलेले आहे. आयोवा मधील कौन्सिल ब्लफ्स हे त्याच्या अगदी शेजारचे शहर. या दोन शहरांच्या
मधून मिजौरी नदी वाहते. एकेकाळचे दुर्लक्षित असलेले शहर आज ‘गेटवे ऑफ द वेस्ट’ म्हणून
नावारूपाला आले आहे. देशाच्या मधोमध असल्याने ओमाहाला ‘ट्रान्सपोर्ट हब ऑफ अमेरिका’
म्हटले जाते. भारतात ओमाहाबद्दल कमी माहित असले तरी जाणकारांना येथील चार ‘फोर्चून
५००’ कंपन्या असल्याचे नक्की माहित आहे. जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असलेले वॉरेन
बफे यांची ‘बर्कशायर हाथवे’, किव्हीट कॉर्पोरेशन, म्युच्युअल ऑफ ओमाहा, युनियन पॅसिफिक
यांची मुख्यालये याच शहरात आहेत.


मी मूळचा नाशिकचा. मागील वर्षी बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर माझ्या आवडीच्या जीवशास्त्र
या विषयातील जगातील उत्तम शिक्षण देणारी ‘युनिव्हर्सिटी ऑफ नेब्रास्का ऍट ओमाहा’ मध्ये
मला दाखला मिळाला आणि मी ओमाहाकर झालो. नाशिकसारख्या मध्यम शहरातून एकदम
अमेरिकेत जाणे आणि शिकणे तसे खूप अवघड होते. मी भारताबाहेरही पहिल्यांदाच गेलो होतो.
त्यामुळे प्रचंड दडपण होते. पण, दोन महिन्यांत मी तिथे रुळून गेलो. याला कारण म्हणजे
शहरातील आणि विद्यापीठातील काळजी घेणारी माणसं! विद्यापीठात जगभरातून विद्यार्थी
येतात. वेगवेगळ्या धर्मांची, देशाची आणि भाषांची माणसे इथे ‘हे विश्वचि माझे घर’ या भावनेने
गुण्यागोविंदाने राहतात. एकमेकांना सांभाळतात. वैयक्तिक स्पेस देतात. स्वावलंबनाचे धडे देतात.
जेवण्याखाण्याची आस्थेवाईकपणे चौकशी करतात. गरज पडली तर स्वतःचे अन्न बिनधास्त शेअर
करतात आणि कम्युनिटी लिविंग सार्थ जगतात.


