गोदावरी ते मिसौरी

Written August 18, 2018

मी अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील ओमाहा येथे शिकत आहे. रोजच्या धावपळीतून थोडी मोकळीक म्हणून फेरफटका मारणे मला नेहमीच ताजेतवाने करते. एकदा असेच फिरत असतांना माझी आणि मिसौरी नदीची ओळख झाली. ओमाहा हे शहर मिसौरी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. एका बाजूला ओमाहा आणि दुसऱ्या बाजूला आयोवा राज्यातील कौन्सिल ब्लफ आणि मधोमध मिसौरी नदी अशी रचना आहे. एकदा असेच ओमाहात भटकंतीला निघालेलो असताना मिसौरीवरील प्रसिद्ध ‘बॉब केरी’ पादचारी पुलावर येऊन पोहोचलो. हा पूल मिसौरी नदीला पार करत नेब्रास्का व आयोवा ह्या प्रांतांना जोडतो. ओमाहा-कौन्सिल ब्लफ विभागाचे नयनरम्य दृश्य या पुलाहून दिसते. मी गेलो तेव्हा होता हाडे गोठवणारा हिवाळा. अगदी -२७ अंश सेल्सिअस तापमान होते. अशा या हिवाळ्यात सुरूवातीला नदीचे तीर गोठतात परंतु नदीच्या मधोमध पाणी नेहमीच वाहते. शहराच्या आसपास असलेल्या झऱ्यांमुळे नदी पूर्ण गोठत नाही. अतिशीत वातावरणात पाण्याच्या पृष्ठभागावर बर्फाचा पातळ थर जमा होतो; तरीही आपली नजर चुकवून नदीचे पाणी बर्फाच्या खालून वाहत राहते. 
अनेक बाधा असूनही वाट काढत पुढे जाणाऱ्या मिसौरीला बघत असताना मात्र त्यावेळेस माझ्या डोळ्यांसमोर गोदावरीच आली. माझे पाय त्या ठिकाणी खूप वेळ टिकून राहिले. बॉब केरी पूल नाहीसा होऊन मी जणू गोदेच्या अहिल्याबाई होळकर पुलावरच उभा आहे, असे मला वाटू लागले. ओमाहामध्ये अनेक भारतीयांशी गाठी-भेटी झाल्या, पण ‘आपला माणूस’ नाही भेटला. तोच ‘आपला माणूस’ मिसौरी सोबत उभं असतांना मला जाणवला. भेटला. अगदी वर्षांची ओळख असल्याप्रमाणे! त्यानंतर अनेकदा अमेरिकेतल्या अहिल्याबाई होळकर पुलावर माझी पावले वळली. मिसौरी, गोदावरी आणि माझे आपुलकीचे नाते आणखी घट्ट होत गेले. एखाद्या रविवारी सहज वेळ असतांना नदी काठी जाऊन गाणी ऐकण्यात वेगळाच आनंद मिळायला लागला. कालांतराने माझा नदी व स्वतः सोबतचा संवाद वाढत गेला. कामानिमित्त पूल ओलांडतांना एकमेकांना अभिवादनसुद्धा करायला लागलो. अमेरिकेत राहून वाहत राहण्याची समृद्धी मिसौरीने माझ्याकडे व्यक्त केली. अमेरिकेत जाऊन जसे आईच्या हातच्या जेवणाची किंमत कळाली तसेच मिसौरीला पाहून गोदेचे महत्व उमजले. 
माझ्या आणि नाशिकच्या बांधिलकीचे कारण म्हणजे फक्त गोदावरी! कुंभमेळ्यात आणि कॉलेज संपल्यावर अनेकदा रामकुंडावर जाऊन गोदेचे दर्शन घेण्याचे दिवसभर अप्रूप राहायचे. तिला भेटले कि वेगळाच आनंद गवसायचा. कुंभमेळयात जाऊन फोटोग्राफी करणे सुद्धा मला खूप आवडायचे. माझ्या अंतर्मुख स्वभावामुळे मी लोकांशी कमीच बोलतो पण मी टिपलेले कुंभमेळ्यातले फोटो मात्र खूप काही सांगतात. मागील कुंभमेळ्यात तशी कमीच लोकं आली. गोदेसाठी आवश्यक वाटते ते वाहत राहणे. कारण ती वाहत नसली तर तिच्याकडे बघवत नाही. तिला वाहते ठेवणारे लहान ते मोठे मुख्य स्रोत कॉंक्रीटीकरणामुळे नष्ट झाले आहेत. त्यामुळे आपली गोदावरी माणसाने सोडलेल्या धरणातील पाण्याशिवाय वाहू शकत नाही याची खंत वाटते. अमेरिका पुष्कळ अंगानी भारतापेक्षा पुढे असूनही तेथील नद्या मात्र अजून आटलेल्या नाहीत. आपल्याइतक्या तेथील नद्या प्रदूषित अजिबात नाहीत. तेथील लोकं कायदे पाळतात. नद्या आणि जलस्रोत सांभाळतात.
