काऊचसर्फिंग- जागतिक संधींचे माहेरघर

Written May 16, 2019

बऱ्याच कालावधी नंतर Couchsurfing वर एका व्यक्तीने काही काळ माझ्याकडे येऊन राहण्याची विनंती केली. त्यांनी केलेली विनंती अतिशय साधी, सरळ आणि नम्र होती. माझ्या हॉस्टेलमध्ये जागा नसल्यामुळे आणि विद्यापीठाच्या परीक्षा या कारणांमुळे मला त्या व्यक्तीसोबत वेळ घालवणे शक्य नव्हते. पण तरीही त्या व्यक्तीने भेटण्याचा केला आणि काही वेळ सोबत घालवण्याचाही आग्रह केला. ह्या व्यक्तीचे नाव लिंडा आहे. लिंडा चीन मधील शांघाय या शहरात राहते. ती ३८ वर्षांची असून चीनमध्ये “Wealth Manager” म्हणून काम करते. लिंडा अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्वाची आहे. नवनवीन ठिकाणी भटकंती करून अनोखी दृश्ये आणि क्षण कॅमेरात टिपून ठेवणे हा लिंडाचा छंद आहे. मी वीसच वर्षांचा असल्याचे लिंडाला खूप नवल वाटले.

लिंडा ओमाहा मध्ये Berkshire Hathaway Shareholders Meeting साठी आली होती. वर्षातून एकदा जगभरातून Berkshire Hathaway या कंपनीचे Shareholders जगप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे आणि त्यांचे सहकारी चार्ली मुंजर यांच्या सोबत वार्तालापाकरिता एकत्र येतात. लिंडाने मलाही आमंत्रित केले. ही सुवर्णसंधी मला फक्त लिंडामुळेच प्राप्त झाली.

तीन दिवसांच्या कालावधीत पार पडणाऱ्या ह्या मीटिंगमध्ये या वर्षी जवळपास १६,००० लोकं येणार होती. पहिला दिवस हा Shareholders साठी आपापली नोंदवणूक करण्यासाठी होता. दुसरा दिवस हा प्रत्यक्षात वॉरेन बफेट यांना पाहण्याचा आणि संवाद साधण्यासाठी होता आणि तिसरा दिवस हा “5K Run” म्हणजेच धावण्या- चालण्यासाठी होता. सर्वांना मिळालेल्या माहितीपत्रकात संपूर्ण कार्यक्रम मजेशीर पद्धतीने मांडलेला होता. या माहितीपत्रकाची सुरवात “Invest in Yourself” या ब्रीदवाक्याने झालेली दिसली. गुंतवणूकदारांसाठी ओमाहात अनेक ठिकाणी सवलती सुद्धा उपलब्ध करून दिल्या होत्या.

मीटिंगचा दिवस सकाळी ७ वाजता सुरु झाला. आसनव्यवस्था आरक्षित नसल्यामुळे अनेक लोकं रात्री १०-१२ वाजेपासूनच रांगेत उभे होते. त्या पैकी अनेक लोकं गरीब होते. त्यांची विचारपूस केली तेव्हा लक्षात आले की त्यांना रात्री पासूनच रांगेत उभं राहण्याचे पैसे मिळत होते. ती रक्कम $२०० ते $५०० इतकी होती. भारतीय चालनामध्ये ते १५,००० ते ३५,००० रुपये होतात. या मिटिंग मध्ये अनेक श्रीमंत लोकं असल्यामुळे ते ही किंमत द्यायला तयार असतात. कार्यक्रमाच्या ठिकाणी ३-४ प्रवेशद्वार होते. प्रत्येक प्रवेशद्वारासमोर सुमारे एक किलोमीटर लांबीच्या रांगेत लोकं उभी होती. माझ्यासाठी हे अभूतपूर्व क्षण होते.

