‘बघता’ आलं पाहिजे!

Written November 10, 2018

ओमाहामध्ये शरद ऋतूची सुरुवात झाली आहे. झाडांची पाने हिरव्यातून लाल रंगात परिवर्तीत होताना जणू सृष्टीचं ‘बाईपण’ अधोरेखित होतय असंच वाटतंय. यावर्षी बर्फवृष्टी लवकरच झाली आहे. गारवा अचानक वाढलाय. मला किनारपट्टीचं हवामान आवडतं. उष्ण आणि दमट हवा मला इथे आल्यावर अधिकाधिक हवीहवीशी वाटू लागलीय. पण, हा संघर्ष एक माणूस म्हणून जास्त आवडतोय. संघर्षच नसेल तर काय मजा आहे आयुष्यात? अमेरिका माझ्या आतल्या संघर्षाला खूप चांगला वाव देते. यंदा ऑगस्टमध्ये मी पुन्हा इथे आल्यापासून खूप भटकंती केली आहे. पण, या लवकरच्या बर्फामुळे आता ती आवरती घेतली आहे. सध्या जेवढा बर्फ पडलाय तेवढा डिसेंबर महिन्यात पडतो. ऑक्टोबरमध्येच बर्फाची चादर पाहून मला वर्षातले दोन महिने गायब झाल्यासारखे वाटत आहेत. आता माझा मोर्चा वळलाय तो विद्यापीठाच्या ग्रंथालयाकडे. इथल्या पुस्तकांचा संग्रह आणि आवाका इतका मोठा आहे की नाशिकसारख्या संपूर्ण शहराला पुरेसा होईल. अनेक विषय आणि अनेक पुस्तकं. नुसती पर्वणी आहे वाचनाची. अमेरिकेत लोकं वाचत नाहीत हे किती खोटं आहे हे नुसतं आमचं ग्रंथालय बघितलं तरी लक्षात येईल. याशिवाय ओमाहात अनेक खासगी ग्रंथालये आणि वाचनालये आहेतच. 

अनेक पुस्तके चाळली आहेत. काही बारकाईने वाचली आहेत. ग्रंथालयाला कुलूप लागत नाही त्यामुळे ज्ञान कधीही उपलब्ध होऊ शकतं असं वातावरण आहे. ही संधी कोण सोडणार? मी तर अजिबातच नाही. पुस्तकं बघता वाचता हारूकी मुराकामी यांचे ‘काफ्का ऑन द शोर’ हे पुस्तक हाती लागलं. एक दोन पानं चाळली आणि वाचायला कधी घेतलं हे कळलं नाही. पाच तास कसे उलटले आणि शंभर पाने कशी बारकाईने वाचली गेली हेही कळलं नाही. ‘पुस्तक’ नावाच्या वाद्यातून शब्दांचे संगीत निर्माण करणे सर्वच लेखकांच्या क्षमतेत नसते. मुराकामी मात्र शब्दसंगीताचे अवलिये आहेत. लिखाणात इतके शुद्धत्व आहे की शास्त्रीय संगीत ऐकतोय असेच वाटत राहते. सर्जनशील कथांमधून वास्तविकतेच्या पलिकडे अंतर्दृष्टी बहाल करण्याचे कसब मुराकामींकडे आहे. ‘काफ्का ऑन द शोर’ मधला मुलगा साम्राज्यातल्या अनेक रूढी परंपरांवर मात करत ‘मेटामोर्फोसिस’ हा टप्पा पार करतो. मेटामोर्फोसिस म्हणजे लहानातून ‘मोठं’ होणं किंवा अगदी साहित्याच्या भाषेत सांगायचं तर अळीतून फुलपाखरू होणं! या प्रक्रियेत शारीरिक आणि मानसिक पातळीवर होणारी आंदोलने टिपण्यात मुराकामी अजिबात कमी पडलेले नाहीत. आपल्यात प्रत्येकात एक ‘फ्रांझ काफ्का’ दडलेला आहे हे या पुस्तकावरून माझ्या लक्षात आले आहे.

