नवे वर्ष नवी आशा

Written September 3rd, 2019

येथे सुट्ट्या संपून आता क्लासेसना सुरूवात झाली आहे. माझी ही आता तिसऱ्या वर्षाची सुरूवात आहे. मी यावर्षी अभ्यासाला घेतलेले विषय हे मागील दोन वर्षांच्या तुलनेत अधिक अवघड आणि त्याच बरोबर तेवढेच मनोरंजकही आहेत. नवीन शैक्षणिक वर्षासाठी विद्यापीठात परतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मी आणि माझी जुनी मित्र मंडळी सुद्धा आहेत. अनेकांसाठी हा उन्हाळा अभ्यास आणि कामातच निघून गेला. परतलेल्यांकडून त्यांचे उन्हाळ्यातील सुट्ट्यांचे अनुभव ऐकायला मिळाले. कुटुंबासोबत वेळ घालवायला मिळाल्यामुळे प्रत्येकाला आनंद वाटला. एखादा व्यक्ती शारीरिकदृष्ट्या दूर जाऊन खरं तर आपल्या अधिक जवळ येतो हे एकूणच सर्वांच्या बोलण्यातून जाणवले.

जुन्या विद्यार्थ्यांसह अनेक नवीन विद्यार्थी सुद्धा विद्यापीठात आले आहेत. शाळा संपवून विद्यापीठात प्रवेश करणं हे सर्वांच्याच आयुष्यातले महत्वाचे क्षण असतात; त्याचप्रमाणे हा स्वतःचे आयुष्य घडवण्याप्रती एक मोठा निर्णय देखील असतो. आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर येण्यासाठी एक धमक लागते. त्या झोनमध्ये गेल्यावर पुन्हा बाहेर पडणे कठीण पडायला लागले तर घेतलेल्या शिक्षणातून आपण काय शिकलो? असेच म्हणावे लागेल. आपण आपले जग स्वतः बनवायला हवे आणि जे जे आपल्याला त्यासाठी सहाय्यक ठरते त्याबद्दल मनात कृतज्ञता ठेवून पुढे चालत राहणे हे मला इथे शिकून कळले आहे. मी माझ्या झोनमध्ये गेल्यावर जे जे हवंहवंसं वाटतं ते ते मला माझ्या उद्देशापासून भटकवू शकत नाही, हा विश्वास माझा माझ्यावरच बसला आहे. हा प्रवास या जागी येण्यास कारणीभूत ठरला, ते म्हणजे माझं स्वयंसेवक म्हणून विविध उपक्रमांत सहभागी होणे.

भारतीय किंवा अन्य देशांतील मुले अमेरिकेत शिकायला येतात. शिकता शिकता काही वेळ नोकरी करतात. पैसे कमावतात. पदव्या घेतात. भारतात परततात किंवा अमेरिकेत स्थायिक होतात. पण या प्रक्रियेत अमेरिका जाणून घ्यायची राहून जाते. हे म्हणजे मुंबईत राहून मुंबईपण न जगण्यासारखं आहे. मुंबईत राहून मुंबईकरांशी नाळ जोडता आली नाही तर काय उपयोग? तसंच आहे हे! म्हणून स्वयंसेवक होण्यात एक वेगळा आनंद आहे. सार्थकता आहे.

नुकत्याच एका उपक्रमात स्वयंसेवक होण्याची संधी मिळाली. त्यात आम्ही नवीन विद्यार्थ्यांना त्यांच्या हॉस्टेल मध्ये प्रवेश करण्यास मदत केली. अनेक विद्यार्थ्यांना सोडायला त्यांचे पालक, भाऊ-बहीण सुद्धा आलेले होते. सामान गाडीतून उतरून त्यांच्या खोलीपर्यंत नेऊन ठेवण्यात आम्ही सर्वांची मदत केली. मदत करता करता अनेक पालकांसोबत भरपूर चर्चा सुद्धा केली. पालकांमध्ये अभिमान, काळजी, चिंता असे अनेक भाव दिसून आले. परंतु सर्व पालकांमध्ये एक भाव मात्र आवर्जून दिसून आला, तो म्हणजे पाल्याला योग्य वेळी योग्य स्वातंत्र्य बहाल करण्याचा. आपल्या लेकरांच्या गरजा पूर्ण करून त्यांच्या आयुष्यात दखल न देता विनाअट प्रेम करणे, सर्वच पालकांच्या आवाक्यात नसते. मान्य आहे ते कठीण आहे पण अशक्य नक्कीच नाही. प्रत्येकाच्या कम्फर्ट झोनमध्ये पालक मोठा वाटा निभावतात. त्यांनी पूर्ण स्वातंत्र्य दिल्याशिवाय व्यक्तिमत्त्व खुलणार कसं? आजकाल पालकांच्या अति-लाडामुळे खुळी झालेली मुले पाहतो. तेव्हा त्या मुलांपेक्षा त्यांच्या पालकांची कीव येते. मुलांनाही स्वातंत्र्य मिळाल्यावर जबाबदारीची जाणीव नसते आणि ते करत असलेल्या विद्रोहाला ते स्वातंत्र्य समजतात. अडचण दोन्हीकडून आहे. आपण वैयक्तिक पातळीवर यावर काम करायला हवे हे यावेळी मला कळलं आहे.

