अमेरिकेतील शिक्षणाचा आर्थिक पैलू

Audio ऐकण्याकरता…

Written September 22, 2019

नवीन शैक्षणिक वर्षात नवीनच ओळख झालेल्या प्राध्यापकांपैकी माझे एक प्राध्यापक आगळे-वेगळे आहेत. ते रसायनशास्त्र म्हणजेच केमिस्ट्री शिकवतात. इतके छान शिकवतात की विद्यार्थ्यांना वेळेचे भान राहत नाही. त्यांचे शिकवणे जेवढे खोल आणि विचार करायला लावणारे असते तेवढेच माझे प्राध्यापक ही प्रक्रिया विनोदी सुद्धा बनवतात. विनोद आणि खोडकरपणा हा त्यांच्या स्वभावाचा भाग आहे हे ठामपणे जाणवून येते. त्यांना विनोद करावा लागत नाही, त्यांच्यातून विनोद आपसुकपणे तयार होतो. वयस्कर असूनही त्यांच्यातले लहान मूल प्रकर्षाने दिसून येते. अशी माणसं जगात दुर्मिळ झाली आहेत. त्यात ती प्राध्यापक म्हणून समोर आली तर मोठी गोष्ट आहे ही! इथे शिकायला भरपूर मिळेल या विचाराने अशा या अनोख्या प्राध्यापकांना मी आवर्जून व्यक्तिशः भेटायला गेलो. आमची चर्चा केमिस्ट्रीपासून सुरु होऊन इतर अनेक विषयांना स्पर्श करत अमेरिकेतल्या शिक्षणावर येऊन पोहोचली. 

त्यांच्या बोलण्यातून अनेक गोष्टींची जाणीव मला झाली. आपण सोशल मीडियावर खूप जास्त अवलंबून आहोत. काही माहिती घ्यायची म्हटली की ‘कर गुगल’ असे झाले आहे. त्यामुळे शोध घेण्याची, नैसर्गिकरित्या कुतूहल जागे ठेवण्याची प्रवृत्ती आपण गमावत चाललो आहोत. गुगल करून जे सापडते त्यामुळे आपल्याला आनंद मिळतो का शोधण्याचा? हा एक मोठा प्रश्न आहे माझ्यासमोर!  त्यामुळे मी परस्पर संवाद जास्त महत्वाचा मानतो. सोशल मीडिया मदत करतो आणि माहिती देतो पण तोच केवळ विश्वसनीय हे मात्र खरे नाही. जिथे तारतम्य बाळगून माहिती काढायला लागते तिथे एकास एक संवाद मला खूप महत्वाचा वाटतो. अशा संवादांमुळे सर्वात पहिले काही कळत असेल तर ते म्हणजे आपले अनेक गैरसमज दूर करणे आवश्यक आहे. अमेरिकेतले शिक्षण जसे आपल्यासाठी महाग आहे तसेच ते येथील मध्यमवर्गीय अमेरिकन लोकांसाठी सुद्धा महागच आहे. येथील लोकांकरिता शिक्षणासाठी लागणाऱ्या फी चा आकडा जरी कमी असला तरीही तो त्यांच्या वार्षिक उत्पन्नाचा लक्ष वेधणारा भाग खर्च करत असतो हे आपण कधी लक्षात घेणार? अमेरिकन अर्थव्यवस्था कितीही बळकट असली तरीही येथील लोकांकडे बचतीचे प्रमाण खूप कमी आहे. त्याचे कारण म्हणजे येथील विमा कंपन्या. 

एका संशोधनात्मक अभ्यासात असे आढळून आले की सुमारे ४२% अमेरिकी नागरिक हे $१०,०००  व त्याहून कमी रक्कम शिल्लक ठेवून म्हणजेच तेवढीच बचत करून निवृत्त होतील; जे येथील लोकांच्या सरासरी वार्षिक उत्पन्नाच्या सुमारे १०% आहे. येथील मूलभूत नोकऱ्या ज्यांना फक्त शालेय शिक्षण अनिवार्य आहे त्या नोकऱ्या दैनंदिन गरजा भागवण्या-इतपतच पुरेशा असतात पण विद्यापीठात शिक्षण घ्यायचे ठरले तर अनेक विद्यार्थ्यांना बचतीचे पैसे खर्च करावे लागतात. इथे मुलं खूप लवकर स्वतःच्या पायावर उभे राहतात म्हणून बँका आणि सरकार त्यांना कर्ज पुरवठा सुद्धा करतात. काही पालक मुलांच्या शिक्षणाची पूर्वतयारी करून ठेवतात. म्हणून विद्यापीठात जाणे हे खास करून मध्यमवर्गीयांसाठी अभिमानाची असली तरी खूप खर्चिक बाब मानली जाते.

