माझ्या हृदयातल्या एका वाटिकेतून…

Written May 14th, 2020

अमेरिकेत कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होत नसली तरीही येथील दैनंदिन जीवन सामान्य होण्याच्या मार्गावर आहे.  कोरोनाची लस किंवा इलाज सापडेपर्यंत मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, बाहेर वावरतांना ठराविक अंतर टिकवून ठेवणे हेच आता  “सामान्य” बनत चालले आहे. कोरोनावर इलाज सापडल्यानंतरही आपल्याला सामाजिक वर्तणूक आणि शारीरिक स्वच्छता नियमावली पाळावी लागणार आहेच. कचरा योग्य ठिकाणीच टाकणे, बाहेर थुंकणे टाळणे, शिंकतांना आणि खोकताना काळजी घेणे, वैयक्तिक स्वच्छता ठेवणे, अभिवादन करायचे असेल तर हात मिळवण्याऐवजी नमस्कार करणे इत्यादी गोष्टींची दखल आपण यापुढेही घेतली तर पुढचा कोरोना त्रास कमी ठरेल. असो!

ऑनलाईन क्लासेस आणि परिक्षा पूर्ण होऊन आता माझी सेमिस्टर संपली आहे. आमच्या विद्यापीठाच्या परिक्षा ऑनलाईन असल्या, तरीही त्या सोप्या नसतात. प्रत्येक सेमिस्टर नवनवीन धडे देत राहते. दररोज ज्ञानापलीकडेही काहीतरी जाणवतं, काहीतरी उमजतं. तीन वर्षांपूर्वी अमेरिकेत पोहोचलेला शिवम् आणि आत्ताचा शिवम् यांमध्ये प्रचंड फरक आहे. फ्रान्झ काफ्का यांनी लिहिलेलं ‘The Metamorphosis’ स्वतः जगता येतंय, याचा आनंद वाटतोय.

गेल्या काही महिन्यांपासून माझ्या व्यतिरिक्त माझ्या खोलीत एखादा जीव सोबतीला असावा, मी त्या जीवाची काळजी घ्यावी, त्याला लहानाचं मोठं करावं अशी इच्छा मनाला स्वस्थ बसू देत नव्हती. या इच्छेचा उगम मनात कुठे झाला, हे आठवत नाहीये मला, पण बहुदा माझ्यामध्ये होणाऱ्या Metamorphosis चाच हा एक भाग असावा! विचार करून शेवटी बारका जीव म्हणून एक रोपटं घेऊन यायचं, असं ठरवलं. या निर्णयामागे खोलीतली हवा स्वच्छ राहावी हा स्वार्थ सुद्धा होताच. काही दिवस सुट्टी आहेच, म्हणून आवर्जून जवळच्या रोपवाटिकेत गेलो. कामानिमित्त ये-जा करतांना ही रोपवाटिका डोळ्यांत टिकून होती. एका मॉलच्या पार्किंग लॉट मध्ये मोकळ्या आकाशी वसलेली ही रोपवाटिका फक्त बर्फ नसतांनाच येथे असते. 