या कुटुंबांना मदत करता करता आम्ही जे विद्यार्थी एकटे आले होते; त्यांनाही सहाय्य करत होतो. यात अनेक स्वावलंबी आणि पूर्णतः आत्मनिर्भर विद्यार्थीदेखील आढळले. त्यांच्या सोबत असताना मला माझे अमेरिकेतले सुरुवातीचे दिवस आठवले. सर्वात पहिले जाणवली ती गोष्ट म्हणजे लहानपणी ऐकण्या-बोलण्यात असलेली जी अमेरिका माहित होती ती तशी मुळीच नव्हती. त्याचे कारण म्हणजे अमेरिकेत न जाता अमेरिकेबद्दल तारे तोडणाऱ्या लोकांची संख्या भारतात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे माझा भ्रमनिरास होऊन माझ्यात विखुरलेपणा निर्माण झाला. सुरूवातीचा बराचसा काळ हा माझ्यासाठी खूप खडतर गेला. नवीन देश, अपरिचित समाज आणि त्यांच्या चालीरीती या सर्व गोष्टी एकत्र येऊन माझ्यावर आदळल्या. पण विद्यापीठात या सर्व बाबी विचारात घेऊन अनेक उपक्रम अमलात आणले जातात. मी त्यात सहभागी झालो आणि परिस्थिती बदलली. अशाच एका उपक्रमात मागील आठवड्यात भाग घेण्याची संधी घेतली. परदेशात शिक्षण घेतांना, नवीन समाजात वावरतांना अनेकांना एकटेपण येऊ शकते. पण या एकटेपणावर मात करण्यासाठी उपाय शोधून आपण स्वतःहून अमलात आणणे गरजेचे आहे. या उपक्रमांत आंतरराष्ट्रीय समविचारी विद्यार्थ्यांना एकत्र आणून त्यांना बोलतं केलं जातं. आपल्यासारखी अनेक लोकं याच अडचणींचा सामना करत असून आपणही यावर मात करू शकतो, याचा दिलासा दिला जातो.

परदेशांत शिकण्यासाठी जायचंय? करियर घडवायचंय?

खरं तर अमेरिकेत शिक्षण घ्यायचं असेल तर शाळेपासूनच सुरुवात करायला हवी. यामुळे मुलांच्या मानसिकतेला सभोवताल स्वीकारण्यासाठी पुष्कळ वेळ मिळतो. अमेरिका फक्त चांगली जीवनशैली, माणुसकी, वित्त कमावण्यासाठी संधी, निसर्ग सौंदर्य इत्यादी बाबींची बनलेली नाहीयेय; या बाबींच्या पलीकडे दृष्टिकोन हवा असेल तर येथे वयाच्या अलीकडील टप्प्यात येणे आवश्यक आहे. त्यामुळे विचारांचा परीघ आणि उंची दोन्हीही वाढवता येऊ शकेल. नव्या शैक्षणिक वर्षात ही जाणीव मला झाली. ती मी अन्य मित्रांसोबत शेअर केली. आलेल्या पालकांसोबत आणि भावंडांसोबत चर्चा केली. त्यामुळे नव्या वर्षाची नवी दिशा मिळाल्याचा आनंद वाटतो आहे. भारतीय समाज फार एकतर्फी विचार करत चालला आहे. अपेक्षा आणि त्यांचे ओझे वाहायचे आजच्या मुलांना शक्य नाही. माझे पाल्य चुकले किंवा माझे पालक चुकले असे म्हणताना ‘मी’ घट्ट होत जातो आणि अपेक्षाभंग नक्की होतो. विनाशर्त म्हणजेच कोणत्याही अटी आणि शर्तींशिवाय प्रेम असेल तर परिस्थिती वेगळी असण्याची शक्यता जास्त वाटते. आपण यासाठी काम करूया.

-शिवम् गायकवाड

Copyright © Shivam Gaikwad. All rights reserved.

Published by Shivam Gaikwad

An enthusiastic Marathi writer sharing experiences of studying abroad.

4 thoughts on “नवे वर्ष नवी आशा

  1. व्वा, शिवम्.खुप ओघवता आणि विषय सोपा करून मांडलेला लेख.पालक आणि विद्यार्थी यांच्यातील संबंध अनुभवातून व्यक्त झालेत. ‘विनाअट प्रेम’ हे शब्द मला खुप भावले पालक म्हणून.अगदी माझ्या मनातलं .

  2. Khup chan,
    Really appreciable..
    Specially, English madhe
    & USA madhe shikshan ghet aastana Marathi madhe lekh lihane..

  3. खूप छान शिवम ,छान वाटले वाचून। अजून लिहत जा।

Leave a Reply