खेळता खेळता आयुष्य

Written September 8, 2018

क्रीडा आणि शारीरिक व्यायाम या बाबी अमेरिकन लोकांच्या रक्तात आहेत. शरीर सुदृढ असेल तर मन सुदृढ राहिल यावर त्यांचा विश्वास आहे. आरोग्याच्या बाबतीत तरुण अमेरिकन खूप जागरूक आहेत. २००७ सालानंतर मात्र सगळ्याच वयोगटातील लोकं अधिक जागरूक होऊ लागले. त्याला कारणही तसेच गंभीर होते. याच वर्षी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) केलेल्या सर्व्हेमध्ये असे दिसून आले की, तीन चतुर्थांश अमेरिकन स्थूल आहेत. आता संपूर्ण अमेरिकेत योगापासून ते जिमपर्यंत एवढा विस्तार झाला आहे की बस्स. यंदाच्या जागतिक योग दिवसाला तर मी भारतापेक्षा अधिक उपक्रम अमेरिकेत बघितले आहेत. मी राहतो त्या ओमाहात हीच परिस्थिती आहे. 

 मनाला सुदृढ ठेवण्यासाठी हे लोक खूप दक्षता घेतात. इथलं हवामान अनिश्चित असतं पण काही दिवस सोडता थंडी कायम असल्यामुळे  लोकांना ‘डेन्स कॅलरी’ अन्नाचे सेवन करणे आवश्यक असते. येथील खाणे प्रामुख्याने मांसाहारी आहे. खाण्यासोबत दुधाचे विविध उपप्रकार जसे की दही, योगर्ट, चिज  आणि शीतपेये यांच्या सेवनामुळे अतिरिक्त चरबी सुद्धा वाढते म्हणून येथे व्यायामाला खूप महत्व आहे.  व्यायाम खुल्या वातावरणात करण्याला प्राधान्य दिले जाते.  प्ले-ग्राऊंडस् म्हणजे जणू कम्युनिटी एरिया! लोकं जमतात. एकाच प्रकारचे कपडे घालतात. खेळाडूंना प्रोत्साहन देता देता फॅमिली टाइम उपभोगतात. तरुण आणि मध्यमवयीन लोकं अतिशय मेहनत घेतात. त्यांचे अगदी साधे साधे खेळ बघितले तरी आपल्याला सहज लक्षात येते की खरोखरच यांच्या रक्तात खेळ आहे. लोकं श्रमजीवी असतात, काही बुद्धिजीवी असतात पण इथली लोकं खरंच ‘क्रीडाजीवी’ आहेत. 

असाच अमेरिकी मातीतल्या अस्सल  क्रीडांपैकी एक म्हणजे अमेरिकी फुटबॉल. होय, हा तोच खेळ जो म्हणायला फुटबॉल पण हाताने खेळला जातो. या खेळाचे मूळ म्हणजे एका संघाने फुटबॉल दुसऱ्या संघाच्या बाजूला जेवढ्या दूरवर नेता येईल तेवढ्या दूरवर घेऊन जायचा. नंतर एका सीमेजवळ तो जमिनीवर ठेवायचा. या दरम्यान तो फुटबॉल विरोधी संघ हिसकावण्याचा प्रयत्न करतो.  हा  खेळ खेळाडूंना व प्रेक्षकांना प्रचंड आनंद देतो आणि मुख्यतः विद्यापीठांतर्गत खेळला जातो. हा खेळ ऑगस्ट महिन्याच्या शेवटापासून ते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेळतात. 

अमेरिकेच्या नेब्रास्का प्रांतातल्या फुटबॉल संघाचे नाव ‘नेब्रास्का कॉर्नहस्कर्स’ असे आहे. पण सर्वसाधारणपणे उच्चार ‘हस्कर्स’ एवढाच करतात. या संघाने त्यांचा पहिला खेळ १८९० साली खेळला. हस्कर्स फुटबॉल हा अमेरिकेतला एकमेव संघ आहे ज्याने सुमारे ४० वर्षांमध्ये जेव्हाही सामना खेळला तेव्हा प्रत्येक वेळी स्टेडियम तुडुंब भरलेले होते. जे प्रेक्षक हस्कर्सचे समर्थन करतात ते लाल रंगाचे कपडे घालतात म्हणून जेव्हा हस्कर्स गेम खेळतात तेव्हा स्टेडियमला ‘द  सी ऑफ रेड’ म्हणजेच लाल रंगाचा समुद्र असा उल्लेख केला जातो. ही परंपरा आजही टिकून आहे. 

