लवचिक आणि खंबीर!

Written March 5, 2019

सुमारे ६ वर्षांपूर्वीची गोष्ट. आठवीची वार्षिक परीक्षा नुकतीच संपली होती. उन्हाळ्याच्या लांबलचक सुट्टीत मी काय करावे असा प्रश्न माझ्या वडिलांसमोर उभा राहिला. याआधीच्या वार्षिक सुट्ट्या मी नेहमी मामाच्या गावात म्हणजेच ठाण्यात घालवल्या असे. त्याकाळी वडिलांनी घरी संगणक घेण्याचे टाळले होते. पण मामाकडे संगणक असल्यामुळे सुट्टीतला बराचसा वेळ मी संगणकावरचे खेळ खेळण्यात घालवायचो. मामाच्या गावाला जायचे असं ठरताच मला खूप आनंद व्हायचा. मला न्यायला आजोबा किंवा आजी यायचे. उन्हाळ्यात बहुतांश लोक फिरायला निघाल्यामुळे रेल्वेला गर्दी असायची; म्हणून जास्त गर्दी नसलेली दुपारी एक नंतरची भुसावळ-मुंबई पॅसेंजर ही आमची आवडती गाडी. रस्त्यात येणाऱ्या प्रत्येक स्थानकावर थांबून कल्याण नंतर ती भरमसाठ वेगात थेट ठाणे गाठायची. मला रेल्वेचे लहानपणापासूनच भरपूर वेड होते.

पण आता यापुढचे आयुष्य ‘करिअर ओरिएंटेड‘ असायला हवे, त्यामुळे या सुट्टीत मला कमी दिवसांसाठी मामाकडे रवाना केले. मामाकडे असतांना २ महिने कधी निघून जायचे याचे भानही राहत नव्हते. करिअर ओरिएंटेड असे काही करायला हवे, म्हणून मला भोसला मिलिटरी स्कूलमध्ये समर कॅम्पला पाठवण्यात आले. हा कॅम्प मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात होता आणि सुमारे १५ दिवसांच्या कालावधीत पूर्ण होणार होता. ठरल्याप्रमाणे आवश्यक ते सामान एकत्र करून मला त्या कॅम्पमध्ये पाठवण्यात आले. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून माझ्यासारखे ७००-८०० विद्यार्थी जमले होते. ५० विद्यार्थ्यांचा एक गट असे अनेक गट तयार करून प्रत्येक गटाला एका शिक्षकाची नेमणूक करून दिली होती. माझ्या दैनंदिन राहण्याची आणि जेवणाची सोय त्या कॅम्प मध्येच होती; या व्यतिरिक्त खर्च करण्यासाठी काही पैसे माझ्या वडलांनी गटातील शिक्षकाकडे जमा केले होते. सीमेवरील एखाद्या जवानाचे आयुष्य कसे असते, याची जाणीव करून देण्यासाठी हा कॅम्प होता. रात्री ९ वाजता झोपून पहाटे ३ वाजता उठायचं असा काटेकोर नियम होता. दोन आठवड्यांच्या कालावधीत दोनदाच घरी फोन करण्याची संधी आम्हाला मिळायची. फोन करण्यासाठी तासभर लांबलचक रांगेत उभं राहून फक्त ५ मिनटं फोन हातात मिळायचा. आमच्या दिनचर्येत सैन्याची परेड, व्यक्तिमत्व विकासाचे आणि पब्लिक स्पिकींगचे क्लासेस, घोडेस्वारी, बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण, पोहणे, पळणे आणि आणखी बरेच काही होते. दिवसभर थकून आल्यावर रात्रीचा आहारही तेवढाच दमदार होता. शाकाहारी, मांसाहारी, उत्तम दर्जाचे अन्न आणि दूध सुद्धा उपलब्ध होते.

त्या कॅम्पमध्ये माझ्याहून वयाने २-४ वर्ष मोठी अशी भरपूर मुलं होती. म्हणून कोणत्याही स्पर्धेत मी नेहमी शेवटचाच यायचो. राहण्याचे सोय ‘कम्युनिटी लिव्हिंग’ प्रकारची होती आणि त्यात मोठी मुलं आपलं वर्चस्व गाजवायची. त्यांच्या या वर्चस्वाचा मी सुद्धा एक शिकार होतो. साधारण दर दिवसाआड होणाऱ्या मारामारीत एकदा मला कपाळावर जोरात मार लागून तो भाग सुजला आणि मी जागीच कोसळून रडायला लागलो. हे पाहून ती मुलंही घाबरून गेली. मानसिकतेने खचलेलो मी त्याच जखमी अवस्थेत कॅम्प सोडून घरी जाण्याचा ठाम निर्णय केला. या घडामोडी आमच्या शिक्षकापर्यंत जाऊन पोहोचल्या. त्यांनी ताबडतोब त्या मुलांवर कारवाई केली. मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. त्यांनी माझी समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला. माझ्याकडून कोणतेही स्पष्टीकरण न मागता त्यांनी त्या मुलांवर कारवाई केली हे बघून मी थक्क झालो होतो. या आधी कधीही माझ्यासाठी एवढ्या ठामपणे कोणीही उभं राहण्याचा अनुभव मला नव्हता. हे पाहून मी माझा निर्णय बदलला आणि त्या शिक्षकांच्या पाठिंब्याने मी कॅम्प यशस्वीरित्या पूर्ण केला.

परदेशांत शिकण्यासाठी जायचंय? करियर घडवायचंय?

मागील आठवड्यात माझ्या विद्यापीठात झालेल्या TED Talk ची थीम ‘Resilience’ ही होती. Resilience म्हणजे कठीण परिस्थितीतून बाहेर येण्याची क्षमता होय. जगात अनेक रेझिलियन्ट लोकं आहेत आणि त्यापैकी एक मीसुद्धा. अनेकदा एखादा व्यक्ती कठीण परिस्थितीतून जात असतो याची कल्पना त्याच्या आजूबाजूच्याना अजिबात नसते. रेझिलियन्ट बनण्यासाठी मानसिक धैर्याची आवश्यकता असते. त्या पुढे जाऊन लवचिकता टिकून ठेवणेही आणखी महत्वाचे ठरते हे मला जाणवले. लवचिकता आपल्या निर्णयांत, वागण्यात आणि मानसिकतेत असली म्हणजे आपल्याला यशस्वी होण्यास मदत करते. आपल्या मानसिक रूढी संकल्पना बाजूला सारून जो ध्येय गाठतो तो खरा रेझिलियन्ट!

-शिवम् गायकवाड

Copyright © Shivam Gaikwad. All rights reserved.

Published by Shivam Gaikwad

An enthusiastic Marathi writer sharing experiences of studying abroad.

Leave a Reply