बर्फ-मजा की सजा?

Written March 21, 2019

या वर्षी अमेरिकेने, विशेषतः उत्तर अमेरिकेने असह्य हिवाळा अनुभवला आहे. यंदाचा इथला हिवाळा जरा जास्तच वेळ टिकला. सप्टेंबर महिन्यापासून गारठा सुरू झाला आहे तो मार्च महिन्यापर्यंत येऊन ठेपला आहे. इथे ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस झाडांची पानं लाल रंगात रूपांतरित होऊन गळायला लागतात. हिवाळी ढगांमुळे हळूहळू सूर्याची हजेरी कमी होत जाते. गवताची हिरवी चादर कधी बर्फाने पांढरी होते याचे भानही राहत नाही. मऊ आणि हलका बर्फ हातात घेऊन चेंडू बनवायचा मोह सर्वांना होतो; पण तळ हातांना बर्फाचा चटका बसण्याचा विचार येतो आणि माझी पावले बर्फापासून दूर वळतात. कधीतरी ढगांना कंटाळा आला तर ते भटकंतीला निघून जातात आणि त्यांच्याआड लपलेली सूर्य किरणे सर्वदूर पसरतात. येथे प्रदूषण कमी आहे. त्यामुळे स्वच्छ आणि निळेशार आकाश मोकळेपणाने अनुभवता येते. भारतात कधीही बर्फ पडतांना बघितलेला नसल्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक भारतीयाला बर्फाचे नवल असतेच. आपल्यापैकी जवळजवळ सर्वांनी काश्मिरातला किंवा उत्तरेतला बर्फ अनुभवला असेल. पण बर्फ आकाशातून पडतांना पाहणे खूप आनंददायी असते. तो भुरभुरतो. मजा येते.

इंग्रजीत पडणाऱ्या बर्फाला आणि साचणाऱ्या बर्फाला “snow” आणि “ice ” असे दोन वेगवेगळे शब्द आहेत. मराठीत आपण जसे “हिम” आणि “बर्फ” म्हणतो त्याप्रमाणे. समाजातील एखाद्या विशेष क्षेत्रात पर्यायवाची शब्दांच्या संख्येवरून त्या समाजाची संस्कृती लक्षात येऊ शकते. मराठीतल्या भुरभुरणे या शब्दाची मजा इंग्रजीत नाही आणि इंग्रजीतल्या “Furor” ची मजा मराठीत नाही. Furor ही संज्ञा / शब्द मजा आणि भीती दोन्हींसाठी वापरला जातो. उत्सुकता आणि अज्ञाताचे भय या दोन्ही गोष्टी त्यातून स्पष्ट होतात. इंग्रजी साहित्य बहुढंगी पध्दतीने गोष्टीकडे पाहते बघा. जागतिक दृष्टिकोनाचा हा फायदा असतो की यामुळे आपली भाषाही समृद्ध होत जाते.

बर्फ पाहायला जेवढा सुंदर तेवढाच सहन करायला कठीण असतो. कधीकधी एका वेळेसच बर्फाचा ४-५ फूटांपर्यंतचा थर साचू शकतो. यामुळे येथील नगरपालिकेला हवामान खात्यावर विश्वास ठेवून बर्फ पडण्याआधीच रस्त्यांवर मिठाचे अंथरुण घालावे लागते. मिठामुळे बर्फ कमी तापमानातही वितळतो. हा ऋतू सुरु होईल त्याआधी लोकं आपल्या वाहनांना “snow tires” लावून सुसज्ज ठेवतात. प्रत्येक इमारतीत हिटरची सोय उपलब्ध करून घेणे येथील हवामानामुळे अनिवार्य ठरते. बाहेर पडतांना शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी हातमोजे तसेच जॅकेट, स्वेटर यांचे अधिकाधिक थरही घातले जातात. शहरातील पार्क मध्ये अनेक लोक बर्फावर ‘स्की’ करण्याचा छंद जोपासतांना पाहायला मिळतात.