रोपवाटिकेत प्रवेश करताच अनेक जातीची रोपं दिसून आली. काहींना फुलांचे अलंकार होते तर काही फुलांविना सुद्धा तेवढ्याच आनंदाने वाढत होते. मी फेरफटका घेत सर्व रोपांचे निरीक्षण करण्यास सुरूवात केली. जवळ जवळ सर्वच रोपांच्या कुंडींवर एक कागद चिकटवलेला होता. या कागदावर त्या रोपाची जात कोणत्या स्पर्धेत विजेती ठरलेली आहे असे लिहिलेले होते. सगळी रोपं जणू “मला दत्तक घ्या” अशी आर्जव करत होती. हे दृश्य पाहताच मला “Stuart Little” या सिनेमाची आठवण आली. या सिनेमामध्ये न्यू यॉर्क या शहरात राहणारे दांपत्य एका बाळाला दत्तक घ्यायचा निर्णय घेतात. अनाथाश्रमात पोहोचताच तेथील सर्व मुलं त्यांना गोंडस वाटतात आणि कोणाला दत्तक घ्यावे, या गोंधळात पडतात. त्या मुलांपैकीच एक बोलणारा आगळावेगळा उंदीर तेथील मुलाचे गुण सांगून त्या दांपत्याला निर्णयात मदत करतो. या उंदराचे नाव Stuart आहे. Stuart  कडे एवढी माहिती पाहून दांपत्य आश्चर्यचकित होते व त्याला प्रश्न विचारते. त्यावर Stuart म्हणतो… तेवढ्यात रोपवाटिकेतल्या माळ्याने माझ्या खांद्यावर हात ठेवून मला या जगात परत बोलावले आणि विचारले “How may I help you?”. हा माळी स्वभावाने खूप आल्हाददायक जाणवला. रोपं आणि झाडांच्या समवेत राहणाऱ्यांचा स्वभाव असा असू शकतो याचे आश्चर्य नव्हतेच पण तरीही नवल वाटले.  येथील माळ्याला ‘मी या क्षेत्रातला तज्ञ नाही’ ही कबुली देऊन माझ्या निष्काळजीपणामुळे रोप मरायला नको अशी भीती व्यक्त केली. माळ्याने मंदहास्य व्यक्त करून मला ग्रीनहाऊस मधील succulents दाखवले. या झाडांना जास्त पाणी आणि सूर्यप्रकाशाची आवश्यकता नसते. मला एकाकी सोडून माळी त्याच्या कामात व्यस्त झाला. मीही रोपं पाहण्यात मग्न झालो. पाहता-पाहता माझी नजर एका कोपऱ्यात बसलेल्या रोपावर पडली. या रोपावर कोणताही कागद चिकटवलेला नव्हता. बहुतेक हा या सर्व स्पर्धेचा भाग नव्हता. मला या रोपात Stuart दिसला आणि मी लागलीच त्याला दत्तक घेतलं. त्याचं नावसुद्धा Stuart च ठेवलं.

परदेशांत शिकण्यासाठी जायचंय? करियर घडवायचंय?

Stuart ला घरी आणून त्याला पाणी देऊन आणि दोन पाप्या देऊन खिडकीत त्याच्या जागेवर नेऊन ठेवले. Stuart मध्ये मला माझेच बालपण दिसतं. लहानपणापासून मुलांना करिअरच्या स्पर्धेत भरती करण्याचे प्रयत्न पालक आणि शिक्षण पद्धती करत असतात. या सर्वात त्यांना स्वतःची स्पेस मिळत नाही आणि त्यांना आपल्यासारखे विकार होतात. Stuart मला माझी स्पेस देतो आणि स्वतः स्वतःची स्पेस टिकवून ठेवतो. आपली मुलंही अशीच वाढतात. त्यांच्या जडणघडणीचा एक भाग म्हणून त्यांना पुरेशी स्पेस द्यायला हवी. सर्वच आपल्या नियंत्रणात नसते हे स्वीकारून बिनशर्त प्रेम करायला हवे. दिवसेंदिवस मी काहीही न करता Stuart मोठा होतोय, स्वतःच्या पानांची घनता वाढवतोय. आपण पाणी आणि प्रेम देण्यापलीकडे करूही काय शकतो म्हणा?

Stuart Little (1999)

-शिवम् गायकवाड

Copyright © Shivam Gaikwad. All rights reserved.

Published by Shivam Gaikwad

An enthusiastic Marathi writer sharing experiences of studying abroad.

3 thoughts on “माझ्या हृदयातल्या एका वाटिकेतून…

 1. Hi Shivam I m Laxman Rambhau Awate.
  I m an old family friend of your grandfather Vishnupant Gaikwad (Savkar). Or u can say I was family member of Gaikwad family knowing your father Avi, uncle Manoj since their childhood.
  There is lot to say about but your father & uncle would tell lot about me & my family.
  Your father regularly sends me your videos etc.
  I m highly impressed about your thoughts, knowledge &the way you present the topics.
  My heartiest best wishes to you for your future journey.

 2. Hi Shivam,
  I feel like waiting for your new posts.You have been fantastic with words also.I have been alone in my early life for almost 12 yrs.The feelings you express lot about . I remember small shivam going to school , for swim,to Gym and for early classes like flashback. The Boy has transformed into mature Young Man. Keep writing as when you gets time.Take care and this dark period will be over soon.

Leave a Reply