मिसौरीचा उगम तीन नद्या एकत्र येऊन होतो. त्या म्हणजे जेफरसन, मॅडिसन आणि गॅलेटीन या नद्या होय. ही नदी मोन्टाना, नॉर्थ डकोटा, साऊथ डकोटा, नेब्रास्का, आयोवा आणि कॅन्सस ह्या अमेरिकी प्रांतांतून वाहत जाऊन शेवटी मिसौरी राज्यातील सेंट लुई ह्या शहरामधल्या मिसिसिपी नदीला जाऊन मिळते. सुमारे ३८०० किलोमीटर वाहून आल्यानंतरही मिसौरीचे पाणी अतिशय स्वच्छ असते. त्यावर मोठी शहरे आहेत. औद्योगिक पट्टे आहेत. पण नदी स्वच्छ आहे. याचे मुख्य कारण म्हणजे अमेरिकेतील स्थानिक स्तरावर सतत कार्यरत असणारे अनेक सांडपाणी प्रक्रिया केंद्रे (STP). नाल्यात सोडलेली कोणतीही वस्तू व रसायने या केंद्रातून योग्य ती प्रक्रिया पूर्ण होऊनच पुढे जातात. त्यामुळे नद्यांना जोडणारी नाले सुद्धा तुलनेने स्वच्छ असतात. अमेरिकेत नद्यांना मिळणाऱ्या अनेक जलवाहिन्यांभोवती कुंपण घातलेलं असते. वाहनातून व रेल्वेने प्रवास करत असतांना नदीत कचरा फेकण्याची मानसिकता तिथे अजिबात नाही. असली मानसिकता आपली आहे आणि ती बदलायला हवी. भारतातही नदी संवर्धनाचे आणि प्रदूषणविरोधात अनेक कायदे आहेत पण त्याची अंमलबजावणी होतांना दिसत नाही. नाशिक स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत आहे. नाशिक म्हणजे गोदावरी आणि गोदावरी म्हणजे नाशिक हे समीकरण आहे. गोदावरी नसती तर नाशिकही नसते. पण, दुर्दैवाने स्मार्ट सिटी धोरणात नदीविषयी काही नाही हे गोदावरी परिक्रमेच्या दरम्यान कळाले आणि वाईट वाटले. मित्रांसोबत बापू पूल आणि गोदापार्क परिसरात यावेळेस गेलो तेव्हा मिसौरी समोर येत होती आणि गोदावरी तिला जवळ घेऊन तिची दुःखे सांगत होती असे वाटून गेले आणि गोदेची परिस्थिती पाहून आणखी वाईट वाटले. स्मार्ट सिटी आणि अच्छे दिन असे येणार आहेत का? असा विकास अपंग नाही का? तिकडे नद्यांना आई मानले जात नाही. तरीसुद्धा नद्यांची अवस्था आणि परिस्थितीकी तंत्र उत्तम आहे हे दिसून येते. इथे आपण गोदामाई म्हणतो आणि नदीला आईचे स्वरूप मानतो आणि त्याच आईच्या छातीवर निर्माल्य टाकतो, गाड्या धुतो, गटारे सोडतो, तीर्थ असूनही रामकुंडात अंघोळीदरम्यान घाण करतो, अन्न फेकतो. एवढेच काय, रोकडोबा चौकापासून ते अमरधाम पट्ट्याला बिनधास्तपणे शौचालय म्हणून वापरतो. आपण आईला असे वागवावे का? हा प्रश्न विचारण्याची हिंमत मला मिसौरीने दिली आहे. गोदावरीच्या पाण्याने माझ्या रक्तातील कणाकणाला पोषण दिले तिला मी काय दिले हा मला पडलेला दुसरा प्रश्न कधी उत्तरला जाणार?


– शिवम् गायकवाड

Copyright © Shivam Gaikwad. All rights reserved.

Published by Shivam Gaikwad

An enthusiastic Marathi writer sharing experiences of studying abroad.

Leave a Reply