ह्या वर्षीचे ओमाहातील तापमान -३३ अंश सेल्सिअस इतके कमी झाले होते. या तापमानाचे मूळ कारण म्हणजे अतिशीत वारे. त्याला इंग्रजीत Polar Vertex म्हणतात. हे वारे कॅनडातून वाहत येत अमेरिकेत उत्तरेकडून प्रवेश करतात. ह्या वाऱ्यांचा प्रभाव नेब्रास्का, इलिनॉय, कोलोरॅडो आणि आयोवा या राज्यांवर सर्वाधिक असतो. अन्य राज्ये समुद्र किनाऱ्या जवळ असल्यामुळे तुलनेने उबदार राहतात. ह्या वाऱ्यांचा वेग अनेकदा १५-२० किमी. इतकाही असतो. ते अंगावर थंड दगडासारखे आदळून सहजच सूर्यमालेपलिकडील एखाद्या ग्रहावर असल्याचा भास करून देतात. या तापमानात दीर्घकाळ थांबल्यास त्वचेखाली बर्फाचा थर तयार होऊन अवयवांना इजा पोहोचण्याचा धोका देखील निर्माण होतो. यापलिकडे घरकोंडी, आळस आणि अत्यंत कमी सामाजिक संवाद या समस्यांनाही सामोरे जाणे भाग पडते. हिवाळ्यात डिप्रेशनसारख्या मानसिक आजारांचे प्रमाण सुद्धा वाढते. याच्या उपचारासाठी विद्यापीठातर्फे अनेक मोहिमा चालवल्या जातात; ज्यात विद्यार्थ्यांना बोलतं करतात आणि त्यांच्या समस्या जाणून त्यावर उपाययोजना करतात. यातून जाणाऱ्या व्यक्तीला प्रेमाची उब मिळणे आवश्यक असते. ‘आपल्या’ माणसाचा पाठिंबा आणि त्याद्वारे काळजी अनेक अडचणींतून बाहेर येण्यास मदत करते. ही ‘आपली’ माणसं शोधावीत आणि जपावीत तसेच ‘जपून शोधावीत’…

परदेशांत शिकण्यासाठी जायचंय? करियर घडवायचंय?

अमेरिकेत येण्याच्या प्रवेश प्रक्रियेत अनेक घटकांचा सखोल अभ्यास करून मी निर्णय घेतला होता. त्या घटकांपैकी एक घटक हवामान हा सुद्धा होता. साधारणतः टेक्सस या राज्याकडे वळणारी भारतीय मुलं नेब्रास्का च्या थंड वातावरणामुळे ह्या राज्याची निवड करत नाहीत. पण शिक्षणात मिळणारा वाव नेब्रास्काला एकमेवाद्वितीय बनवतो. म्हणून या प्रक्रियेत योग्य व्यक्तीचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे.

आता हवामान बदलते आहे. हळूहळू बर्फ वितळतोय. जसजसे तापमान वाढेल तसा हा वितळण्याचा वेग वाढत जाईल आणि पुराचा धोका वाढत जाणार आहे. आत्ताही अनेक ठिकाणी पूर आहे. इथली नदी मिसौरी, सध्या तिरापलिकडे किलोमीटरवर पसरली आहेच. इथला प्रसिद्ध ऑफट एअरफोर्स बेस पाण्याखाली आहे. नदीवर बांधलेले पार्क आणि वॉकवेज पाण्याखाली आहेत. हा पूर अजून वाढेल. हवामान बदलत आहे. येणारा काळ बिकट असणार हे नक्की. प्रदूषण आणि आपली वाढती भूक – गरजा हवामानाला नको त्या मार्गावर घेऊन चालली आहे. यंदाचा हिवाळा याचीच प्रतिक्रिया आहे. अमेरिका असो वा भारत, आपली सतत मजा मारण्याची प्रवृत्ती आपल्यालाच एक दिवस संपवणार आहे. किती खाल-किती प्याल! अरे, जरा तर विचार करा!

-शिवम् गायकवाड

Copyright © Shivam Gaikwad. All rights reserved.

Published by Shivam Gaikwad

An enthusiastic Marathi writer sharing experiences of studying abroad.

Leave a Reply