न संपणारा हा प्रवास…

Written March 27th, 2020

ह्या घटना मागील सेमिस्टरच्या आहेत. धावपळ करतांना सेमिस्टर कधी संपत आली, हे कळले सुद्धा नाही. दैनंदिन कामकाजात स्वतःला वेळ देणे क्वचितच शक्य होत होते. रुटीनला कंटाळून घड्याळाच्या काट्यांच्या कैदेतून बाहेर  पडण्याची मनाला चाहूल लागली होती. परिक्षा संपली आणि लागलीच बाहेर फिरायला निघालो. कुठे जायचे आहे हे ठरलेले नसतानाही नेब्रास्काच्या बर्फापासून कुठेतरी दूर निघून जावे, अशी इच्छा होती. अमेरिकेच्या उत्तर भागात नेब्रास्कापेक्षाही जास्त थंडी असते म्हणून मी गाडी घेऊन दक्षिणेला प्रवास करण्यास सुरूवात केली. सोबत कोणीही नसतांना स्वतःसोबत ही माझी पहिलीच सहल!

घरातून निघालो तेव्हा कंटाळवाणेपण दूर सारण्याचा खुंटलेला दृष्टिकोन घेऊन सुरूवात केली. गाडीमध्ये आवश्यक त्या वस्तू ज्यात अन्न, पाणी आणि स्लीपिंग बॅग यांची पूर्वतयारी करून ठेवली होती. आपातकालीन परिस्थितीत उपयोगी पडेल असे थोडे इंधनही वेगळे करून ठेवले. निघण्याआधी देवाला नमस्कार केला आणि सुमारे नऊ वाजता ओमाहाहून प्रस्थान केले. दक्षिणेला वाटचाल करतांना बर्फाचे प्रमाण कमी होत गेले आणि हिरवळ दिसू लागली. जवळपास तीन तासांच्या प्रवासानंतर कॅन्सस सिटी मध्ये येऊन पोहोचलो. हे शहर ओमाहापेक्षा मोठे होते. येथील गर्दी आणि ट्रॅफिक पाहून  थांबायचेच नाही असे ठरवले आणि पुढे वाटचाल सुरु ठेवली. अमेरिकी महामार्ग खूप चांगले आहेत आणि म्हणून कमी वेळेत लांबचे अंतर गाठता येते. एका ठराविक अंतरावर इंधन, अन्न आणि राहण्याची उत्तम सोय ठिकठिकाणी पाहण्यास मिळते. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणारी मंडळी सुद्धा कमीच असतात. कॅन्सस सिटी पार केल्यावर काही अंतरावर महामार्ग सोडून मिसौरी राज्यातल्या आतील लहान रस्त्यावर भटकण्याचा निर्णय घेतला. मिसौरीतले सुंदर वन्य जीवन आणि त्याच सोबत अमेरिकी गावातल्या जीवनशैलीचा सुद्धा अनुभव मिळाला. लांबवर पसरलेल्या शेतजमिनी, येथील धान्यांची कोठारे (ज्याला सायलो असे म्हणतात) , दूधावर प्रक्रिया करणारी स्वयंचलित यंत्रणा आणि  तेथील लोकांच्या वागणुकीतली सहजता पाहून मी खरं तर थक्क झालो. आजवर मी अमेरिकेतले फक्त शहरी जीवन अनुभवले होते; पण आज येथील गावेही पाहिली. म्हणायला गाव असले तरीही शहरांसारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान येथे सहज उपलब्ध होते. कोणत्याही प्रदेशातील लोकसंख्या त्या प्रदेशातील रहिवासी लोकांच्या सामाजिक जीवनावर महत्वाची भूमिका बजावते, हे लक्षात आले. या दिवसाच्या अखेरीस ‘मेम्फिस’ नावाच्या एका शहराजवळील ‘जोन्सबोरो’ या गावात येऊन थांबलो. 

दुसऱ्या दिवशी सकाळी एका स्थानिक रेस्टॉरंट मध्ये नाश्ता करून प्रवासाला सुरूवात केली. कोणतेही डेस्टिनेशन ठरवलेले नसल्यामुळे मला वेगाचे, वेळेचे आणि मनाचे कोणतेही बंधन उरले नाही. महासागरात भटकायला निघालेल्या एखाद्या जहाजासारखा निघालेलो मी लुईसियाना या राज्यातील ‘न्यू ऑर्लीयन्स’ या शहरामध्ये येऊन पोहोचलो. हे शहर अमेरिकेच्या दक्षिणेकडील “Gulf of Mexico”  च्या म्हणजेच मेक्सिकोच्या आखाताच्या किनारी वसलेले आहे. डिस्कव्हरी चॅनेलवर लहानपणी याच प्रदेशातील उंचीवर बांधलेली घरं पाहिली होती हे आठवले. शहरात उत्तम सी-फुड आणि अनेक पर्यटन स्थळे पाहण्यास मिळाली. पण मी एकांताच्या शोधात कुठल्यातरी समुद्रकिनारी जाऊन पोहोचलो. जवळच एका पार्किंग लॉट मध्ये गाडी लावून लाटांच्या आवाजाच्या दिशेने चालत निघालो. डिसेंबरचा महिना असल्याने वातावरण येथेही थोडे थंड आणि ढग/ऊन यांचे मिश्रण होते. किनारी सुदैवाने कोणतीही गर्दी नव्हती. तसे म्हणाले तर इथे येण्याचा हा off season च पण माझ्यासाठी तर येथे येऊन पोहोचण्याची ही सर्वात चांगली वेळ. मुख्य म्हणजे येथे कोणतेही प्रदूषण नव्हते. माझ्यापासून काही अंतरावर एक कुटुंब सोबत बसून आपसांत गप्पा मारत सुट्टीचा आनंद लुटत होते. मी पाण्याकडे जाण्याआधी पायातले शुज एका बाकाजवळ काढून ठेवले. समुद्री वाळू आणि पाण्यात थोडा गारवा अजूनही टिकून होता. या किनारपट्टीवर समुद्री लाटा एवढ्या तीव्र नव्हत्या म्हणून मी तळपाय पाण्याखाली राहतील इतक्या खोलीवर जाऊन थांबलो. लाटांचा स्पर्श पायांना कोमल जाणवत होता. लाटांचा आवाज कानांसाठी जरीही ध्वनी असला तरीही माझ्यासाठी तो “Silence shared in sound” आहे. जीवशास्त्रातल्या उत्क्रांतीच्या सिद्धांतांप्रमाणे समुद्र मानवासाठी जरीही थोडा लांबवर असला तरीही माझ्यासाठी तो खूप आपला आहे. तो भव्य आहे पण तरीही त्याचा स्पर्श आल्हाददायक आहे. काही क्षण तसाच उभा राहिलो. थोड्या वेळाने किनाऱ्यालगत चालत निघालो. चालता चालता मला वेगळाच अनुभव आला. माझ्या या चालण्यात फक्त “चालणे” उरले; चालण्यातले “पोहोचणे” काही क्षणांपूर्वीच समुद्राच्या पाण्यात लोप पावले. चालण्यातले चालणेपण पहिल्यांदाच अनुभवले. 

