घरट्यातून खोप्याकडे..

Written Semptember 29, 2018

अमेरिका खूप वेगळी आहे. हा देश स्थलांतरितांनी बनवलेला आहे. त्यात जगभराची वैशिष्ट्य आहेत. मला त्यात थोडीशी मुंबई आणि थोडेसे नाशिक दिसते. मुंबई कॉस्मोपोलिटन आहे. नाशिक थोडं वेगळं आहे. पण नाशिक आणि मुंबई दोन्ही माझी घरटी आहेत. अमेरिकेने तेसुद्धा छान सामावून घेतले आहे.  अमेरिका ‘मेलटिंग पॉट’ असल्याने तिथे सगळयातलं सगळं आहे आणि नसलेलं पण आहे. परिपूर्णता असते तसेच काहीतरी!

मी इथे स्थलांतरित आहे म्हणजे ‘नॉन-इमीग्रंट’, ज्यात शिक्षणापूरता काही कालावधी इथे राहायचे आणि नंतर मायदेशी परत जायचे असे आहे. माझे आता तिसरे सत्र सुरू झाले आहे. नवीन मुले आता पहिल्या सत्रासाठी जगभरातून दाखल होत आहेत. आता मी थोडा सिनियर झालो आहे. 

दहा दिवसांपूर्वी अचानक मला माझ्यासारखा एक भारतीय मुलगा भेटला. अमेरिकेत पहिल्यांदा आलेला. सुरुवातीला काही दिवस कोणा नातलगाकडे राहिला. पुरता अपेक्षाभंग झाला आणि थोडा लवकरच कॉलेजात दाखल झाला. माझ्याचसारखा. पण सुदैवाने मला इथे चांगलं कुटुंब भेटलं आणि मी स्थिरावलो. त्याला तसं काही मिळालं नाही म्हणून तो भांबावला होता. मला अचानक भेटला आणि त्याला हायसं वाटलं. मला जमेल तशी मदत केली आणि त्याचं बीज अलगद जमिनीत रोवायला कारणीभूत ठरलो. कसं असतं ना! माझा आता चमत्कारावर विश्वास बसत चाललाय. 

त्याला परवा परत भेटलो आणि गप्पाटप्पा झाल्या.  माझ्या डोळ्यासमोर घरटं आणि खोपा दोन्ही येऊ लागलं. घरटं ओबडधोबड असतं तर खोपा खूप छान विणलेला असतो. अगदी जीव लावून सुगरण तो खोपा तयार करत असते तेव्हा मला फार भारी वाटतं. मुलं घर सोडून शिक्षणासाठी बाहेर जातात त्याला आपल्याकडे घरट्यातून पिल्लू उडालं अशी उपमा देतात. खरंच आहे ते. प्रत्येक पिल्लू घरट्यातून बाहेर पडून स्वतःचा खोपा बांधायला बाहेर पडतं असंच मला नेहमी वाटतं. मला एका शिक्षकाने खोप्यासाठी खूप छान शब्द सांगितला होता, घरोंदा! घरट्यातून एकाच वेळी उडता येत नाही. आधी पंखांची तयारी करावी लागते, मग मनाची तयारी करावी लागते. उडायला लागलं की नेमकं कुठे जाऊन पडू हे माहीत नसते. ती भीती असते. मी उडालो एकदाच आणि मग बराच धडपडलो आहे. ओमाहात येऊन आता दोन वर्षे झाली आहेत. आता पंख आणि मन दोन्ही मजबूत झाले आहेत.

ओमाहा मध्ये आलो तेव्हा अगदी नवखा होतो. भारताबाहेर पहिल्यांदाच इतका प्रवास करून इथे शिक्षणासाठी आलो. नवखा असताना एका घराने मला अगदी आपलंसं करून टाकलं. मी एक काऊचसर्फर आहे. त्यामुळे मी कमी वयात भारतात फिरलो आहे. पण परदेशात कुणाच्या तरी घरी जाऊन राहणे जरा कठीणच असते असे मला वाटायचे. पण या घराने मला नाशिकच्या घरट्याची ऊब दिली हे नक्की. 

पिल्लू घरट्यात असते तोपर्यंत त्याचा एक ‘कम्फर्ट झोन’ असतो. त्या सुरक्षा कोषात त्याला अन्न आणि अन्य गरजा आपसूक पुऱ्या करून दिल्या जातात त्या त्याच्या आईवडिलांकडून! घरट्यातले पिल्लू एक दिवस उडणार असते हे पालकांना माहीत असते. पिल्लालाही माहीत असते की इथे कायमस्वरूपी राहायचं नाहीये. एकाच ठिकाणी अधिक काळ राहिलं ना की साचलेपण येतं अशा माझ्या एक शिक्षिका सांगायच्या. तेव्हा ते कळायचं नाही पण आता समजतंय. कम्फर्ट झोन सोडणं तितकंसं सोपं नसतं. मी असे विद्यार्थीच नव्हे तर इतर लोकांनाही पाहिलं आहे जे काहीकाळ बाहेर पडतात. स्वयंपूर्ण होण्याची सुरुवातही करतात. पण, मग असे क्षण येऊ लागतात की तोच कोष पुन्हा खुणावायला लागतो. परावलंबीपण आराम देत असते. आरामाला नाही कोण म्हणतो! शिवाय त्यायोगे गरजा भागू लागतात. माणसाला कशाकशाचे भय असते ते भय या कोषामुळे गायब होते. मग परततात लोकं. मी मात्र ठाम राहायचं ठरवलं आहे.

