कोरोना- अमेरिकन पंचनामा…

Written April 12th, 2020

मी अमेरिकेत एका विद्यापीठात शिकतोय. आमची चालू सेमिस्टर जानेवारी महिन्यात सुरु झाली. तेव्हा ‘कोरोना व्हायरस’ हा फक्त चीन मध्ये पसरल्याची बातमी कानावर येत होती आणि हा विषय अमेरिकेत एवढा गंभीर नव्हता. माझ्या विद्यापीठाचे कामकाज तेव्हा सुरळीत चालू होते. अमेरिकेत कोरोनाचा पहिला रुग्ण जानेवारीच्या अखेरीस वॉशिंग्टन या राज्यात सापडला. हा रुग्ण काही दिवसांपूर्वीच चीन मध्ये प्रवास करून अमेरिकेत आला होता. या वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपले सुरवातीचे विधान मांडले, “आपल्याकडे हा व्हायरस पूर्णपणे ताब्यात आहे”.

अमेरिका हा जगाचा ‘मेल्टिंग पॉट’ असल्याने इथे जगभरातून लोकांचे येण्याचे प्रमाण खूप आहे. याच कारणामुळे अनेक मोठ्या इस्पितळांमध्ये खास कोरोनाची पूर्वतयारी म्हणून १०-२० वेगळ्या खोल्यांची निर्मिती करण्यात आली. कालांतराने फेब्रुवारी महिन्यात एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्ती पर्यंत संसर्ग होत हा व्हायरस संपूर्ण अमेरिकेत पसरण्यास सुरूवात झाली. न्यू यॉर्क आणि वॉशिंग्टन यांसारख्या दाट लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये तो खूप वेगाने पसरला. याच कालावधीत गर्दी टाळण्याचे सगळे नियम आणि सामाजिक दुरस्थता अमेरिकेत लागू करण्यात आले. माझ्या विद्यापीठाने दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळे ऑनलाईन शिक्षण पद्धतीस सुरूवात केली आणि कॅम्पसमधील सर्व वर्ग रद्द केले. मी ओमाहा या शहरात राहतो आणि आता खऱ्या अर्थाने, येथे कोरोनाच्या झळा जाणवण्यास सुरूवात झाली. विद्यापीठासंबंधित सर्व कामे ऑनलाईन झाली असतांना भारतात परतण्याचा पर्याय माझ्यासमोर उपलब्ध होता. पण त्या परिस्थितीतून पळ न काढता मी तिला तोंड देण्याचा निर्णय घेतला. अमेरिकी केंद्र सरकारचे अद्वितीय पराक्रम पाहून अपेक्षाभंग झालाच; पण मी स्वतःची काळजी घेण्याचे ठाम केले आणि निश्चयाने येथेच थांबलो. 

मार्च महिन्यात न्यू यॉर्क हे अमेरिकेतले कोरोनाचे केंद्रच बनले. कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असतांना न्यू यॉर्क मधल्या इस्पितळांमध्ये जागेची कमतरता भासली म्हणून लोकांचे उपचार करण्यासाठी तात्पुरते तंबू उभारण्यात आले आहेत. अमेरिकी सैन्याचा या सर्व कार्यांमध्ये खूप मोठा हातभार लाभला आहे. कोरोना तपासण्यासाठी जे साहित्य आवश्यक आहे त्याची उपलब्धता कमी असल्याने अमेरिकेत रुग्णांचा खरा आकडा कैकपटीने जास्त आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अनेक सेवानिवृत्त डॉक्टर आणि नर्सेस यांना परत कामावर येण्याची विनंती केली जात आहे. मास्क आणि व्हेंटिलेटर यांचा साठा कमी पडत आहे; यासाठी स्थानिक लोकं इस्पितळांना शक्य होईल ते साहित्य दान करून मदत करत आहेत. येथील लॉकडाऊन मध्ये स्थानिक शीख समाज लोकांना मोफत अन्न पुरवण्याचे काम करत आहे. न्यू यॉर्क मधल्या इस्पितळांचे चित्र तर वाईट आहेच पण त्याहून वाईट त्याच्या आपत्कालीन विभागात काम करण्याऱ्या देवरूपी कर्मचाऱ्यांचे अनुभव आहेत. कोरोनाच्या रुग्णांना श्वास घेणे अवघड जाणवते. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटर लावून श्वास घेण्यास मदत केली जाते. पण व्हेंटिलेटरची संख्या मर्यादित असल्यामुळे ज्या रुग्णाची जगण्याची शक्यता जास्त आहे, त्याच रुग्णांना व्हेंटिलेटर देऊन इतरांचे व्हेंटिलेटर काढून घेण्यास या कर्मचाऱ्यांना भाग पाडले जात आहे. रुग्णांना अपरिहार्यपणे मरणाच्या दारात सोडावे लागत आहे. 