बफे यांनी आयुष्यात गरिबी कडून श्रीमंतीकडे वाटचाल केली. पेपर वाटण्यापासून सुरवात करून ते आज जगात तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. कार्यक्रमात बफेट यांनी अनेक महत्वाची वाक्ये लोकांसमोर मांडली. त्या पैकी एक, “मी श्रीमंत होईन यावर मी कधीही संशय घेतला नाही” हे होते. बफे हे एक खंबीर व्यक्तिमत्व आहे. त्यांनी उचललेल्या पावलांच्या दीर्घकाळी परिणामांची त्यांना पुरेपूर जाणीव आहे. “आपण काय करत आहोत याची जाणीव असेल तर भरमसाठ कंपन्यांचे शेअर्स विकत घेणे आवश्यक नसते.” त्यांचे वय ८८ वर्षे असूनही आज देखील ते बाजाराच्या चढ-उतार यांमधून नवीन गोष्टी शिकतात आणि आपल्या गुंतवणुकीचे धोरण सुधारतात. “श्रीमंत होणे याचा अर्थ आर्थिकदृष्ट्या सुखी होणे असे नव्हे. दैनंदिन खर्चांव्यतिरिक्त बचत आणि आपत्ती काळात आपल्याकडे किती वित्त शिल्लक आहे हे आपल्या मनाची आर्थिक शांती ठरवतात.” आर्थिक मंदीच्या काळात घाबरून जाऊ नका, त्याकडे संधी म्हणून बघा.

बफे जेवढे मोठे गुंतवणूकदार आहेत तेवढीच त्यांच्यात माणुसकीसुद्धा आहे. आलेल्या लोकांसाठी भोजनाच्या व्यवस्थेत बफे यांनी स्थानिक व्यावसायिकांना प्राधान्य दिले होते. आपण पैसे कमवतो तेव्हा दुसऱ्यांनाही पैसे कमावण्यात मदत करावी याचे बफे हे उत्तम उदाहरण आहेत. बफे ओमाहाच्या साध्या घरात राहतात. तुम्ही दुसऱ्या एकाद्या ठिकाणी भव्य घरात का राहत नाही असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर त्यांनी “मी इथे आनंदी आहे, जेव्हा दुसऱ्या ठिकाणी आनंद मिळेल तर मी तिथे राहीन.” असे दर्जात्मक उत्तर त्यांनी दिले.

परदेशांत शिकण्यासाठी जायचंय? करियर घडवायचंय?

कोणताही बडेजाव न करता ही मिटिंग व्यवस्थित पार पडली. मला त्याचे साक्षीदार होता आले याचा खूप आनंद वाटतो. जो स्वतः वर आणि आयुष्यावर प्रेम करतो तो प्रत्येक क्षणी काही ना काही शिकत असतो. हे शिकणे खूप महत्त्वाचे आहे. Couchsurfing असेल किंवा बर्कशायरची बैठक, शिकणाऱ्या लोकांची ती खरी विचारपीठे आहेत असे मला नेहमी वाटते. मी विद्यापीठात शिकतो जे मला एखादया विषयात शिक्षित करेल, पण जीवनाच्या अशा विचारपीठात माणूस होता येते आणि विचारशील बनता येते. मी योग्य ठिकाणी आल्याचा आणि योग्य वेळी स्वतः योग्य निर्णय घेण्याचा मला आज मोठा अभिमान वाटतो. माझ्या स्वतःच्या वाढदिवशी याहून कोणती मोठी भेट स्वतःला देऊ शकलो असतो…

– शिवम् गायकवाड

Copyright © Shivam Gaikwad. All rights reserved.

Published by Shivam Gaikwad

An enthusiastic Marathi writer sharing experiences of studying abroad.

One thought on “काऊचसर्फिंग- जागतिक संधींचे माहेरघर

  1. शिवम, छान साध्या शब्दात खूप सकस लिहिले आहेस. असेच लिहीत रहा. बर्कशायर च्या कार्यक्रमाविषयी अधिक वाचायला आवडेल.

Leave a Reply