परदेशांत शिकण्यासाठी जायचंय? करियर घडवायचंय?

आयुष्य कितीही कठीण असलं तरीही अस्तित्व किती सहज असतं; सहज म्हणजे सोप्पे नाही. आपल्याला आपले आयुष्य असेच कोणताही उद्देश न ठेवता जगता आले तर! या युगात संन्यासी मिटेल पण संन्यास उरेल ही ओशोंची भविष्यवाणी खरी ठरली आहे. उद्देश न ठेवता झालेला प्रवास हा संन्यासाचाच एक प्रकार आहे. आयुष्यात एकदातरी असे प्रवासी म्हणून हमखास जगून पहायला हवे. मानवाची शोध घेण्याची वृत्ती काळजीपूर्वक जोपासायला हवी. 

पुढील दिवशी मोबाईल वर ओमाहाला परतण्याचा रस्ता नकाशावर शोधत होतो. तेव्हा जाणवले की, कळत नकळत मी ओमाहातल्या मिसौरी नदीचे बोट धरूनच न्यू ऑर्लीयन्स पर्यंत येऊन पोहोचलो आहे. मिसौरी नदी दक्षिणेला वाहत येत मिसिसिपी नदीला मिळून न्यू ऑर्लीयन्स जवळ समुद्रात विलीन होते . हे जणू नदीचा आणि माझ्या मनाचा संगम होण्यासारखंच आहे. मनाच्या भटकंत्या स्वभावाचा प्रवाह परमेश्वराच्या हातात सोडला की ‘मी’ संपतो आणि उरतो फक्त ‘साक्षीभाव’. आता न्यू ऑर्लीयन्स हेच माझे तीर्थ बनले आहे. अथांग अस्तित्वाचा अथांग प्रवास तोही नदीच्या आतुरतेने अथांग सागराच्या ओढीने असावा तसा! सगळं काही विरघळून टाकणारा…

– शिवम् गायकवाड

Copyright © Shivam Gaikwad. All rights reserved.

Published by Shivam Gaikwad

An enthusiastic Marathi writer sharing experiences of studying abroad.

11 thoughts on “न संपणारा हा प्रवास…

 1. लेख वाचतांना असे वाटते जणू आपणच हा प्रवास करतोय की काय , अतिशय उत्तम प्रकारे तू तुझा प्रवास यात मांडला आहे. हे काम असेच चालू ठेव.

 2. हॅलो शिवम, कसा आहेस? तुझ्या प्रवास वर्णनावरून तू खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद घेताना दिसतो. असा आनंद घ्यायला सुद्धा नशीब लागते. खूप छान प्रवासवर्णन केले आहे,अगदी जीवंत प्रवासवर्णन आहे . खूप खूप शुभेच्छा. …. ….,. . पल्लवी ,नाशिक.

 3. अप्रतिम. आपल्या गंतव्यावर पोहोचणे ह्या उद्देशानेच आपण प्रवास करतो म्हणून आपल्याला त्या प्रवासाचे सौंदर्य कधी अनुभवताच नाही येत मात्र कधीतरी आपण कुठेतरी पोहोचण्यासाठी न प्रवास करता असंच चालत राहिलो तर आपलं स्वतः शी व निसर्गाशी असलेलं नातं आपल्याला उमगू लागतं आणि आपल्याला आयुष्याचा सार समजतो हे तू अतिशय सोप्या तरीही प्रगल्भ शब्दात मांडले.

 4. अतिशय उत्तम लेख आहे, शिवम तू आम्हाला आज अमेरिकेतील विविध ठिकाणांची सफारी घडवून आणल्या बद्दल तुझे आभार

 5. चांदण्यात फक्त चालणे उरले, पोहचणे संपले. वा! अतिशय सुंदर अनुभवकथन.

 6. चालण्यातले’ पोहचले’ पाण्यात लोप पावले. खूप सुंदर लिहीत आहेस. I am sure you will continue your social learning along with Academic. Keep it up.

 7. प्रथम माझ्या ब्लॉगला फॉलो केल्याबद्दल धन्यवाद.
  तुझा लेखही आवडला. तुझे आणखीही अनूभव वाचायला नक्की आवडतील.

  1. मनः पूर्वक आभार! तुमच्या ब्लॉग वरचेही काही लेख वाचले; सुंदर आहेत!

Leave a Reply