न्यू यॉर्क मधील परिस्थिती बघून आणि त्यातून धडा शिकून नेब्रास्का सारख्या इतर अनेक राज्यांतील तज्ज्ञ एकंदर हे प्रकरण खूप गांभीर्याने घेत आहेत. आधीच एकटं राहणाऱ्या अमेरिकी समाजाला घरीच राहण्याचे आदेश देण्यात आले. फक्त भाजीपाला आणणे, व्यायाम करणे यांसारख्या ठराविक जीवनावश्यक कार्यांना परवानगी देण्यात आली. अमेरिकेत लोकांना व्यायाम म्हणून बाहेर धावण्याची खूप आवड आहे. पण आता सगळे धावतांना एकमेकांपासून ठराविक अंतर टिकवून नियम पाळत धावत आहेत. समोरून एखादा व्यक्ती धावत येत असेल तर एका किंवा दोन्ही व्यक्तींने आपली धावण्याची दिशा बदलावी, असे संसर्ग टाळण्याचे उपाय सुचवण्यात आले आहेत. वॉलमार्ट आणि इतर अनेक भाजीपालाच्या दुकानांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून एका ठराविक संख्येपेक्षा जास्त लोकांना प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. घरपोच अन्न सेवा आणि “Curbside Pickup” यांचे प्राधान्य दिले जात आहे. Curbside pickup हा संसर्ग टाळण्याचा खूप चांगला उपाय आहे; ज्यात आपण आपली गाडी दुकानासमोरील पार्किंग लॉट मध्ये लावायची आणि दुकानातला एक माणूस आपल्याला हवं ते गाडीपर्यंत आणून देतो. अनेक संस्था ज्यांना गरज आहे आणि जे मदत करू शकतात अशा दोघांना जोडण्याचे अभूतपूर्व काम हे करत आहेत. 

पण, अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशाचे नेमके चुकले कुठे? अत्याधुनिक तंत्रज्ञान, आर्थिक बळ आणि आवश्यक संसाधने असतांनाही अमेरिकेत कोरोना एवढा कसा पसरला? याचे उत्तर ट्रम्प यांच्या सुरूवातीच्या विधानात मिळेल. २०१४ मध्ये ओबामा इबोलाप्रति आणि २०२० मध्ये ट्रम्प कोरोनाप्रति दृष्टिकोनातला फरक खालील वाक्यांत जाणून घेऊया.  

ओबामा २०१४: “आम्ही परिस्थितीला अत्यंत गांभीर्याने घेतोय.” 

ट्रम्प २०२०: “आपल्याकडे हा व्हायरस पूर्णपणे ताब्यात आहे.”

अमेरिकी केंद्र सरकारने कोरोना व्हायरसला कमी लेखले आणि आवश्यक निर्णय घेण्यात विलंब केला. कालांतराने ट्रम्प यांचे कोरोनाशी निगडीत सर्व विधाने खोटी ठरतांना दिसत आहेत. politifact.com या प्रसिद्ध संकेतस्थळाच्या अहवालाप्रमाणे, ट्रम्प यांची फक्त ४% विधाने पूर्णपणे खरी ठरली आहेत, तर तब्बल ४८% विधाने पूर्णपणे खोटी ठरली आहेत. ट्रम्प यांच्यावर किती विश्वास ठेवावा, हा मोठा प्रश्न आमच्या समोर उभा आहे. वैज्ञानिकांनी अमेरिकी केंद्र सरकारला कोरोना बाबतील वेळेआधीच बजावले असतांनाही केंद्र सरकारकडून त्वरित उत्तर न मिळाल्याची किंवा काहीही कारवाई न केल्याच्या बातम्या समोर येत आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातील ट्रम्प यांच्या विधानांत ” चिनी व्हायरस” असा सारखा सारखा उल्लेख होताना दिसेल. परिस्थिती अनुरूप आवश्यक असे निर्णय घेण्याऐवजी ट्रम्प हे “blame game” खेळतांना आढळून येत आहेत. कोरोनामुळे मृतकांच्या संख्येत वाढ होऊन अमेरिका जगात पहिल्या क्रमांकाला असतांना डोनाल्ड ट्रम्प यांना स्टॉक मार्केटची एवढी काळजी का पडलीय? डिसेंबरमध्ये चीन आणि जानेवारीमध्ये इटली या दोघांचीही उदाहरणे पाहून अमेरिकी केंद्र सरकारने कोरोना तपासण्याचे साहित्य, मास्क आणि व्हेंटिलेटर यांसारख्या आवश्यक वस्तूंचे उत्पादनाची तयारी का केली नाही? अमेरिकी केंद्र सरकार कामगिरीत निराशाजनक ठरले असले तरीही अनेक राज्य सरकारे मात्र कौतुकास्पद कामगिरी करत आहेत. 

परदेशांत शिकण्यासाठी जायचंय? करियर घडवायचंय?