नाशिकने मला काय दिलं याचा मी विचार करतो तेव्हा मला एक नक्की कळतं की, नाशिक मला बरंच शिकवून गेलं आहे. ना-शिक नाहीये ते. आशिक करून टाकेल ते नाशिक. जगण्याची खोली सांगते ते नाशिक कारण इथे गोदावरी आहे आणि त्रिरश्मी लेणीसुद्धा. नदीची खोली आणि लेण्यांची ‘उंची’ दोन्ही अनुभवता आली मला! आणि याच नाशिकने हेसुद्धा शिकवलं की साचून जायचे नाही तर गोदेसारखे प्रवाही आणि निर्मळ राहायचे. नाशिकला हजारो वर्षांचा इतिहास आहे. अनेक आक्रमणं पचवलीत या शहराने तरीही पाय घट्ट रोवून आहे हे शहर. मी हाच खंबीरपणा शिकलोय इथे. या शहराने ना मला जीवनाच्या दोन्ही बाजू दाखवल्या आहेत. एक बाजू प्रसिद्ध अशा ‘झोर्बा दि ग्रीक’ या निकोस कझान्टझाकीच्या व्यक्तीचे प्रतिनिधित्व करणारी आहे; ज्यात झोर्बा हा भौतिक सुखांना पूर्ण उपभोगतो. ती बाजू वायनरी, हॉटेलिंग आणि मॉल्समधून ठळकपणे दिसली. दुसरी बाजू वैज्ञानिक अंगाने जाणारी अध्यात्मिक बाजू. इथली मंदिरं मला टाइम मशीनमध्ये नेतात. गोदाघाट ऋषीमुनींच्या काळात घेऊन जातो. नाशिकने दोन्ही दाखवलं आहे. माणूस या दोन्ही अंगांशिवाय अपूर्ण राहतो हे मला शिकवले आहे. इथल्या माझ्या घरट्याने हेच बळ दिलं आणि मी थेट उडतच ओमाहाला आलो. 

नाशिकच्या तुलनेत ओमाहा अगदी बाळच आहे. जेमतेम पाचशे वर्षांचा इतिहास आहे. अमेरिकेच्या मधोमध असल्याने ट्रान्सपोर्ट हब आहे तसेच शिक्षणाचे केंद्र बनले आहे. शहर सुनियोजित आहे. उत्तम नागरी व्यवस्था आहे. चांगली लोकं आहेत. आदर्श शहर म्हणावे तसे आहे अगदी. मला ओमाहा हे घरटे न वाटता खोपा आहे असे वाटते. 

परदेशांत शिकण्यासाठी जायचंय? करियर घडवायचंय?

ओमाहात सगळं खूप बारकाईने केलेलं आहे हे दिसतं आणि अनुभवता येतं. अमेरिकेत प्रसिद्ध असलेले नेब्रास्का मेडिकल सेंटर असो नाहीतर विश्वविख्यात बर्कशायर हाथवे, इथे सगळं बारीक विणून घेतलं आहे आणि काळजीपूर्वक बांधले आहे. सुव्यवस्था काय असते ते मी इथे अनुभवलं आहे. नाशिकने काय करू नये हे शिकवलं तर ओमाहाने काय आणि कसं करावं हे शिकवलं आहे. कमालीची सकारात्मकता आहे इथे. परिपूर्ण जीवन जगणं आणि त्यासाठी आवश्यक गोष्टीच करणं हे इथल्या समाजाचे वैशिष्ट्य आहे. सुगरणीची मेहनत घेतली गेली आहे हे पदोपदी कळतं.  माणूस बहुआयामी असू शकतो हे मी इथे राहून शिकतोय. आयुष्यात येऊन काहीतरी केलं पाहिजे. साचलेपण तर अजिबात नको. कारण साचलेपणात मला नेहमी कुणावर तरी अवलंबून राहावे लागते ते दिसतं आणि मी अस्वस्थ होत राहतो. मलाही माझा खोपा तयार करायचाय. माझा माझ्यासाठी पण सगळं सामावून घेणारा. चांगल्याची कदर करणारा आणि वाईटाचे वाईटपण घालवणारा. 

– शिवम् गायकवाड

Copyright © Shivam Gaikwad. All rights reserved.

Published by Shivam Gaikwad

An enthusiastic Marathi writer sharing experiences of studying abroad.

One thought on “घरट्यातून खोप्याकडे..

Leave a Reply