वेदनेतही फुलणारं पालकत्व…

Written November 2, 2018

अमेरिकेतील शिक्षण पद्धत खूप वेगळी आणि रोचक आहे. इथे नुसते शिकायचे नसते; तर शिकून सवरून माणूस बनायचे असते. माणूस म्हणून आवश्यक असलेली संवेदना विकसित व्हावी म्हणून विद्यापीठ स्तरावर वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यात नुसते आयोजन करून हात झटकले जात नाहीत. त्यापुढे जाऊन त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने हिरीरीने पुढाकार घ्यायला प्रोत्साहन दिले जाते. मुलं स्वयंसेवक बनतात. लोकांशी संवाद साधतात. विविध गोष्टी समजून घेतात. आपल्यावर ही वेळ आली तर कसे सामोरे जाऊ याचे सविस्तरपणे विवेचन करतात. अनेक मुले त्या विशिष्ट विषयांत पुढे जाऊन महत्वाची संशोधने करतात. राष्ट्रीय विकास कार्यक्रमातील विविध धोरणे ठरवताना विद्यापीठांतील निरीक्षणे ग्राह्य धरली जातात. उगाच मदतीचा आव आणत नाहीत इथले लोक. करायची तर करतात नाहीतर त्यात पडतच नाहीत. ‘बघेपण’ नसते. 

मागील आठवड्यात एका विशेष कार्यक्रमात स्वयंसेवक म्हणून भाग घेतला. ‘डाउन सिन्ड्रोम’ग्रस्त मुलांसाठी माझ्या विद्यापीठाने पूर्ण दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भारतात असताना डाउन सिन्ड्रोम बद्दल ऐकलं होतं. त्यामुळे मला उत्सुकता होती. जगभरात अनेक सिंड्रोम्स निदर्शनास येतात. सिन्ड्रोमला भारतात रोग असे सरधोपटपणे म्हटले जाते; पण ते तसे नाही. रोग म्हणजे एक अवस्था असते ज्यात अस्वास्थ्य होते. यात लक्षणे तयार होऊन काही शारीरिक व्याधी तयार होईपर्यंत ती वाढतात. रोग उपचारांनी बरे होतात किंवा होऊ शकतात. सिन्ड्रोम प्रकरण मात्र अगदी वेगळे असते. सिन्ड्रोममध्ये अनेक लक्षणे असू शकतात. एका सिन्ड्रोममुळे अनेक रोग होऊ शकतात.  सिन्ड्रोम आणि त्यातील रोग आयुष्यभर टिकतात.  ‘डाउन्स सिन्ड्रोम’  पहिल्यांदा सन १८६६ साली डॉ. जॉन डाउन यांच्या बघण्यात आला.  साधारणतः जगभरात हजारातून एखादे मूल या सिन्ड्रोमला बळी पडण्याची शक्यता असते. पण अमेरिकेत सातशे मुलांमधून एक मूल या सिन्ड्रोमला बळी पडण्याची शक्यता असते म्हणजेच उर्वरित जगाच्या तुलनेत अमेरिकेत हा सिन्ड्रोम जास्त बघण्यात येतो. अनुवांशिक विसंगतींमधून उदभवल्यामुळे या सिन्ड्रोम मधून बरे होणे सध्या तरी शक्य नाही. अनेक देश या क्षेत्रात खूप संशोधन करत आहेत. या सिन्ड्रोमने ग्रस्त असणारी मुलं मानसिकदृष्ट्या अपंग असतात. त्यांची शारीरिक वाढ खुंटते.  दैनंदिन जीवनात यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अगदी परावलंबी आयुष्य होऊन जाते. कोणतीही कामे करायची असली तरी या मुलांना दिव्यातून जावे लागते. या मुलांसाठी वेगळी शाळा व शिक्षण पद्धती अमेरिकेत उपलब्ध आहे. त्यांची काळजी घेण्यासाठी अमेरिकन सरकार त्यांच्या पालकांना आवश्यक आर्थिक मदत सुद्धा करते. मूल हे फक्त पालकांची जबाबदारी नसून संपूर्ण देशाची जबाबदारी असते असे जाणून ही आर्थिक मदत दिली जाते. समाज आणि व्यक्ती एकमेकांचे अविभाज्य घटक आहेत हे प्रत्यक्षात जगून दाखवणे याचे उत्तम उदाहरण अमेरिकेत पाहण्यास मिळते. 

