प्रवास, जाणिवेचा…

Written August 2, 2019

।। ओमाहा ते लॉस अँजिलिस ।।

अमेरिकेत शिक्षण घ्यायचे ठरवले तेव्हापासून असलेली हुरहूर आताशा कमी होत आली आहे. रुळतोय आता हळूहळू इथे. अमेरिकेतील माझ्या शिक्षणाच्या पहिल्या टप्प्यातील दोन वर्षे म्हणजेच जवळपास अर्धी डिग्री या उन्हाळ्यात पूर्ण होत आली आहे. गेलेल्या दोन वर्षांनी पुढील आयुष्यात येणाऱ्या अनेक वर्षांची कल्पना दिली आहे. अनेक संधी आणि धोके यांच्या मिश्रणाने मला स्वतःचे विविध पैलू डोळ्यांसमोर उभे राहतांना दिसत आहेत. या मध्ये माझी शक्ती, माझ्या कमतरता, झालेली आणि होत असलेली जडणघडण या सर्वांचीच जाणीव व्हायला सुरवात होतेय. येणाऱ्या शैक्षणिक वर्षांसाठीची योजना आणि आणखी नवीन संधींचा शोध घेण्यासाठी मी अमेरिकेत फिरणे अत्यावश्यक झाले आहे. इंटरनेट कितीही पुढे गेले असले तरी प्रत्यक्ष भेटीत ज्या गोष्टी कळतात, त्या अवर्णनीय असतात. भारतात येण्याआधी लॉस अँजिलिस या शहराला भेट देण्याचा योग आला. भारतात येण्याआधी सुमारे एक आठवडा मी लॉस अँजिलिस मध्ये जाऊन राहायचे ठरवले आणि त्याप्रमाणे जाऊन आलो.

ठरल्या प्रमाणे मी आरक्षित केलेले विमान ओमाहाहून अगदी वेळेवर निघाले. लॉस अँजिलिस हे ओमाहाच्या वेळेच्या तुलनेत २ तास मागे आहे व ओमाहा ते लॉस अँजिलिस ही फ्लाईट सुद्धा साधारण तेवढाच वेळ घेत असल्यामुळे मी ज्या वेळेला ओमाहामधून निघालो, त्याच वेळेवर लॉस अँजिलिस मध्ये येऊन पोहोचलो. विमानातून येतांना शहराच्या जवळ उंचीहून अनेक शिखरे नजरेत पडली. या पर्वतांनी मला आपल्या मुंबई जवळील सह्याद्रीची आठवण करून दिली. या शिखरांचा आकार आणि भौगोलिक स्थान हे सह्याद्री सारखेच आहे. लॉस अंजिलिस ला अनेक लोक प्रेमाने “L.A.” असेही म्हणतात. LA च्या विमानतळाला LAX म्हणतात. या विमानतळावर मी उतरलो आणि कायदेशीर औपचारिकता पूर्ण करून बाहेर पडलो. माझ्या सोबत सामान असल्यामुळे मी टॅक्सीचा शोध घ्यायचे ठरवले. मोबाइलवर टॅक्सी चे भाडे तब्बल $५० म्हणजेच सुमारे ३५०० रुपये पाहून मी चकित झालो. यामुळे मी सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय निवडायचे ठरवले. LA विमानतळावरून मुख्य शहरात ये-जा करणाऱ्या “Flyaway Buses” ठरलेल्या वेळात येतात आणि प्रवाश्यांना कमी दरात सेवा देतात. LA या शहराचा आवाका पुष्कळ मोठा आहे पण तरीही येथील सार्वजनिक वाहतूक आपल्याला शहराच्या जवळजवळ प्रत्येक कान्याकोपऱ्यात नेऊन ठेवण्याची क्षमता बाळगते. बसेस आणि मेट्रोमध्ये महिला चालकांना प्राधान्य दिलेले मला आढळून आले. अमेरिकेतल्या बसेस मध्ये तिकीट कंडक्टरची गरज नसते. बस मध्ये चढतांना चालकासमोर ठेवलेल्या एका बॉक्स वर आपले तिकीट ठेवताच आपली नोंद होते. संपूर्ण शहरात चालणाऱ्या अनेक अपरिचित बस मार्गांवर मला पुरेशी माहिती नसल्यामुळे तिकीट नसतांनाही अनेक बस चालकांनी मला हसत स्वागत करत मोफत प्रवेश दिला. तंत्रज्ञान विकासाच्या युगात माणुसकी सुद्धा कुठेही कमी पडत नाही, हे पाहून आनंद झाला.