मुराकामी आणि काफ्का म्हणजे वाचकांना पर्वणी आहे. हारूकी मुराकामी हे जागतिक स्तरावर पोहोचलेले जपानी लेखक. त्यांची डझनभर जपानी पुस्तकं जगभरातील पन्नास भाषांमध्ये उपलब्ध आहेत. ज्यांचे खरे वाचन आहे, संगीत ऐकणे आहे, समूळ विचार करणे आहे असे लोक मुराकामी यांना नाकारूच शकत नाहीत. आपल्याकडे मराठी साहित्य जगभर पोचत नाही अशी बोंब शाळेत असल्यापासून ऐकतोय. मुळात मराठी साहित्य महाराष्ट्रात तरी कुठे नीट पोचते? एखादा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला की धन्यता मानणारे आपले लोक जागतिक स्तरावर जाण्याची क्षमता ठेवतात का असा प्रश्न इथे आल्यावर पडतो आहे. आपल्या लिखाणात जागतिक दृष्टीकोन नसतोच कारण गेल्या काही वर्षांत मराठीत माणूसपण हरवल्याचे मला प्रकर्षाने दिसून आलं आहे. जागतिकीकरणाच्या गप्पा मारणे सोपं आहे. त्यासाठी स्वतःला तयार करणे आणि आपलंपण जगभर पसरवणे याला साहित्यिक हिंमत लागते ती आपल्यात आहे का? हा प्रश्न सध्याच्या मराठी लेखक कवींनी स्वतःला विचारायला हरकत नाही. मुराकामी मला ही दृष्टी देतात असे मुद्दाम नमूद करतो. अमेरिकेत मराठी मंडळे साहित्याच्या नावाखाली जे काही करतात ते इथल्या लोकांच्या वीकएंडपेक्षाही खालच्या पातळीवर असते. आमचं आमचं आणि आमचं तेच छान म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेणार्‍यांच्या पाठीत गुद्दा घालण्याचे काम मुराकामींनी केले आहे. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक संघर्षातून तयार झालेल्या मानसिकतेत हारूकी मुराकामी अपघातानेच लेखक झाले. जपान मध्ये त्यांचे एक लहानसे रेस्टोरंट होते. एका बेसबॉल सामन्याच्या निर्णायक क्षणी एका कथेचा किडा डोक्यात शिरला आणि किचन टेबलवर त्यांनी केलेलं ‘हियर द विंड सींग’ या लहानशा कादंबरीचे लेखन केले. एका लेखन स्पर्धेत पाठवून दिले. त्याला पुरस्कार मिळाल्यावर त्याच कादंबरीचे पुढे पार्ट-टु लेखन केले ते म्हणजे ‘पिनबॉल १९७३’. त्या लेखनालाही लोकांनी डोक्यावर घेतलं. त्यांची पुढचे लिखाण म्हणजे ‘नोर्वेजियन वूड’! याच्या प्रकाशनानंतर लाभलेल्या सेलिब्रिटीपदापासून बाहेर पडण्यासाठी या माणसाला जपान सोडावा लागला. लेखनच जीवन बनले. आमचं आमचं असे बोंबलणार्‍या लोकांना आणि तथाकथित देशी-विचारवंतांना आणि त्यांच्या दांभिक विचारांना फाट्यावर मारून धडधडीतपणे विदेशीवाद आणि आत्मभान यावर लिहिण्याचे धाडस मुराकामी यांनी केले आहे. त्यामुळे ते खासच वाचनीय आहेत. 

परदेशांत शिकण्यासाठी जायचंय? करियर घडवायचंय?

मुराकामी जगण्याची सखोल दृष्टी देतात. त्यांची पात्रे आपल्यासारखीच असतात. आपल्यातले अनेक कंगोरे जाणून घेता घेता आयुष्य जाते. मुराकामी इतके सखोल दर्शन देतात की कधी कधी लख्खपणे स्वतःचं स्व-पण दिसायला लागतं. भाषेचं अवडंबर नाही, कठीण शब्द नाहीत आणि फालतू वेळकाढूपणाही नाही. जे आहे ते स्पष्ट आणि स्वच्छ. मुराकामी मानवी मूल्यांना खूप प्रकर्षाने मांडतात. वास्तव जे आहे आणि जसे आहे ते स्वीकारणे महत्वाचे आहे असे त्यांच्या प्रत्येक पात्रातून स्पष्टपणे मांडतात. सत्य खूप साधे असते आणि ते तसेच मांडले पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. लोकांचे फालतू लाड त्यांना बिलकुल आवडत नाहीत. जे स्वतःला मान्य होत नाही आणि विवेकात बसत नाही ते लोकांच्या मते कितीही महत्वाचे असू द्या, मुराकामी खर्‍याची पाठराखण करणार. मला ते आवडतात ते म्हणूनच. माणूस म्हणून जगायला हिंमत लागते ती त्यांच्या लिखाणातून मिळत राहते. मुराकामी यांना वाचल्यावर मी स्वच्छपणे सांगू शकतो की, मी शिक्षण पोटापाण्यासाठी नव्हे तर, माणूस होण्यासाठी घेतो आहे. कारण माणूस होण्यासाठी ‘बघणं’ महत्वाचं! ‘दिसतं’ सगळ्यांनाच ‘बघता’ आलं पाहिजे.

-शिवम् गायकवाड

Copyright © Shivam Gaikwad. All rights reserved.

Published by Shivam Gaikwad

An enthusiastic Marathi writer sharing experiences of studying abroad.

Leave a Reply