प्रवास हा माझा !

Written February 10, 2019

अमेरिकेत नुकताच ‘थॅंक्सगिव्हींग’ झाला आहे. उत्तम सुगी झाल्यानंतर अहोभाव – धन्यवादभाव प्रकट करण्याचा छानसा उत्सव. सगळेजण अगदी मजेत साजरा करतात. जागोजागी सेल लागलेले असतात. लोकं एकमेकाला शुभेच्छा आणि भेटवस्तू देतात. अगदी जिवंतपणा असतो यात. आता सगळ्यांना वेध लागले आहेत ते ख्रिसमसचे. नाताळ इथला सगळ्यात मोठा सण. नाताळाआधी आमच्या विद्यापीठात पहिल्या सत्रातल्या मुलांचे आणि माझे तिसरे सत्र पूर्ण होत आले आहे. नवे सेमिस्टर म्हणजे नवे विषय आणि ते शिकण्याची जिज्ञासा. यंदा इथे भारतीय आणि आशियाई मुले जास्तच दिसत आहेत. मला माझे ते दिवस आठवलेत. अगदी अमेरिकेत येण्याच्या पहिल्या विचारापासून ते आत्तापर्यंत सगळं कसं डोळ्यासमोर येतंय. 

विषयाकडे जाण्याच्या आधी एक महत्वाची गोष्ट सांगतो. ज्यांना अमेरिकेत शिकायला जायचे आहे त्यांनी इयत्ता नववीपासून तयारी सुरू करायला हवी. दहावीत अभ्यासामुळे वेळ मिळत नाही आणि अकरावी कोणताही अभ्यास धड करू देत नाही. तेव्हा इच्छुकांनी नीट विचार करावा असे वाटते. जी मुले आता दहावी आणि अकरावीत आहेत त्यांनी योग्य नियोजन करून पुढे जायला हवे. मी जरा उशीराच विचार केला खरा. अमेरिकेत येण्याचा माझा विचार बारावीत पक्का झाला. विविध माहिती मिळवण्यासाठी महत्वाचे साधन होते ते म्हणजे इंटरनेट. त्यामधील अनेक फोरम्स बारकाईने वाचले. त्यामधील माहितीची योग्य शहानिशा करून घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन विद्यापीठांत प्रवेश मिळवण्यासाठी तीन महत्वाच्या परीक्षा द्याव्या लागतात आणि त्यात चांगले गुण मिळवावे लागतात. त्या परीक्षा म्हणजे ‘SAT’, ‘GRE’ आणि ‘TOEFL’ या होत. सॅट ही गणित आणि इंग्रजी या विषयांची परीक्षा आहे. सॅट म्हणजे ‘Scholastic Aptitude Test’. ही परीक्षा वर्षातून सहा सात वेळा होते. परदेशात बॅचलर्स डिग्री मिळवू इच्छित असणार्‍यांसाठी ही परीक्षा देणे अनिवार्य आहे. आपल्याकडच्या स्पर्धा परीक्षांप्रमाणेच ती असते. नाशिक मधील विद्यार्थ्यांसाठी जवळचे परीक्षा केंद्र म्हणजे मुंबई. GRE सुद्धा समान विषयांचीच असते. परंतु, ती परीक्षा मास्टर्स डिग्री मिळवू पाहणार्‍यांसाठी असते. मुख्य म्हणजे GRE आणि TOEFL या परीक्षा ऑनलाइन देता येतात. TOEFL ही इंग्रजी भाषेची परीक्षा आहे. ती मुख्यतः चार विभागांमध्ये घेतली जाते. ही सर्व माहिती घेतल्यानंतर या परीक्षांची तयारी कशी करायची, हा माझ्यापुढचा मोठा प्रश्न होता. आपल्याकडचे कॉलेज बोर्ड आणि ETS या संस्थांतर्फे वरील परिक्षांची व्यवस्था केली जाते. यांच्या संकेतस्थळांवर उपयुक्त ठरतील अशा पुस्तकांची उपलब्धता असते. याच काळात विविध वृत्तपत्रांत ‘स्टडी अॅब्रोड कन्सल्टंट्स’च्या जाहिराती वाचनात आल्या होत्या. बाजारात असे अनेक कन्सल्टंट्स आहेत. नीट अभ्यास करून त्यातील एकाची निवड केली. हे कन्सल्टंट्स परीक्षांच्या तयारीपासून ते अमेरिकन व्हिसा मिळवेपर्यन्त सर्व महत्वाच्या बाबींत मार्गदर्शन करतात. 

