आठवणींचा पूल : बॉब केरी ब्रिज

Audio ऐकण्याकरता…

Written November 30th, 2019

ओमाहात येऊन काळ किती भरभर निघून गेला! आत्ता आत्ता आलोय असे वाटत असतानाच दोन वर्ष होऊनही गेली! नुकतीच नवीन गाडी घेतली आहे. ओमाहा शहर बरेचसे पसरट असल्यामुळे दैनंदिन वस्तू खरेदी करण्यासाठी आणि बारीकसारीक कामांसाठी  लांबवर जावे लागते. इथली बससेवा ‘ओमाहा मेट्रो’ नावानेच ओळखली जाते. ही इथली सार्वजनिक वाहतुक सेवा! इतर ऋतूंमध्ये सोईस्कर आहेच, परंतु इथल्या हिवाळ्यात तुडुंब भरणाऱ्या बर्फामुळे बऱ्याचदा ही सार्वजनिक वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता असते. ग्लोबल वॉर्मिंग किंवा जागतिक तापमान वाढीमुळे ऋतुचक्र झपाट्याने बदलते आहे. इथले ऋतुमान असेच सतत बदलते, तीव्र आणि अधिक काळ राहणारे असे बनले आहे. इतर वेळेस डिसेंबर अखेरीला पडणारा बर्फ गेल्या वर्षापासून नोव्हेंबर मध्येच पडून जाम करून टाकत आहे.  बर्फ पडण्याचा आकडा वर्ष सरत आहेत तसा वाढत चालला आहे. म्हणूनच अशा परिस्थितीत स्वतःची गाडी असणे नेहमी सुरक्षित आणि सोईस्कर ठरते. वाहनांची आणि इंधनाची किंमत इथे तुलनेने स्वस्त आहे. येथील रस्ते कोणत्याही हवाई धावपट्टीपेक्षा कमी नसल्यामुळे प्रवासही आनंददायी असतो. झटपट आणि सुरक्षितही असतो. वाहतुकीचे नियम कडक असल्याने शिस्तशीर असतो. सध्या अभ्यास आणि इतर शैक्षणिक कार्यक्रमांत गुंतलेलो असल्यामुळे मला गाडी घेऊन एकटे फिरायला जायला क्वचितच वेळ मिळतो. परंतु मागील आठवड्याच्या अखेरीस रात्री वेळात वेळ काढून गाडी घेऊन भटकंतीला निघालो. नेमकी कुठे जायचे हे काही ठरवले नव्हते.

फिरत फिरत बॉब केरी पुलाजवळ येऊन पोहोचलो. हा पूल मिसौरी नदीवर बांधलेला आहे. माझ्या आधीच्या लेखांत मी त्याचा उल्लेख करून आसपासची माहितीसुद्धा दिली आहे. थोडक्यात सांगायचे तर नेब्रास्का आणि आयोवा या दोन राज्यांना मिसौरी नदी ओलांडून देऊन जोडणारा हा पूल! अमेरिकन सिनेटर श्री. बॉब केरी यांच्या स्मरणार्थ बांधलेला आणि परिसरातील अनेकांनी अर्थसहाय्य देऊन बनवलेला शहराचा मानबिंदू असलेला हा पूल! 

सोईस्कर ठिकाणी गाडी पार्क करून नदी किनारी चालत निघालो. नदीजवळ पोहोचताच रंगीबेरंगी, भव्य दिव्य बॉब केरी पुलाला पाहून मुंबईच्या वांद्रे वरळी सी-लिंकचे चित्र माझ्या डोळ्यांसमोर तरळले. बॉब केरी पुलावर तसे अनेक वेळेस जाणे झाले होते, पण येथे रात्री पहिल्यांदाच आलो. लांबी, रुंदी आणि उंचीने जरीही बॉब केरी सी-लिंक पेक्षा लहान असला तरीही त्याला सारखाच आत्मा लाभलेला आहे. मिसौरीचे वेगाने धावणारे पाणी बॉब केरीच्या आधारस्तंभांवर सी-लिंक वर आदळणाऱ्या सागरी लाटांसारखे भासत होते. तिथे उभे राहून माझ्या मुंबई संबंधित अनेक आठवणी ताज्या झाल्या. 