दुसरं महत्त्वाचे म्हणजे येथे सर्व संसाधने चांगली असतात. राहण्यासाठी चांगली हॉस्टेल सुविधा, विद्यार्थ्यांची सुरक्षितता, शिक्षणाचा उत्तम दर्जा, उत्तम वाचनालये आणि यासारख्या इतर अनेक सुविधांसकट त्या त्या क्षेत्रातले उच्च शिक्षित प्राध्यापकही उपलब्ध असतात. या प्राध्यापकांना त्यांचा अनुभव आणि ते करत असलेल्या संशोधन कामात लागणाऱ्या निधीमुळे त्यांना पुष्कळ वेतन देणे आवश्यक असते. सार्वजनिक विद्यापीठाला निधी मिळवून देणारे दोन मुख्य स्रोत आहेत. पहिला म्हणजे सरकारकडून येणारा निधी आणि दुसरा निधी म्हणजे विद्यार्थ्यांकडून मिळणारी फी. ज्या विद्यार्थ्यांचे नागरिकत्व त्यांच्या विद्यापीठातील राज्याचे असेल तर ते करदाते असल्यामुळे त्यांना फी मध्ये सूट मिळते. राज्याबाहेरील व आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना त्या राज्यात कर भरावा लागत नसल्यामुळे जास्त फी भरावी लागते. तरीही प्रवेश परीक्षेत चांगले मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक शिष्यवृत्तीचे पर्याय उपलब्ध असतात. विद्यापीठांतर्गत आणि बाहेरील संस्थांद्वारे या शिष्यवृत्त्या बहाल केल्या जातात. येथील नागरिकांना शिष्यवृत्तीचे हे दोन्ही पर्याय खुलेअसतात. परंतु आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना फक्त विद्यापीठाद्वारेच शिष्यवृत्ती मिळणे शक्य असते. असे निदर्शनास आले आहे की विद्यापीठामार्फत जरी १००% फी माफ होत असली तरीही इथला राहण्याचा आणि इतर खर्च आपल्यालाच करावा लागतो. हा खर्च अनेकदा जास्त असतो. या महत्त्वाच्या गोष्टीकडे आपण नीट लक्ष देत नाही.

परदेशांत शिकण्यासाठी जायचंय? करियर घडवायचंय?

अमेरिकेत दोन प्रकारची विद्यापीठे शिक्षण उपलब्ध करून देतात. पहिले म्हणजे सार्वजनिक विद्यापीठ आणि दुसरे ते खासगी विद्यापीठ. सार्वजनिक विद्यापीठे सरकारच्या अखत्यारित असल्यामुळे त्यांना सरकारी निधी मिळतो आणि तुलनेत कमी फी असते. मात्र खाजगी विद्यापीठांना ही सोय नसल्याने व अन्य स्रोत नसल्याने त्यांची फी तुलनेने जास्त असते. उदा. स्टॅनफर्ड विद्यापीठ, हार्वर्ड विद्यापीठ इत्यादी याच श्रेणीत मोडतात. २००८ च्या जागतिक मंदीनंतर अमेरिकन सरकारने आपल्या बजेटचे वितरण करणाऱ्या धोरणांमध्ये आमूलाग्र बदल केले. या बदलांमध्ये सरकारने विद्यापीठांवर खर्च केले जाणारा निधी कमी करून इतर अनेक आर्थिक घटकांमध्ये गुंतवण्याचा निर्णय घेतला. यामुळे देशातील अनेक नामांकित विद्यापीठांमध्ये आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या अडचणींना उपाय म्हणून विद्यापीठांनी काही शैक्षणिक विभाग तात्पुरते बंद केले व आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया सोपी बनवली. अमेरिकेत मध्यवर्ती शिक्षणपद्धत नसल्यामुळे प्रत्येक विद्यापीठ युनिक असते. त्यामुळे एखाद्या विद्यापीठाचे शुल्क कमी आहे किंवा ते विद्यापीठ कमी रँकिंगचे आहे म्हणून ते आपल्यासाठी योग्य नाही असा अंदाज बांधणे योग्य नाही. त्या त्या विद्यापीठाच्या निवडक मान्यता पावलेल्या क्षेत्रातील शैक्षणिक दर्जाचा आढावा घेणे आवश्यक आहे. 

शेवटी एकच सांगेन, आपण शिक्षणावर पैसे खर्च करावे की पैशांवर शिक्षण, हे आपणच ठरवावे. चांगले शिक्षण मिळवण्यास निधी आवश्यक आहेच आणि शिक्षण मिळवून पैसे कमवणे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. पण आपले आयुष्य एवढ्यापुरतेच मर्यादित आहे का? शिक्षण हे फक्त चांगले आयुष्य जगणे आणि पैसे कमावण्याचे साधन नाही. शिक्षण हे स्वतःला जाणण्याप्रती मिळत असलेली एक पायरी आहे. शिकून साक्षर बनायचे की सक्षम हे आपले आपण ठरवावे. या पायरीवर पाऊल ठेवण्याआधीचे निर्णय काळजीपूर्वक आणि अभ्यास करूनच घ्यायला हवेत. 

– शिवम् गायकवाड

Copyright © Shivam Gaikwad. All rights reserved.

Published by Shivam Gaikwad

An enthusiastic Marathi writer sharing experiences of studying abroad.

One thought on “अमेरिकेतील शिक्षणाचा आर्थिक पैलू

Leave a Reply