युनिव्हर्सिटी ऑफ नेब्रास्का ऍट ओमाहा हे अमेरिकेतील टॉप २० मानांकन असलेले विद्यापीठ
आहे. मी इथे जीवशास्त्र आणि मानसशास्त्रासह समाजशास्त्र या विषयांत पदवी शिक्षण घेतो आहे.
जगातील असा कोणताही विषय नाही जो इथे शिकवला जात नाही. येथील प्राध्यापक मोठ्या
मोठ्या पदांवरील नेमस्त लोकं किंवा डॉक्टरेट मिळवलेले उत्तम शिक्षक आहेत. विद्यापीठाची
विविध खेळांसाठी स्वतःच्या टीम्स आहेत. शिक्षणासोबत शारीरिक स्वास्थ्य याला इथे प्रचंड
महत्व दिले जाते आणि त्यानुसार जागतिक दर्जाचे हेल्थ सेंटर विद्यापीठातच आहे. शारीरिक स्वास्थ्यासाठी आवश्यक असलेले उत्तम प्रतीचे खाद्य येथील मेस मध्ये मिळते. जगभरातील
विद्यार्थी असल्याने संपूर्ण जगातील विविध रेसिपीज येथे उपलब्ध असतात आणि त्या जागतिक
दर्जा राखून केलेल्या असतात. त्यापुढे तारांकित हॉटेल्स फिकी पडतील इतके चांगले अन्न इथे
मिळते. विद्यापीठाचा परिसर इतका मोठा आहे की अंतर्गत वाहतुकीसाठी बस-शटल सेवा
विनाशुल्क उपलब्ध आहे. विद्यापीठ मुख्य शहरापासून सहा किलोमीटर एक टेकाडावर वसलेले
असल्याने रात्रीच्यावेळी चमचमणारे शहर बघण्याची मजाच काही और आहे.
ओमाहा हे शहर जुने आणि नवे सगळे काही सामावून घेणारे आहे. शहराचे उत्तर, दक्षिण, ओल्ड मार्केट आणि
डाउनटाऊन-नवे ओमाहा असे चार विभाग आहेत. ओल्ड मार्केट परिसरात जुन्या देखण्या इमारती आहेत.
त्या खूप चांगल्या पद्धतीने सांभाळल्या जातात आणि विशेष म्हणजे त्यात लोकं राहतात. येथील काही
दुकाने शंभर वर्षे जुनी आहेत. याच बाजारात वीकेंडला स्थानिक शेतकऱ्यांचा बाजार भरतो. हा
आपल्याकडच्या आठवडी बाजारासारखा असला तरी व्यवस्था आणि स्वच्छता डोळ्यात भरते. ओमाहा
मध्ये दुकाने असली तरी लोकांचा कल वॉलमार्टमध्ये खरेदी करण्याकडेच आहे. शहरापासून काही अंतरावर
प्रचंड मोठ्या आवारात हे वॉलमार्ट आहे. शब्दशः टाचणी ते उपग्रहापर्यंत लागणाऱ्या सर्व वस्तू इथे
मिळतात. लोकांना वीकेंडला मजा करायला यायला आवडणारे असे हे ठिकाण आहे. ओमाहा मधील जीन
लेही मॉल असाच प्रसिद्ध आहे. याचा परिसर देखणा आहे. येथे जगभरातील सर्व ब्रँड्सची उत्पादने
मिळतात. ओमाहाचा एपली विमानतळ देखणा आहे. शहराच्या प्रसिद्ध कार्टर लेक या तलावाला लागूनच
त्याची बांधणी केली आहे. या शहराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे शहरातील अनेक उद्याने! अतिशय
सुंदर पद्धतीने तयार केलेली ही उद्याने इथल्या हॅपी-गो-लकी लोकांचे प्रतिबिंब म्हणावे लागेल! लोकं त्याचा
वापर छोट्याशा पिकनिकसाठी ते चर्चासत्रे घडवण्यासाठीही करतात. येथील बोटॅनिकल गार्डन आणि झू हे तेथील उत्तमोत्तम संग्रहासाठी प्रसिद्ध आहे. ओमाहा अमेरिकेतील महत्वाचे असे संरक्षण केंद्रही आहे. येथील ऑफट एअरफोर्स बेस अमेरिकेचा महत्वाचा असा बेस असून त्यात साडेसात हजारांहून अधिक लोकं काम करतात. नेब्रास्का मेडिसिन आणि यूएनएम सेंटर ही अमेरिकेतील अत्यंत महत्वाची हॉस्पिटल्स ओमाहामध्येच आहेत. इथे विविध संशोधने जोरात चालतात.
ओमाहामधील लोकं अतिशय शांत आहेत. बहुभाषिक संस्कृती नांदणारी इथली समाजपद्धती आहे. न्यूयॉर्क आदि
शहारांप्रमाणे घाईगडबड इथे अजिबात नाही. तरीही अमेरिकेतील अत्यंत महत्वाची बिझनेस हाऊसेस इथे आहेत
यावरून लोकांची उत्पादकता सहज लक्षात येईल. शुक्रवार दुपार ते रविवार उत्तररात्र हे लोक आयुष्य जगतात.
कुटुंबासमवेत वेळ घालवतात. स्थानिक ऑपेरा, नाटके, उत्तम वाचनालये, उद्याने आणि शॉपिंग सेंटर्स मध्ये
कुटुंबासह आवर्जून जातात. सर्व उपहारगृहे असल्याने जगभरातील रेसिपीज खातात. येथे आयरिश, हिस्पॅनिक,
आफ्रिकन, नेटिव्ह अमेरिकन यांच्यासह जगभरातील लोकं आहेत. पण सामाजिक वातावरण छान आहे. मी जेव्हा विविध अडचणींना सामोरे गेलोय तेव्हा मोठ्या नेव्ही अधिकाऱ्यापासून ते टॅक्सी ड्रायव्हरपर्यंत सर्वांनी मला
खूप मदत केली आहे. येथील एका नेव्हल अधिकाऱ्याच्या कुटुंबाचा सदस्य झालो आहे इतका जिव्हाळा निर्माण
झाला आहे. ओमाहामध्ये भारतीय खूप आहेत. येथील बँकिंग आणि ट्रान्सपोर्ट कंपन्यांत चांगल्या हुद्द्यांवर ते
काम करतात. भारतीय किराणा दुकाने इथे आहेत. एक खूप सुंदर मंदिर आहे जिथे वेगवेगळे उत्सव मोठ्या
उत्साहात साजरे होतात. मागील गणेशोत्सवात मीही तिथे स्वयंसेवक म्हणून काम केले आहे. अमेरिकेतील
लोकांबाबत साधारणपणे ज्या नकारात्मक गोष्टी आपल्याकडे बोलल्या जातात तसे वातावरण मला ओमाहामध्ये
अजिबात दिसलेले नाही. अमेरिकेत गेलेला माणूस तिकडचाच का होतो हा अनेकदा मला पडलेला प्रश्न होता. इथे आल्यावर आणि राहिल्यावर त्याचे उत्तर मला मिळाले.

परदेशांत शिकण्यासाठी जायचंय? करियर घडवायचंय?

-शिवम् गायकवाड

Copyright © Shivam Gaikwad. All rights reserved.

Published by Shivam Gaikwad

An enthusiastic Marathi writer sharing experiences of studying abroad.

Leave a Reply