गणपती, माझ्या घरी…

Audio लेख ऐकण्याकरता…

Written September 11, 2019

गणपतीचे दिवस वेगळेच असतात. लहानपणापासून आजपर्यंत गणपतीचे दहा दिवस म्हटले की किती छान छान गोष्टी आठवतात. आम्ही भावंडे मिळून गणपती येण्याआधी त्याच्या पाटाभोवती सजावट करायचो. सर्वांच्या शाळा-कॉलेजची वेळ वेगवेगळी असतांनाही एक ठराविक वेळ निवडून आम्ही जमायचो. यादी तयार करून व आवश्यक सामान एकत्र जाऊन घेऊन आल्यानंतर सर्वांचे मत विचारात घेऊन आम्ही सजावटीची योजना तयार करून ती अमलात आणायचो. शेवटी जे बनायचं ते सुंदरच असायचं. गणपती सगळ्यांना एकत्र आणतो हे अगदी खरे आहे. काळ आणि वेळ बदलते तसं सगळ्यांची प्राधान्ये बदलतात. जे जे त्यावेळी एकत्र येत ते ते स्वतः काही करायचे सोडून तयार आणि आयते कसे करता येईल हे बघत बसतात आणि गणेशोत्सवाचे मूळ उद्देशतत्व हरवून बसतात. ज्यांना मोबाईलवर अनेक तास मिळतात त्यांना गणपतीसाठी काही तास काढता येत नाहीत हे बघून वाईट वाटते. त्याला सजावट नको असते तर तुमची भक्ती आणि दोन हात एक मस्तक मनोभावे हवे असते. आपण नको ते करत बसतो आणि मजा हरवून बसतो. खरे बघायला गेले तर तो वेळ गणपतीसाठी नसून आपल्यासाठी असतो. त्यात खूप काही करता येते. छोटीशी साधी सजावट करून आपण अप्रत्यक्षपणे स्वतःला वेळ देत असतो. मेंदूवर चढलेला गंज काढत असतो. बुद्धी तासून घेत असतो. पण, हल्ली पैश्यांपुढे सगळे कसे फिके पडू लागले आहे. गणपती सजावटीसाठी कॉन्ट्रॅक्ट घेणारी माणसे आली आहेत. घरी येतात आणि सजावट लटकावून जातात. झाले. ती सजावट कशा कशा साठी वापरली असेल, कोण जाणे! 

मी या वर्गात मोडत नाही. मी आणि माझा बाप्पा एकमेकांना पुरेसे आहोत. मला कुणाला काही दाखवायला जायचे नाही की इम्प्रेस करायचे नाही. या वर्षी अमेरिकेत माझा माझा गणपती बसवायचे मी काही महिने अगोदरच ठरवले होते.  याकरिता भारतातून येतांना एक लहानशी गणपतीची मूर्ती सोबत घेऊनच निघालो. विमानात बसलो तेव्हा विरंगुळा नसल्यामुळे विचारात पडलो.

विमानाची उंची अफाट असते. या उंचीमुळे विचारप्रणालीत अनेक तात्पुरते बदल होतात. अनेक तासांचा प्रवास असतो त्यामुळे झोप तरी किती घेणार? मग विचारांचे चक्र सुरू झाले की बरे वाटते. याच बदलांमुळे काही गोष्टींची जाणीव झाली. घराबाहेर पडल्यानंतरही जे ’आपले’ असते ते आपल्याच सोबत राहते; या सोबत राहण्याला शारीरिकदृष्ट्या सोबत असणे आवश्यक नसते. तसाच गणपतीसुद्धा माझ्यासोबत आला; मूर्तीच्या स्वरूपात का होईना! मी जागतिक धर्मांचा अभ्यास करत आहे. मूर्तिपूजा हा वेगळा आणि वादग्रस्त विषय आहे. पण,आपण भारतीय मूर्तीबाबत अनेक बारीक-सारीक गोष्टी विचारात घेतो. आपण मूर्तिपूजेला पहिला टप्पा मानतो. याच्या आधारे सुरुवात करून पुढे मूर्ती नसली तरी देव दिसू लागतो अशा पातळीवर जाऊन पोहोचतो. त्यामुळे मूर्तिपूजा आपल्यासाठी महत्त्वाची आहेच. आपला धर्मच वेगळा आहे. युनिक आहे. त्यामुळे गणपतीची मूर्ती रेखीव असावी, तिचे डोळे सुंदर, रेखीव आणि तेजस्वी असावे इत्यादी आपण सगळं बारकाईने बघतो. त्याच्या पाहुणचाराच्या बाबतीतही आपण कमी पडत नाही. आपण गणपतीवर खूप प्रेमही करतोच.  पण आपण गणपतीकडे एक केवळ व्यक्तिमत्व म्हणून न पाहता, बुद्धी किंवा गुणवत्तेचे प्रतीक म्हणून पाहायला हवे. त्याच्या मूर्तीला माध्यम बनवून गणपतीतला “गणपती” जाणून घ्यायला हवा. तो अंगिकारायला हवा. मी असा प्रयत्न सतत करत असतो. 