यापलिकडची बाजू म्हणजे पालकांचे अवर्णनीय भावनिक धैर्य. कार्यक्रमातील लोकांनी अनेक मजेशीर व महत्वाचे उपक्रम आयोजित केले होते. तेव्हा अनेक पालकांशी संवाद साधता आला. आपलं मुलं ‘समाजामध्ये’ काही करू शकत नाहीत आणि आयुष्यात कधीही स्वतः च्या बळावर जगू शकणार नाहीत असा नुसता विचार करून कोणत्याही सामान्य भारतीय पालकाच्या अंगावर काटा येईल. पण आपल्या मुलाला हा सिन्ड्रोम निसर्गतः निर्माण झाला आहे हे जिद्दीने स्वीकारून निरपेक्षपणे प्रेमापोटी अमेरिकी पालक आपल्या पाल्याची काळजी घेतात. त्यांना वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होण्यास प्रवृत्त करतात. मनात दुःख न बाळगता अगदी बारीकसारीक बाबतीतही काळजी घेतात.  सगळं काही नियमित पाहतात. अमेरिकेत अशा मुलांसाठी कोणतीही बोर्डिंग्ज नाहीत. माझ्या बघण्यातील पालकांपैकी एकाने करियर सोडून मुलांसाठी घरी राहणे पसंत केलेले दिसले. कित्येक वडिलांनी हे केले हे विशेष. आपल्याकडे वेगळे चित्र पाहायला मिळते. घरातील कर्तृत्ववान स्त्री केवळ गॅसपाशी उभी राहून स्वयंपाक करून आयुष्य घालवते हे माझ्या पाहण्यात आहे. यात मुलांना आणि तिला पालक म्हणून किती त्रास होत असेल याचा विचारच पडतो. जिथे तिला तिचे जीवन पूर्णपणे जगता येत नाही तिथे ती मुलांना पूर्ण संधी कशी देऊ शकेल असं वाटतं. 

अमेरिकेत अठराव्या वर्षीच मुलं घराबाहेर पडतात.धडपडतात.  स्वतःच्या पायावर उभे राहतात. या प्रक्रियेत ते कुटुंबियांपासून दूर होत नाहीत. प्रेम तसेच टिकवतात. घरच्या अडचणींच्या प्रसंगी ठाम उभे राहतात. मूल घराबाहेर पडून जेव्हा जग पाहते तेव्हा त्याचे कुटुंबाप्रती प्रेम वाढून नाती आणखी घट्ट होतात हे मी जाणले आहे. कालांतराने जसे मूल मोठे होते तसेच यांच्या कुटुंबातील नातं ‘अनकंडिशनॅलिटी’ कडे वाटचाल करते. कोणत्याही अटींविना नातं टिकवणं तेवढं सोपं नाही. त्यात पालकांना आणि मुलांना वेगळ्याच वेदनेतून जावे लागत असते. पण, तसे केल्याशिवाय आणि स्वातंत्र्य दिल्याशिवाय व्यक्ती घडत नसतो. या वेदनेतून स्वतःला व पाल्याला सावरून फक्त नोकरी आणि पैसा कमवण्यासाठी आपण यांना जन्म दिला आहे का? यांच्या शिक्षणावर पैसे ‘खर्च’ करायचे की ‘गुंतवायचे’ असे प्रश्न जेव्हा सामोरे येतात, तेव्हा खूप दुःख होत असते. दुःखातून गेल्याशिवाय सुख मिळणार नाही आणि मुलाला पूर्ण वाढवायचं आणि जबाबदार बनवायचं असेल तर या वेदनांतून जावे लागते हे न टाळता येण्यासारखे आहे खरे. 

परदेशांत शिकण्यासाठी जायचंय? करियर घडवायचंय?

 अमेरिकी पालक कठोर आत्मनिरीक्षण करतात, याच निरीक्षणातून जे बाहेर पडते हे त्यांच्या वागण्यातून स्पष्ट दिसून येते. जसे बीजाला योग्य परिस्थिती उपलब्ध करून दिली तर ते स्वावलंबी होऊन स्वतः वाढते तसेच पाल्यावर संस्कार लादावे की पाल्यामध्ये संस्कार निर्माण करावे याकरिता योग्य ती परिस्थिती निर्माण करून द्यावी याचा विचार पालकांनी करावा असे मला वाटते. डाउन सिन्ड्रोम झालेल्या मुलांच्या पालकांनी मला खूप काही शिकवले आहे. त्यांची वेदना आपल्या वेदनेपेक्षा खूप खोल आहे. त्यातून निघण्याचा मार्ग नाही हे माहीत असून सुद्धा हे पालक आहे ती परिस्थिती स्वीकारतात आणि या मुलांना उत्तम जीवन देण्याचा प्रयत्न करतात हे बघूनच हादरायला होतं. सगळी परिस्थिती उत्तम असताना अनेक मुलं तक्रार करत कुढत जगतात आणि पालकांना दुःख वेदना देतात आणि मुलं चांगली असूनही अनेकदा पालक चुकतात तेव्हा मला एक माणूस म्हणून दुःख होतं. पण दुःख आहे तर सुख नक्की येणार. अंधारातून जाताना आपण घाबरून जातो आणि बारीकसा प्रकाश दिसला की त्याकडे झेप घेतो तसेच काहिसे माझ्याबाबतीत घडले जेव्हा मी या विशेष पालकांना भेटलो. वेदनेतही पालकत्व फुलतं आणि त्याचा सुगंध दरवळतो हे अगदी खरे आहे.


– शिवम् गायकवाड

Copyright © Shivam Gaikwad. All rights reserved.

Published by Shivam Gaikwad

An enthusiastic Marathi writer sharing experiences of studying abroad.

Leave a Reply