एका स्थानिक हॉस्टेल मध्ये मी माझे राहण्याचे ठिकाण निवडले. या हॉस्टेल मध्ये बहुतांश जगभर एकटी फिरणारी मंडळी राहत होती. तेथे युरोप, आशिया, दक्षिण अमेरिका, आफ्रिका इत्यादी खंडांतून एकत्र आलेल्या प्रत्येक वयोगटातील व्यक्तींशी माझी मैत्री झाली. त्यांच्याशी बोलून, संवाद साधून विविध दृष्टिकोन जाणून घेण्याची मजा काही औरच आहे. हॉस्टेल मध्ये स्वयंपाक घराची सुविधा सुद्धा उपलब्ध होती. आपापल्या देशातील अन्न बनवून नवीन मित्रांना खाऊ घालण्याची संधी आम्हा सर्वांना मिळाली.

स्थानिक विद्यापीठांना भेट देऊन तेथील माहिती जाणून घ्यायचा माझा LA ला भेट देण्याचा मुख्य उद्देश होता. या विद्यापीठांना भेट देतांना अन्य स्थानिक पर्यटन ठिकाणी सुद्धा भेट दिली. LA हे श्रीमंतांचा शहर आहे यामुळे येथील मेट्रो सेवेचा वापर अल्पच होतो. शहर समुद्रकिनारी वसलेले असून त्याला आश्चर्य वाटेल अशी स्वच्छ आणि सुंदर किनारपट्टी सुद्धा लाभलेली आहे. निळ्याशार समुद्रासमोर बसून येणाऱ्या लाटा मनातल्या लाटांची जाणीव करून देत होत्या. मन शांत होऊन आत्मनिरीक्षणात कधी सूर्य मावळला हे कळेल ही नाही.

परदेशांत शिकण्यासाठी जायचंय? करियर घडवायचंय?

LA फिरणं आणि जग जाणून घेणं हे स्वतःत झोकून देऊन बघणंच आहे. नवीन माणसांना भेटून आपल्यातले अनोखे पैलू आपल्याला लक्षात येतात. अमेरिकेविषयी अनेक गोष्टी जाणून घ्यायच्या बाकी आहेत. त्या गोष्टी जाणताना आपल्यातल्या अनेक अज्ञात गोष्टी एक एक करून पुढे येतात. त्या सामोऱ्या येतात तशा आपली जाणीव अजून परिपक्व होताना दिसते. अमेरिकेत गेलेला आणि माझ्यासारखा झोकून देऊन शिकणाऱ्या माणसाला स्वावलंबी होणे अत्यावश्यक ठरते. मीही बऱ्यापैकी स्वावलंबी झालो आहे पण हे होत असताना माझी जाणीव मी जपून ठेवली आहे हे मुद्दाम सांगतो आहे. मी एका ठिकाणी वाचलेलं वाक्य मला नीट आठवतं आहे.

अयोग्य व्यक्ती योग्य मार्गावरून जाऊनही अयोग्य राहते 
मात्र
योग्य व्यक्ती अयोग्य मार्गाला परिवर्तित करून योग्य मार्ग बनवते.

अमेरिका, इथली माणसं आणि सामाजिक वातावरण कसेही असो, मी एक व्यक्ती म्हणून शिकणार आणि माणूस बनणार ही प्रक्रिया नित्य सुरू ठेवण्याची जाणीव या प्रवासाने मला नक्कीच करून दिली आहे. एकच एक चाकोरीबद्ध आयुष्य मला जगता येणार नाही, ही ती जाणीव आहे. आयुष्य डायनॅमिक असण्याला खूप महत्त्व आहे. ते महत्त्व या जाणिवेमुळे अजून ठामपणे सामोरे आले आहे.

– शिवम् गायकवाड

Copyright © Shivam Gaikwad. All rights reserved.

Published by Shivam Gaikwad

An enthusiastic Marathi writer sharing experiences of studying abroad.

Leave a Reply