मी तयारीला लागलो. सॅटची तारीख नक्की केली. बारावी, सॅट आणि टॉफेल अशा तिन्ही परीक्षांसाठी तयारी करणे तसे कठीणच होते. पण हे धनुष्य पेलायचे ठरवले. त्यावेळी हा विचार मनात नक्कीच आला होता की, हे सगळे अकरावीत करायला हवे होते. वेळ गेलेली नव्हती पण खूप अडचणी सामोर्‍या आल्या. अखेरीस परीक्षेची तारीख जवळ आली आणि मी मुंबईला रवाना झालो. माझ्या जवळच्या व्यक्तींची माझ्याप्रती असलेली काळजी आणि लाड यामुळे मी भांबावलो होतो. वेळेचे काटेकोर बंधन असले तरी सॅट देण्याची मजा काही औरच होती. शेवटी गजर झाला आणि मी हॉलच्या बाहेर पडलो. प्रश्न सोडवले असले तरी एक ना अनेक प्रश्न आणि उत्तरे माझ्या समोर पिंगा घालत होती. मुंबई माझा जीव की प्राण आहे. तिने मला यातून अलगद बाहेर काढले. 

पुढचा टप्पा होता TOEFL चा. मी दहावीपर्यंत मराठी माध्यमात शिकलो आहे. इंग्रजी बोलण्याची सवय आणि सराव नव्हता. कालांतराने माझ्या एका मित्रासोबत इंग्रजी बोलण्याची मी सवय लावून घेतली. आम्ही आजही इंग्रजीतूनच संवाद साधतो. एकमेकांच्या बोलण्यातल्या चुका समजून घेऊन त्या सुधारतो. मी TOEFL संगणकाच्या माध्यमातून दिली आहे. संगणकासोबत इंग्रजी बोलण्याची माझी बिलकुल तयारी नव्हती त्यामुळे अनेकदा सुचेनासे होत होते. शिवाय, आजूबाजूला मुले बोलत असल्याने त्याचाही अडथळा होता. पण परीक्षा व्यवस्थित दिली. या परीक्षेतून मी महत्वाचा धडा घेतला. तो म्हणजे, कोणतीही दुसरी भाषा आपल्याला बोलायची असेल तर विचार त्याच भाषेत केला पाहिजे. आपल्या भाषेत विचार आणि मग त्याचे भाषांतर करून बोलणे हा काही खरा संवाद नव्हे. 

परदेशांत शिकण्यासाठी जायचंय? करियर घडवायचंय?

त्यानंतर गुण यायची वाट पाहिली आणि संपूर्ण लक्ष बारावीवर केन्द्रित केले. यादरम्यान विद्यापीठ निवडण्याची प्रक्रिया सुरू केली. मला रस असलेले विषय आणि आर्थिक बाजू विचारात घेऊन काही विद्यापीठांचे शॉर्टलिस्टिंग केले. विविध ठिकाणचे सामाजिक वातावरण, विद्यापीठाचे रॅंक आणि आसपासच्या शहराची पार्श्वभूमी याचा विचार करणे महत्वाचे आहे. कन्सल्टंट्स आपल्याला त्यांची शॉर्टलिस्टिंग देतात. पण, आपण आपल्या दृष्टीने नीट विचार करून विद्यापीठ निवडायला हवे. एकाच विद्यापीठात अर्ज न करता मी आठ विद्यापीठांत अर्ज केले. सुमारे तीन आठवड्यात सर्व विद्यापीठांकडून स्वीकृतीची पत्रे आली आणि माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मी माझ्या अभ्यासाच्या आधारे यूनिवर्सिटी ऑफ नेब्रास्का अॅट ओमाहाची निवड केली.