अकरावी-बारावी मध्ये असतांना सुट्टी मिळेल तेव्हा कॅमेरा घेऊन मुंबईला रवाना व्हायचो. ठाणे ते व्ही.टी. रिटर्नचे तिकीट काढून मनात येईल तिथे उतरायचो. लोकल मध्ये दरवाजात उभे राहून लोकल पेक्षाही जोरात गतीने धावणारी माणसं पाहण्यात वेगळाच आनंद आहे. अनेक किलोमीटर चालत चालत अनोखे दृश्य मी कॅमेरात कैद करायचो. शिवाजी पार्क मध्ये खेळणारी मुलं आणि तेथूनच सूर्य मावळतीला आलेला असतांनाचे सी-लिंकचे दृश्य, मोहम्मद अली रोड वरचे अनेक खाद्य पदार्थ, चर्नी रोड स्टेशनला लागून असलेली गिरगाव चौपाटी, कुर्ला ते नवी मुंबई पर्यंतचा वाशीच्या खाडी पुलावरचा लोकलमधला प्रवास, कुलाब्यातील काळाघोडा आणि ताज हॉटेल, पारसी डेअरी फार्म मधील दुधाचे गोड पदार्थ आणि फक्कड कुल्फी, ठाण्याच्या कुटिरोद्योग भवनमधील खरवस आणि मामलेदारची मिसळ, माटुंगा-दादर मधील गल्लीबोळांची भटकंती व तिथल्या एकापेक्षा एक हॉटेल्समधील खाद्यपदार्थ,  फुल बाजार, धोबीघाट व यांसारख्या अशा अनेक गोष्टी मनात घर करून बसल्या आहेत. माझ्या हृदयातली खोलवरची अनोखी खोली मुंबईने व्यापली आहे. 

परदेशांत शिकण्यासाठी जायचंय? करियर घडवायचंय?

मुंबईत एकाद्या ठिकाणी काहीही न करता अनेक तास बसून राहणे सुद्धा वेगळाच अनुभव असतो. मुंबईत कितीही परकी लोकं असली तरीही येथील हवेत आपलेपण आहे. हे शहर संधींचे माहेरघर असून येथे कष्ट करण्याशिवाय पर्याय नाही. मुंबई झोपत नाही आणि झोपणाऱ्याला उठवत नाही. रस्तोरस्ती झोपणारी माणसं पाहिली की बंद दाराआड निवांत झोपण्यातले सुख मला मोठे वाटत असे, तेही चांगलेच आठवते. आपल्याकडे असलेले घासभर अन्न पशुपक्षांपासून गरजू माणसांना देणारे मुंबईकर सतत आठवत राहतात. ओमाहा थोडे वेगळे असले तरी मला मुंबई आणि ओमाहात अनेक समान बाबी दिसतात. ओमाहा प्रगतिशील असून सर्वांना संधी प्रदान करते. लोकसंख्येने लहान असले तरी या शहराला महान व्यक्तिमत्त्वांचा इतिहास लाभला आहे. बारीक विचार केला तेव्हा असे जाणवले की मला ओमाहात आणून ठेवण्यामागे मुंबईचा मोठा वाटा आहे. परदेशात येऊन बस्तान बांधणे हे वाटते तितके सोपे नाही. ही सगळी प्रक्रिया आयुष्यात विचारांची कलाटणी आणते. 

आज बॉब केरी पुलावरून हे सगळे विचार मनात आलेत आणि हा पूल नुसताच एखाद्या पुलासारखा नसून माझ्या आठवणींचा पूल बांधणारा पूल ठरला आहे. हे विशेष सर्वांशी शेअर व्हावं म्हणून हा लेख!

-शिवम् गायकवाड

Copyright © Shivam Gaikwad. All rights reserved.

Published by Shivam Gaikwad

An enthusiastic Marathi writer sharing experiences of studying abroad.

2 thoughts on “आठवणींचा पूल : बॉब केरी ब्रिज

  1. तुझ्या मनात मुंबई बद्दल असलेले प्रेम यातून तू अतिशय उत्तम पणे मांडले तसेच मुंबई आणि ओमाहा शहरातील समानता तू अत्यंत अभ्यासू पणाने मांडली .
    यातून तुझी कल्पकता आणि अभ्यासू वृत्ती निदर्शनास येते.
    असेच छान लेख लिहीत रहा.

  2. छान लिहितोस शिवा!
    मुंबई किंवा भारताबद्दल ज्या आठवणी तु व्यक्त केल्यास ते एकूण छान वाटतं .
    keep it up

Leave a Reply