माझ्या धावपळीच्या दिनचर्येत वेळ काढून सकाळ-संध्याकाळ मी गणपतीची आरती करतो. कधी माझे इथले मित्रही या आरती करण्यामध्ये सामील होतात. भारतीय संस्कृती जाणून घेण्याची त्यांनाही खूप इच्छा असते. हे लोक आपल्या काही विशेष लोकांसारखे नसतात. हे विशेष लोक काहीही न जाणता, न अभ्यास करता आपल्याच धर्माला शिव्या घालतात आणि कुचेष्टा करतात. त्यामुळे कितीही मिळाले तरी हे भिकारीच राहतात. मी गणपतीच्या जवळ आहे कारण मी सतत अभ्यासाच्या मागे आहे. माझ्या मित्रांना गणपतीशी सांगड घालून देतांना मी कधीही “देव” म्हणून त्याची ओळख करून देत नाही. गणपतीला “देव” म्हणून आपण त्याला दूर सारतो. त्याऐवजी, त्यांना मित्र बनवले तर आपली त्यांच्याशी जवळीक आणि आपुलकीची भावना सुद्धा वाढेल. भारतात असतांना माझी जेव्हा वयस्कर व्यक्तींसोबत गाठीभेट व्हायची तेव्हा मी नेहमी त्यांना आजोबा, आजी किंवा काका, काकी असे म्हणून बोलवायचो.  पण अमेरिकेत येऊन अगदी ६-७ वर्षांच्या लहान मुलांपासून ते ८०-८५ वर्षांच्या वयस्कर व्यक्तींसोबत माझी ओळख नेहमी “मित्र” म्हणूनच झालेली आहे. अमेरिकेत राहणाऱ्या लोकांमधील मला आवडणाऱ्या काही निवडक गुणांपैकी एक गुण तो म्हणजे काळासोबत जगता येणे हा आहे. शेवटी, मित्र होण्यात अपमान तर नक्कीच नाहीये, हो ना? गणपती मित्रत्व करायला लावतो. मैत्री भाव असलेल्या माणसाला गणपती जवळचा वाटतोच. कारण मैत्रीभाव सर्वोच्च भाव आहे. त्यात अपेक्षा अजिबात नसतात. माझीही गणपतीकडून कोणतीही अपेक्षा नाही आणि त्याचीही माझ्याकडून नक्कीच नसणार. अपेक्षाहीन नाते असले की ते सगळ्यात जवळचे असते तसेच आमचे आहे! 

परदेशांत शिकण्यासाठी जायचंय? करियर घडवायचंय?

गणपती हा बुद्धीचा प्रतीक आहे. माझ्या विद्यापीठातील काही प्राध्यापकांकडे पाहून मला खूप नवल वाटते. किती उच्चशिक्षित असतात ते! तरीही, आपली ज्ञानाची तहान भागवतांना मिळणारं हे ज्ञान अज्ञातापुढे किती लहान आहे, याची जाणीव त्यांच्या वागण्यातून दिसून येते. माणूस जेवढा ज्ञान कमावतो तेवढाच तो अज्ञाताकडे वळतो असे मला वाटते,  कारण कमावलेले ज्ञान हे अज्ञातापुढे दिसेनासे होते. कितीही ज्ञान मिळवा ते अपुरे आहे. पण ज्ञान बोजड सुद्धा करते. माणसाला येणाऱ्या अहंकाराच्या यादीत उच्च शिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे. असे असले की ते ज्ञान जडपणा आणते. ते केवळ सर्टिफिकेट पुरते मर्यादित राहते. काही लोकांना स्वतःमध्ये काहीही नसल्याचासुद्धा अहंकार असतो बघा, तसाच माझ्यात खूप काही आहे, असे म्हणणे सुद्धा काहीही नसल्यासारखेच असते. गणपती हे दाखवून देतो की जे मिळवले आहेस ते खूप कमी आहे, अजून मिळवायचे आहे. मला यंदा गणपती हेच सांगतोय.  ज्ञानाचे ओझे होऊ देता कामा नये. ज्ञानाला साधन म्हणून करून घेता आले आणि आपले साध्य काय आहे हे ठरवता आले तर गणपती घरी आल्याचे सार्थक झालेच समजावे… 

।। गणपती बाप्पा मोरया ।।

– शिवम् गायकवाड

Copyright © Shivam Gaikwad. All rights reserved.

Published by Shivam Gaikwad

An enthusiastic Marathi writer sharing experiences of studying abroad.

Leave a Reply