पुढची आणि सर्वांत महत्वाची पायरी म्हणजे अमेरिकेचा व्हिसा मिळवणे. त्यासाठी फॉर्म्स भरून मुलाखतीसाठी जाणे अनिवार्य असते. एवढी मेहनत करून व्हिसाच जर मिळाला नाही तर सगळं फुकट जाणार होतं. आणि खरेच जर तसे झाले तर भारतात राहून आवडीचे शिक्षण पूर्ण करण्याचा निश्चयही केला होता. योग्य तयारी केली. कागदपत्रांची पूर्तता केली. मे महिन्यातली मुलाखतीची तारीख निश्चित केली. त्या तारखेला माझे वडील आणि मित्र असे तिघे अमेरिकेच्या मुंबईतील दूतावासात पोहोचलो. रांगेत उभा राहिलो. मनात एक गोष्ट ठाम ठरवली होती की व्हिसाची भीक मागायची नाही. प्रक्रियेप्रमाणे माझा नंबर येत गेला. मुलाखतीसाठी ऑफिसरसमोर उभा राहिलो. खूप वेळ आणि अनेक प्रश्नोत्तरानंतर मला व्हिसा मिळाला. काही क्षण भान हरपून गेले. तिथेच स्तब्ध उभा राहिलो. आपल्याला व्हिसा मिळाला आहे अशी समजूत घालून इमारतीबाहेर आलो. वडील आणि मित्राने जंगी स्वागत केले. आम्ही नाशिकसाठी मार्गस्थ झालो.

त्यानंतर बारावीची परीक्षा चांगल्या मार्कांनी पास झालो. पुढे अमेरिकेत जाण्याची लगबग, विमानाचे आरक्षण, मानसिक तयारी आदि मध्ये काळ झरझर पुढे सरकत गेला. जुलै २०१७ मध्ये अखेरीस मी अमेरिकेला रवाना झालो. भारताबाहेर मी पहिल्यांदाच गेलो होतो. जाताना व्हाया लंडन गेलो. लंडन, शिकागो आदि शहरे विमानातून बघून अगदी हरखून गेलो होतो. रात्रभर झोप नव्हती पण सोबतीला पुस्तके होती. या प्रवासात मला अजून एक महत्वाचे उमजले की काहीही न करणे हे काहीही करण्यापेक्षा खूप कठीण असते. यासाठी जाणीव असावी लागते हेसुद्धा खरेच आहे. या प्रवासापासून सुरू झालेली पुस्तकांची साथ आता आयुष्यभर असणार आहे. अमेरिकेत उतरल्यावर अनेक अज्ञात गोष्टींचा सामना केला आहे. त्याविषयी पुढे केव्हातरी सांगेन. मात्र एक गोष्ट आवर्जून सांगेन की, अमेरिकेतला स्थायिक झालेला भारतीय हा अमेरिकेतला आपला पहिला आधार असता कामा नये. येथील सगळी विद्यापीठे अगदी सर्व दृष्टींनी अद्ययावत आहेत. भारतातून थेट तिथेच जायचं आणि शिकायला सुरुवात करायची. नवागतांना खूप छान सामावून घेतात इथले लोक. मानसिक आधार देतात. विद्यापीठात तर मनोवैज्ञानिक आणि समुपदेशक तिन्हीत्रिकाळ मदतीसाठी तयार असतात. आपण आपल्या पायावर उभे राहायला हवे. त्याची मजा काही और आहे. अमेरिकेच्या प्रवासाने मला आयुष्याच्या प्रवासाचे सार समजावले आहे. 

-शिवम् गायकवाड

Copyright © Shivam Gaikwad. All rights reserved.

Published by Shivam Gaikwad

An enthusiastic Marathi writer sharing experiences of studying abroad.

Leave a Reply