ग्राहक बनायचं की ‘गिऱ्हाईक’?

Written August 30th, 2018

मी गेलं वर्षभर अमेरिकेत राहतोय. अमेरिकेत राहून आपलं आपण सगळं व्यवस्थापन करणं हे तितकंसं सोपं नाही. मुळात आपल्या आणि त्यांच्या एकंदर व्यवहारात खूप फरक आहे. माझ्या रोजच्या दैनंदिन गरजा इथल्या लोकल स्टोअर्समधून पूर्ण होत असल्या तरी भाजीपाला आणि किराणा सामानासाठी एक तर मला ओमाहा शहरात डाउन टाऊन मधील जुन्या बाजारात जावे लागते नाहीतर शहराबाहेर असलेल्या वॉलमार्ट मध्ये! नाही म्हणायला काही भारतीय दुकाने आहेत पण तो फारशी उपयोगाला येत नाहीत कारण त्या वस्तू मी घरूनच आणलेल्या आहेत.

ओमाहा हे शहर अमेरिकेचे ‘ट्रान्सपोर्ट हब’ असल्याने सर्व दिशांतून उत्तमोत्तम माल इथे येतो. वॉलमार्ट हे केवळ स्टोअर नसून एक वेगळी दुनियाच आहे. इथे येणारा प्रत्येक माणूस काहिनाकाही विकत घेतोच. मॉल संस्कृती नवी नाही इथे.
मी ओमाहात आल्यावर माझा पहिला संपर्क आला तो वॉलमार्ट आणि इथल्या बाजाराशी.

त्याबद्दल काही सांगण्याआधी मला भारतातील एक गोष्ट आठवते. आम्ही मित्र जेव्हा मजा म्हणून बाहेर खायला जात असू तेव्हा एकमेकांत काहीतरी पैज लावत असू. ती साधारणपणे अशी होती की, जो हरेल तो सगळा खाण्याचा खर्च करेल. तशी साधी सोपी पैज. पण पॉकेटमनीतून एकरकमी पैसे जायचे तेव्हा भारी दुःख व्हायचे हेही खरे आहे बरं का. तर अशी पैज जो हरायचा तो आमच्यासाठी ‘गिऱ्हाईक’ असायचा. कारण आम्ही त्याला खर्च करायला भाग पाडायचो. आता ही आमच्यातली मजा मजा असायची. थोडक्यात, गिऱ्हाईक बनणे म्हणजे वेड्यात निघणे. म्हणजे आमच्या दृष्टीने असाच अर्थ आहे.

मी नवखा असताना पहिल्यांदा गेलो तो बाजार म्हणजे डाउन टाऊन मधील ओल्ड मार्केट. बाजार कसला तो! अगदी व्यवस्थित असलेली अनेक जुनी दुकाने. हा भाग खूप जुना आहे पण तो तसा आहे हे दुकानांचे फलक वाचले की लक्षात येते अन्यथा शंभर वर्षे जुने दुकानही काळाप्रमाणे बदलले आहे हे दिसून येते. इथली रेस्टॉरंट छान आहेत. जवळच दर विकेंडला स्थानिक शेतकरी त्यांचा ताजा माल ज्यात फळे, भाज्या, ब्रेड आदी वस्तू विकायला घेऊन येतात. मी नाशिकरोड येथे राहायचो. गावात चार मोठे भाजीबाजार. गलिच्छ आणि अव्यवस्थित बाजार पहायची सवय लागली इतकी वर्षे, शिवाय मी ठाण्यात आजोळी जायचो तिथेही जवळपास हीच परिस्थिती आहे. पण ओमाहा आठवडी बाजार बघितला आणि मला धक्का बसला. टापटीप आणि सगळं कसं बारकाईने कायदेशीर काम. पॅकिंग आणि स्वच्छता डोळ्यात भरणारी.
आपले ग्राहक हे ग्राहक नसून गिऱ्हाईक बनतात हे मला इथपासून जाणवायला लागलं.

