शिक्षणपद्धती आणि आत्मपरीक्षण

Written August 11, 2018

महाराष्ट्र शिक्षण बोर्डाच्या अभ्यासक्रमानुसार २०१७ मध्ये मी बारावी परीक्षा उत्तीर्ण झालो. माझा आवडीचा विषय असलेला जीवशास्त्र आणि तत्सबंधी विषयांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी मी अमेरिकेतील विद्यापीठाची निवड करायची असे ठरवले होते. आता प्रश्न पडतो की, अमेरिका का? याचे कारण म्हणजे काळाप्रमाणे चालणारी तेथील शिक्षण पद्धती आणि अभ्यासक्रमातील लवचिकता! मी अनेक विद्यापीठांचा अभ्यास केला आणि नेब्रास्का राज्यातील ओमाहा येथील युनिव्हर्सिटी ऑफ नेब्रास्का ऍट ओमाहाची निवड केली. साधारणपणे तिथे तीन सेमिस्टर असतात. फॉल (हिवाळा), स्प्रिंग (वसंत) आणि समर (उन्हाळा). मी फॉल सेमिस्टर पासून सुरुवात केली. पहिल्या दिवसापासून तेथील अभ्यासक्रमाने मला अभ्यासाच्या प्रेमात पाडले आहे. अशी पद्धती आपल्याकडे का नाही याच्या विचारात मी हा लेख लिहीपर्यंत पडलो होतो. अमेरिका महासत्ता का आहे या प्रश्नाच्या उत्तरात ज्या अनेक बाबी येतात, त्यापैकी अत्यंत महत्वाची बाब म्हणजे तेथील शिक्षण पद्धती. या लेखात काय श्रेष्ठ हा विषय नसून काय योग्य याचा आपण विचार करूया.
अमेरिकेत प्रत्येक गोष्टीची फिजिबिलिटी पाहिली जाते. फिजिबिलिटी म्हणजे व्यवहार्यता. आपल्याकडे शिक्षण कशासाठी घेता असे विचारले तर मुले खूप मोठी मोठी उत्तरे देताना दिसतात. प्रत्यक्षात सगळी मुले सरतेशेवटी, शिक्षण पोटापाण्यासाठी घेतो असे म्हणतात. हेच अमेरिकेतील विद्यार्थी शिक्षण पोटापाण्यासाठी घेतो असे पहिलेच जाहीर करतो आणि उत्तम माणूस बनण्याची प्रक्रिया त्यानंतर सुरु होते असे प्रांजळपणे सांगतो. हाच फरक ठळकपणे दिसून येतो. त्यांच्याकडे व्यवहार्यता पहिल्यापासूनच पाहिली जाते. ‘Swot analysis’ पद्धतीने आपण अमेरिकन शिक्षणाचे विश्लेषण करूया.

त्याआधी ओमाहा विद्यापीठाची माहिती घेऊया.
अमेरिकेच्या नेब्रास्का प्रांतातील ओमाहा आणि कौन्सिल ब्लफ शहरी विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष कायदा करून अमेरिकेच्या मध्यवर्ती शासनाने या विद्यापीठाची स्थापना केली. हे विद्यापीठ सुमारे ६०० एकर परिसरात वसलेले आहे. येथे जागतिक दर्जाचे क्रीडांगण, वाचनालय, भोजनालय, प्रयोगशाळा, अत्याधुनिक जिम, विविध विषयांची महाविद्यालये आणि आवश्यक सुख-सुविधा उपलब्ध आहेत. हे एक छोटे शहरच आहे. विद्यापीठाच्या आवारात बस-शटल सेवा चालते. अमेरिकेतील टॉप २० विद्यापीठांत याचा समावेश होतो. अमेरिकेतील अनेक क्षेत्रातील नामवंत याच विद्यापीठातून शिकलेले आहेत. जगातील सर्वाधिक श्रीमंत आणि दानशूर व्यक्तींपैकी एक असलेले बर्कशायर हाथवे कंपनीचे सर्वेसर्वा वॉरेन बफे याच विद्यापीठात शिकलेले आहेत यावरून विद्यापीठाची महती लक्षात यावी. याशिवाय जगप्रसिद्ध नेब्रास्का मेडिसिन सेंटर हे इस्पितळ याच विद्यापीठाच्या अखत्यारीत आहे.

आता swot analysis कडे वळूया. यात ‘S’ स्ट्रेंथ (बलस्थाने), ‘W’ विकनेस (कमतरता), ‘O’ अपॉर्च्युनिटी (संधी) आणि ‘T’ थ्रेट (धोके) मिळून विश्लेषण करता येते.