विचार करा, जो देश हजारो अण्वस्त्रे बनवू शकतो, लाखो रणगाडे बनवतो, हजारो क्षेपणास्त्रे बनवतो, कोट्यावधी रायफली बनवतो, जगभरात जाणारी विमाने बनवतो, अनेक उपग्रह बनवतो, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक बनवतो,  तो देश पुरेशा प्रमाणात व्हेंटिलेटर बनवू शकत नाही, प्राधान्यक्रमाने माणसाचा जीव वाचवू शकत नाही! अमेरिकेत जीवनाला खूप किंमत आहे असे मार्केटिंग करण्यात आले जे इन्शुरन्स कंपन्यांच्या पथ्यावर पडणारे होते आणि आहे. इथल्या लोकांच्या जीवनात बचत करणे अजिबातच नाही. इथल्या बँकिंग क्षेत्रात बचत खाते हे व्याज कमवण्यासाठी उघडलेच जात नाही. म्युच्युअल फंड आणि इन्शुरन्स ही क्षेत्रे इथे शेअर बाजाराप्रमाणे अचाट मोठी झाली आहेत. बाजार-आधारित अर्थव्यवस्था इतकी कशी बाजारू झाली की मनुष्य जीवन त्यापुढे कस्पटासमान झाले, हा मुख्य प्रश्न पडला आहे. लहानसहान गोष्टींसाठी मार्केटमध्ये पळणारी लोकं कोरोनामुळे जीव वाचवण्यासाठी जीव मुठीत धरून बसलीत आणि फरफट अशी आहे की न्यू यॉर्क आदि ठिकाणी मृतदेह एकत्र मोठमोठे कालवे खोदून त्यात पुरले जात आहेत. एकंदर चित्र दुःखद आहे. 

या विषाणूने एका अर्थाने अमेरिकेला नागडे केले आहे. भारतातला ‘नाही रे’ म्हणणारा मोठा वर्ग अमेरिकेत गेला आणि जाऊ पाहतोय, तो तोंडघशी पडलाय खरा! भारतात हे नाही, ते नाही आणि अमेरिकेत जणू स्वर्ग अवतरलाय असे मानणारे लोक सध्या भाड्याच्या घरात गप्प बसून आहेत आणि त्यांचे नातेवाईक भारतात बसून इथल्या बातम्या बघून सुन्न आहेत. अमेरिकेत ‘आहे रे’ तर काय आहे? तर सध्या जे चालले आहे ते आहे. जीवांपेक्षा डॉलर महान! 

या सर्वांचा एकत्र विचार केला तर कळून येईल की भारतात सरकारने घेतलेले निर्णय आणि त्यानुसार उचललेली पावले अतिशय योग्य आहेत.  पोलिसांनी तीव्र भूमिका घेण्यात काहीही वाईट नाही. ती आवश्यक आहे. कोरोनाला हरवणे खूप सोपे आहे. त्याची साखळी तोडायची आहे. उपाय अतिशय सोपा आहे. आपल्याच घरात बसायचं आहे. स्वतःला भरपूर वेळ द्यायचा आहे. बाहेर अजिबात जायचं नाही. बस्स! इतकंच!  भारताला भारतासारखेच अद्वितीय बनवा; घरीच राहून त्याला अमेरिका बनण्यापासून थांबवा!

– शिवम् गायकवाड

Copyright © Shivam Gaikwad. All rights reserved.

Published by Shivam Gaikwad

An enthusiastic Marathi writer sharing experiences of studying abroad.

10 thoughts on “कोरोना- अमेरिकन पंचनामा…

 1. शिवा तू अतिशय परखड व स्पष्ट लिहितोस
  तु खरंच पंचनामाच केलास रे.
  हे दिवस खुप काळजी घेण्याचे आहेस.
  बेटा तुझी काळजी घे
  Tiger आहेस तू
  Very BRAVE

 2. शिवम स्वतःची काळजी घे आणि प्रत्येक गोष्ट समजूतदार पणे व
  जबाबदारीने हाताळ .अजिबात भिती बाळगू नको .
  आमच्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत,.
  आपण लवकरच भेटु .

 3. वास्तवदर्शी चित्रण. तुम्ही स्वत: तिथे असल्याने प्रत्यक्ष परिस्थिती पाहता आहात. काळजी घ्या.

 4. Hi,
  Shivam,
  Very clear pic you have painted about current grim situation there. It’s upto Govt. There how to tackles this. But you must take care and be safe. Follow indian ways to keep fit mentally and physically e. g. Yoga and meditation.
  And the end, “sare ja se aacha hindusta hamara. “

 5. खुपच सुंदर शिवम, फारच स्पष्ट व परखड विचार. खरच पप्पा म्हणतात तसा वाघ आहेस वाघ पण काळजी घे स्वतःची , मराठीत म्हण आहेना पाण्यात राहून माश्याशी वैर कशाला. काळजी वाटते तुझी so take care & stay safe.

Leave a Reply