आपण एक्स्पोर्ट करून शिल्लक राहिलेला माल ‘गावठी’ म्हणून घेतो. इकडे आल्यावर मला ताजा आणि ऑरगॅनिक भाजीपाला फळे काय असतात हे समजलं. कीटकनाशके आणि तणनाशके न वापरता चांगला भाजीपाला करता येतो हे मला इथे कळलं. जवळच असलेल्या अकसरबान या लहानशा खेड्यात माझे विद्यापीठ विद्यार्थ्यांना तिथे जायला प्रोत्साहित करते. एक उत्तम ग्राहक कसे बनावे आणि विक्रेत्याला उत्तम व्यवसाय करून पोटपाणी कसे उत्तम करता येईल यासाठी विद्यापीठ पातळीवरून सामाजिक बांधिलकी म्हणून विविध कार्यक्रम आणि मोहिमा होतात. वजन माप आणि पॅकिंगमध्ये कोणतीही कुचराई अमेरिकन लोकांना चालत नाही. तसे झाले तर विक्रेत्यांची काही धडगत नसते. ग्राहक संरक्षण कायदे चांगलेच कडक आहेत. जन्मभर विक्री करायला मनाई होऊ शकते अशी अंमलबजावणी आहे. आपल्याकडेही ग्राहक संरक्षण कायदा आहे पण त्याची अंमलबजावणी कशी होते हे सगळ्यांना माहिती आहेच.

परदेशांत शिकण्यासाठी जायचंय? करियर घडवायचंय?

आता वॉलमार्टकडे वळूया. वॉलमार्ट म्हणजे टाचणी ते उपग्रह काहीही वस्तू मिळणारे एक अतिशय मोठे असे स्टोअर. अमेरिकेत प्रत्येक महत्त्वाच्या शहरात आणि गावात वॉलमार्ट आहेत. ओमाहा मधील वॉलमार्ट एका अजस्त्र आवारात आहे. एकावेळी हजारो लोकं खरेदी करू शकतील अशी व्यवस्था आहे. मी नुकताच भारतात येऊन गेलोय. १५ ऑगस्ट निमित्त वेगवेगळ्या ठिकाणी लागलेले सेल बघून आणि लोकं अवास्तव खरेदी करतात हे बघून मी चक्रावून गेलो. एक ठिकाणी तर मी स्वस्त आहे म्हणून बास्केट भरून बिस्किटं घेणारे ग्राहक बघितले आहेत. आपल्याकडे दोन वस्तू घ्या त्यावर २०% सूट, तीन घ्या तर ३३% सूट आणि चार घ्या तर ५०% सूट अशी खिसे खाली करणारी व्यवस्था तयार झाली आहे. यात आपण सरळ गिऱ्हाईक बनतो. आपले सेल खोटे असतात. जुना माल काढायची शक्कल असते. तसेच एकादी वस्तू गरजेची नसतांनाही ती कमी किमतीत आहे म्हणून तिला गरज बनवून विकत घेणे वायफळ खर्चांना आमंत्रण देते.

वॉलमार्ट मध्ये ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘स्वातंत्र्य दिवस’, ‘थँक्सगिव्हिंग’ आणि ‘हॅलोविन’ या दरम्यान मोठमोठे सेल लागतात. लोकं या सेलसाठी बचत करतात आणि अतिशय बारकाईने आवश्यक तेवढी खरेदी करतात. त्यात त्यांचा २५ ते ७०% खरा फायदा होतो. अमेरिकेत लोकं पैसे उधळतात हे अजिबात खोटे आहे. लोकं खूप तयारी करून आणि दर, सेवा आदी गोष्टी पारखून घेऊन खरेदी करतात आणि काटकसर करतात. ऐकून आश्चर्य वाटलं ना? पण ते सत्य आहे. अमेरिकेची नवी पिढी ग्राहक अधिकारांबाबत खूपच जागरूक आहे. त्यांची फसवणूक होत नाहीच; पण झालीच तर कायदा विक्रेत्यांना चांगला धडा शिकवतो. परवाने खरेखुरे रद्द होतात.