अमेरिकेच्या शिक्षण व्यवस्थेच्या बलस्थानांकडे बघूया. 
१) येथील अभ्यासक्रम राज्या-राज्यांनुसार वेगवेगळा असतो. केंद्रीय शिक्षण प्रणाली येथे नाही.यामुळे लवचिक अभ्यासक्रम ठेवला जातो.
२) लवचिकतेमुळे मुले आवडेल त्या क्षेत्रात अभ्यास करतात.
३) राज्य आणि केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात शिक्षण निधी पुरवतात.
४) संशोधनासाठी इथे मोठा वाव असतो.
५) ‘कसे’ शिकवावे याचे शिक्षण न घेता ‘काय’ शिकवावे याचे ज्ञान प्राप्त केलेले शिक्षक शिकवतात जे मुख्यतः त्या त्या विषयांत पी.एचडी असतात.
६) पायाभूत सुविधांची रेलचेल असते.
७) खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षण दिले आणि घेतले जाते. मैत्रीपूर्ण शिक्षण मुलांना तणावमुक्त ठेवते.
८) मानसिक तणावाच्या बाबतीत येथे उत्तम समुपदेशन केले जाते.
९) विवेकधारीत विचारांना उत्तेजन दिले जाते.
१०)नित्यनवा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना जागतिक दृष्टिकोनातून घडवतो.

अमेरिकेच्या शिक्षण व्यवस्थेच्या कमतरता:
१) अभ्यासक्रमातील लवचिकता विद्यार्थ्यांना सुस्त बनवते.
२) सध्या अमेरिकन सरकार शिक्षण खर्चात कपात करत असल्याने तेथील शिक्षण आवाक्याबाहेर होत चालले आहे.
३) किचकट कायद्यांमुळे बिगर अमेरिकी विद्यार्थ्यांना तेथे टिकणे अवघड होत आहे.
४) अस्मितांचे राजकारण शिक्षणाच्या मूळावर येत आहे.
५) देशप्रेमाऐवजी देशाबद्दलचा अहंकार वाढत असूनही शिक्षण व्यवस्था त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही.

अमेरिकेच्या शिक्षण व्यवस्थेसाठी संधी:
१) इंग्रजी भाषकांचा GDP मधील घटता वाटा बघता जागतिक भाषांमध्ये अभ्यासक्रम आल्यास सुसंधी ठरेल.
२) स्थानिक विद्यापीठांनी विविध देशांत स्टडी सेंटर किंवा अध्यासने सुरु करावीत ज्यामुळे स्थानिक मुलांना तयारी करता येईल.
३) विद्यापीठांतर्गत सामाजिक वातावरण हलकेफुलके करण्याचे विविध उपक्रम राबविल्यास विद्यार्थी उत्तम प्रगती करू शकतात.

अमेरिकेच्या शिक्षण व्यवस्थेपुढील धोके:
१) वाढते शैक्षणिक शुल्क शिक्षण महाग बनवत चालले आहे.
२) सुरक्षेच्या संदर्भात अति काळजी घेणारे केंद्र सरकार पैश्यापायी कुठल्याही विद्यार्थ्यांना बिनदिक्कत येऊ देते हे धोकादायक ठरलेले असूनही त्यावर कमी उपाययोजना दिसते.
३) वाढती सामाजिक गुन्हेगारी.
४) स्टेट बजेट कट्समुळे उच्च शिक्षणाकडे लोकं पाठ फिरवत आहेत. याचा सरळसरळ परिणाम तेथील नोकरी क्षेत्रावर होत आहे.
५) वाढते राजकीय ध्रुवीकरण शैक्षणिक क्षेत्रात विष कालवू शकते.

परदेशांत शिकण्यासाठी जायचंय? करियर घडवायचंय?

अमेरिकेच्या शैक्षणिक पद्धती अभ्यासल्यानंतर आपल्याकडील शिक्षणातील अनेक त्रुटी समोर येतात. भारतातील शिक्षण पद्धत ज्ञानार्थी मुले न घडवता ‘परीक्षार्थी’ व ‘पोटार्थी’ मुले घडवत आहे. येथे शिक्षणात ‘स्मरणशक्तीं ला महत्व दिले जाते. मुले गणितेही पाठ करतात हे मी पाहिले आहे. आपल्याकडील शिक्षक ‘कसे’ शिकवावे ह्याचे प्रशिक्षण घेतात; ‘काय’ शिकवावे ह्याचे त्यांना ज्ञान नाही. पुस्तकांमधील अभ्यासक्रम अजूनही अपंग आहे. त्यात काळाप्रमाणे बदल होताना दिसत नाही. भारतातील शिक्षणात आनंद हा घटक गायब झाला आहे. पूर्वीप्रमाणे जीव ओतून शिकवणारे शिक्षक अपवादात्मक आढळतात. विद्यार्थीं विद्यार्जन खरंच करतात का? हा आता संशोधनाचा विषय होत आहे. अमेरिकेत आरक्षण पद्धत नाही. तेथे मेरिट आणि ज्ञान हे दोन महत्वाचे निकष असतात. विनय नसेल तर विद्या शोभत नाही असे मला अनेकदा अ-विनयशील पद्धतीने शिकवले गेले. खरे शिक्षण माणूस घडवते. खरे शिक्षण सहकार्य शिकवते; स्पर्धा नाही. सहकार्यातून ज्ञान हे अमेरिकन धोरण आपण अवलंबले तर ‘हे विश्वचि माझे घर’ साकारता येईल.

– शिवम् गायकवाड

Copyright © Shivam Gaikwad. All rights reserved.

Published by Shivam Gaikwad

An enthusiastic Marathi writer sharing experiences of studying abroad.

Leave a Reply