केला स्वयंपाक आणि वाढलं प्रेम!

Written February 19, 2019

अमेरिकेत माझ्यासाठी येणारी पहिली व्यक्ती म्हणजे अमोल. आम्ही भारतातही अशी भटकंती केली आहे की, जिने आम्हाला आयुष्याकडे पाहण्याची वेगळी दृष्टी दिली. आम्ही पर्यटक म्हणून न फिरता प्रवासी म्हणून भटकलो, त्यामुळे आम्हाला आलेले अनुभव खूप वेगळे ठरले.

मला वाटतं की, कोणत्याही हेतू शिवाय केलेला प्रवास हा आपल्या आयुष्यासारखा असतो. डायनॅमिक. रोज बदलता आणि अगदी सारखा सरप्राईज करणारा असा. पर्यटन तुम्हाला घड्याळाशी बांधून टाकतं आणि तुम्ही यांत्रिक फिरत राहता. अमेरिकेत आल्यावर दुसऱ्या दिवसापासून फिरणारे पर्यटक मी पाहतो आणि त्यांच्या त्या जेटलॅग झालेल्या परिस्थितीत त्यांना फिरताना पाहून नेहमी दुखावतो. असं नसतात फिरत. प्रेक्षणीय स्थळे बघितली म्हणजे झालं का? असं नसतं. मी आर्थिक बाजू समजू शकतो. पण कमी काळात काय बघून होतं? हा प्रश्नही पडतो. टप्प्याटप्प्याने देश बघता येतो. थोडं थांबून परिसराशी आणि लोकांशी एकरूप होऊन फिरण्याची म्हणजेच भटकण्याची मजाच काही और आहे. ही मजा आम्ही अनुभवतो.

आम्ही ओमाहा पूर्णपणे फिरलो. रोज थोडेथोडे. स्थानिक मेट्रो बस, टॅक्सी आणि पायी फिरण्याची मजा अनुभवली. सगळी बस टर्मिनल अनुभवली. बसने आठ तास प्रवास करत शिकागोला गेलो. जाताना आजूबाजूला असलेली शहरे बघितली. शिकागो मध्ये मेट्रो ट्रेन, बस, डेकट्रेन, टॅक्सी आणि पायी भरपूर फिरलो. शिकागो पूर्ण अनुभवलं. शिकागोहून ओमाहाला परतताना आम्ही ऍमट्रॅक ट्रेन निवडली. या प्रवासावर मी नंतर लिहितो. सांगण्याचा मुद्दा असा की, प्रवासी होऊन प्रवास करणे आणि सगळं अनुभवणे आपल्याला माणूस बनवते.

आम्हाला दोघांना खाण्याची खूप आवड आहे. सगळीकडची रेस्टॉरंट आमचा आवडीचा विषय. ओमाहा ते आयोवा ते शिकागो अशी सगळीकडच्या प्रसिद्ध रेस्टॉरंट्समध्ये आम्ही गेलो. अमेरिका हा जगाचा ‘मेलटिंग पॉट’ आहे. त्यामुळे जगभरातील सगळे खाद्यपदार्थ इथे मिळतात. दरम्यान ओमाहात इटालियन अन्नाचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही ‘ऑलिव्ह गार्डन‘ या रेस्टोरंटमध्ये गेलो होतो..
उत्तर अमेरिकेत चालणाऱ्या अनेक नामवंत रेस्टोरंट चेन्समध्ये ऑलिव्ह गार्डनचाही समावेश होतो. हे रेस्टोरंट ‘चेन’ (साखळी- जसे की मॅकडॉनल्ड्स) श्रेणीतील असले तरी उत्कृष्ट दर्जाचे ताजे आणि चविष्ट इटालियन अन्न येथे मिळते. इटालियन लोकं मला फार आवडतात. अगदी हसतमुख आणि तब्येतीत असणारे हे युरोपियन लोक युरोपात असूनही शांत जीवन जगतात याचं फार कौतुक वाटतं. त्यांच्या खाण्यात कमीतकमी तिखट असतं हेही आवडतं. ऑलिव्ह तेल, भरपूर भाजीपाला आणि उत्तम प्रतीचा मांसाहार हे त्यांचे वैशिष्ट्य आहे जे मला फार आकर्षित करतं. दैनंदिन जीवनात पिझ्झा आणि पास्ता याव्यतिरिक्त मी याआधी इटालियन अन्न चाखले नव्हते. ताजे इटालियन अन्न आरोग्यपूर्ण असतं हे माहित होतं पण अतिशय चवदार आणि खमंग असतं याची मला कल्पना नव्हती. ऑलिव्ह गार्डनमुळे हा अनुभव शक्य झाला.

परदेशांत शिकण्यासाठी जायचंय? करियर घडवायचंय?

फक्त उत्कृष्ट अन्नच नव्हे तर उत्तम हॉस्पिटॅलिटी सुद्धा आम्ही येथे अनुभवली. आम्हाला सर्व्ह करणाऱ्या वेट्रेसला येथील फूड मेनूची बारीक
माहिती होती. आमचे प्रश्न सोडवण्यापलिकडे तिने कोणती डिश निवडावी याचे मार्गदर्शनही केले. सलाड, सॉस, सूप, पास्ता आदि यांचं मार्गदर्शन केलं. अन्नासोबत प्रेम आणि काळजी आम्हाला सर्व्ह केली गेली. काही क्षण आम्ही खरंच हॉटेलमध्ये आलो का? अशी शंका आली. 
चांगलं अन्न आणि उत्तम सेवा आपल्याला डिलाईट करतं. ते समाधानापेक्षा मोठं असतं.

भारतातही उत्कृष्ट अन्न मिळते यात शंका नाही. पण रेस्टॉरंट्सनी अन्नासोबत आपल्या मेनूमध्ये
हॉस्पिटॅलिटीचाही समावेश करावा असे मला वाटते. आपण खातो त्या अन्नाचा दर्जा, पाकक्रियेत वापरलेला प्रेम हा घटक आणि काळजीपूर्वक सर्व्ह करण्याची पद्धत या सर्व बाबी आपल्या दैनंदिन वागणुकीत आणि विचारसरणीत खोलवर परिणाम करतात हे मी ऑलिव्ह गार्डनच्या अनुभवातून जाणले आहे. निरोगी वाटणे, निरोगी असणे आणि
निरोगी जाणवणे हे दिसायला जरी एकच असले तरीही तीन वेगळे पैलू आहेत. ते जाणायचे असतील तर अन्न अंगी लागायला हवं आणि ते उत्तम पद्धतीने सर्व्ह व्हायला हवं, नाही का?
ती जाहिरात आठवते ज्यात म्हटलं गेलंय की, बनाइये खाना और परोसिये प्यार!

– शिवम् गायकवाड

Copyright © Shivam Gaikwad. All rights reserved.

Published by Shivam Gaikwad

An enthusiastic Marathi writer sharing experiences of studying abroad.

Leave a Reply