अमेरिकेत ऑनलाइन सेल्सचा बाजारही खूप मोठा आहे. पण, तिथेही स्पर्धात्मक वातावरण असल्याने ग्राहकांच्या समाधानासाठी कंपन्या झटतात हे मी अनुभवले आहे. ग्राहकाला कुठलेही प्रश्न विचारायचे नाहीत अशी इथली व्यवस्था आहे. एखादी वस्तू आवडली नाही तर का? असा प्रश्नच नाहीये. ग्राहकाने बिल दाखवायचे आणि दुसरी वस्तू घेऊन जायची. वॉलमार्ट मध्ये घेतलेली वस्तू अगदी महिन्याभराने दिली तरी चालते. आपल्याकडे दुसऱ्या दिवशी गेलो तर हजार प्रश्न विचारले जातात. मी घेतलेला लॅपटॉप आठ दिवसांनी परत करायला गेलो तेव्हा केवळ तो उघडून बघून हसतमुखाने बदली नवा लॅपटॉप मिळाला तो क्षण ग्राहक हा राजा असतो हे शिकवून गेला.

वॉलमार्ट मधून नियमित खरेदी करणाऱ्याला एक कार्ड दिले जाते. त्यातून विविध स्कीम्स राबवल्या जातात. सवलत दिली जाते. क्रेडिट पॉईंट मिळतात. फायदा होत राहतो. पण एक मजेशीर गोष्ट आहे. आपण एखादी वस्तू घेतली तर बाजारात ती वेगवेगळ्या दराची असू शकते कारण स्पर्धा आहे. पण वॉलमार्टमध्ये ‘फेअर प्राईस पॉलिसी’ आहे. समजा आपण एखादी वस्तू घेतली आणि त्यादिवशी वॉलमार्टमध्ये तिचा भाव बाजारापेक्षा जर जास्त असेल तर असे सगळे दर सर्व्हे करून एक सामायिक रक्कम कमी करून ती वॉलमार्ट कार्डात जमा करून दिली जाते. पुढील वेळेस त्या रकमेची वजावट मिळते. आपल्याकडे होईल का असं? शक्य नाही. वॉलमार्ट असं करतं कारण इथला ग्राहक अतिशय जागरूक आहे. किंमत, पॅकिंग तारीख, एक्सपायरी, बॅच नंबर, कंपनीचा ई-मेल आदी बारकाईने पाहूनच तो खरेदी करतो. त्यात कुचराई झाली की कायदा बडगा उगारतो. आपल्याकडचे मॉल हे फिरण्याचे एअरकंडिशन ठिकाण. बाकी काहीका असेना. फुकट फिरता येते असे आपल्याला वाटते पण त्याची किंमत वसूल केली जातेच. अमेरिकेत हे नसते. स्टोरबाहेर रेक्रीएशन एरिया असतो. तेथे जाऊन मजामस्ती करता येते. स्टोअरमध्ये केवळ व्यवसाय!
अमेरिकेत गरजा कमी करण्याकडे लोकांचा कल वाढत असताना भारतात नेमके उलटे होताना दिसत आहे. इथे निसर्गानुकूल वस्तूंचा काळ आलाय. ऑरगॅनिक वस्तुंना महत्त्व आहे आणि दरही रास्त असतात. आपल्याकडे नैसर्गिक असं सगळंच महाग आहे. पण मी कधी ‘गिऱ्हाईक’ झालो नाही याचा आनंद वाटतो. आपल्याकडे लोकं पैसे खर्चून सुद्धा स्वतःच्या अधिकारांसाठी का लाजतात हेच कळत नाही!

-​शिवम् गायकवाड

Copyright © Shivam Gaikwad. All rights reserved.

Published by Shivam Gaikwad

An enthusiastic Marathi writer sharing experiences of studying abroad.

Leave a Reply