हस्कर्सचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा संघ एके काळी अमेरिकेतला सर्वोच्च मानांकित संघ होता. या संघाच्या काही प्रसिद्ध प्रथा आहेत. त्या म्हणजे खेळ सुरु व्हायच्या आधी खेळ चांगला व्हावा म्हणून दोन्ही संघ एका घोड्याच्या नालेला स्पर्श करतात. प्रेक्षक सुद्धा खेळ सुरु होण्यापूर्वी ५-६ तास एकत्र घालवतात. खेळ सुरू होण्याआधी पासून ते खेळ संपल्यावरही खेळाच्या प्रत्येक गोष्टीला फॉलो करतात. अशा प्रसंगांना ‘टेल गेटिंग’ असे म्हणतात. आठवडाभर काम करून अखेरीस कुटुंब आणि स्वतः साठी वेळ देणारी ही लोकं क्रीडेच्या बाबतीतही तेवढीच एकनिष्ठ असतात. त्यांचे आयुष्य खेळांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. 

थोडक्यात, माझ्या निदर्शनास हे आले की, अमेरिकेत ‘क्रीडा संस्कृती’ आढळून येते व ती आवर्जून जपली सुद्धा जाते. 

नुकत्याच झालेल्या “आशियायी गेम्स २०१८” मध्ये भारताने विविध क्रीडांमध्ये एकूण ६९ पदके पटकावली. यात अॅथलेटिक्स, तिरंदाजी पासून  बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी ते कबड्डी इत्यादी क्रीडांचा समावेश होता. आपल्याकडे खेळांविषयी निश्चित धोरण नाही. खेळाडूंना अपार मेहनत करत आणि विविध समस्यांना तोंड देऊन खेळावं लागतं हे जगजाहीर आहे. शालेय पातळीपासून ज्या गंभीरपणे खेळांना घेतलं पाहिजे तसे होताना दिसत नाही. मार्कांसाठी खेळतात मुले. गावपातळीपासून महानगरांपर्यंत राजकारणाने खेळांना दाबून टाकले आहे. निधी मिळत नाही. मिळाला तर उपयोग होत नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत भारतीय खेळाडूंची कामगिरी कौतुकास्पदच आहे. 

परदेशांत शिकण्यासाठी जायचंय? करियर घडवायचंय?

भारतात सर्वाधिक खेळला आणि पाहिला जाणारा गेम म्हणजे क्रिकेट. आपण क्रिकेट एकत्र येण्यासाठी व नाते घट्ट करण्यासाठी खेळतो व पाहतो असे म्हणतो, परंतु वस्तुस्थिती काही वेगळीच दिसून येते. भारत पाकिस्तान सामने होतात तेव्हा जणू युद्धच होते. एकमेकांच्या खेळाडुंचे कौतुक करणे म्हणजे मोठी जोखीम झाली आहे. छोट्या मोठया कारणांवरून वाद होतात. लोकं पूर्वग्रहाशिवाय खेळ पाहत नाहीत; जीवनाकडे कसे पाहतील?

एके ठिकाणी मी हे वाचलेलं आठवतं, आयुष्य म्हणजे खेळ खेळता जगलेले जीवन आणि त्यापासून पलायन म्हणजे थेट मरण.

अमेरिका आणि भारत यांच्यात खेळांविषयी तुलना होऊ शकत नाही कारण तुलना तुल्यबळ लोकांत होते. दोन्ही देश वेगळे आहेत. चालीरीती आणि संस्कार आणि सामाजिक मुद्दे आपले वेगळे आणि त्यांचे वेगळे. खेळ जगाला एक करतात. संवाद साधायला मदत करतात. वेगळेपणाची भावना काढून टाकतात. आपल्याकडे खेळांच्या बाबतीत ग्रामीण विभागातील मुलांना दुर्लक्षून चालणार नाही, कारण येथील मुले सर्वच ठिकाणी आपले प्राविण्य सिद्ध करत आहेत. राजकीय फायदा आणि कोणाच्या तरी मोठेपणासाठी क्रीडा धोरण दडपून काही होणार नाही. खेळण्यासाठी आयुष्य हे आयुष्याचा खेळ होण्यापेक्षा  कधीही चांगले, नाही का?


– शिवम् गायकवाड

Copyright © Shivam Gaikwad. All rights reserved.

Published by Shivam Gaikwad

An enthusiastic Marathi writer sharing experiences of studying abroad.

Leave a Reply